Tuesday, July 18, 2017

वैद्यकीय महाविद्यालात पद भरती.....


भारत हा प्राचीन काळापासून वैद्यक शास्त्रात जगाचे प्रतिनिधित्व करत आहे. भारतीय वैद्यक शास्त्र अनेक देशांनी स्वीकारले देखील आहे. जागतिक योगा दिन हा दिवस संपूर्ण जगाने मान्य केला आहे. अनेक देशामध्ये योगा करणे आणि त्यापासून मिळणारे अनेक फायदे याची प्रसिद्धी खूप मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आपला देशाला वैद्यक शास्त्राची परंपरा असूनही अनेक गोष्टींसाठी आपल्याला जगाच्या संशोधनाची वाट पहावी लागते. याचे कारण म्हणजे देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांचा विचार केला तर त्याचे प्रमाण फारच नगण्य आहे. परंतु गेल्या काही वर्षामध्ये डॉक्टरांची संख्या खूप झपाट्याने वाढत आहे. अनेक खेडोपाडी सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र उभाकरून शासन स्तरावर देखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
अनेक विद्यार्थी वैद्यक शास्त्राचे शिक्षण घेऊन बेरोजगार वावरताना दिसतात. यावर उपाय म्हणून शासनाने वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय दंत महाविद्यालय पदभरती (गट अ आणि ब संवर्गातील पदे) लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर जाऊन भरली जातील. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील दंत व दंतशास्त्र विषयातील गट-अ व गट-ब संवर्गाची पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळून ती बहुसदस्यीय स्वतंत्र निवड मंडळातर्फे भरण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह, दंत महाविद्यालय व संलग्न रुग्णालयांमधील अधिकाऱ्यांची भरती लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होत असल्याने या पदांच्या भरतीला विलंब लागतो,  तसेच भरतीनंतर अनेक उमेदवार मागणीनुसार पदस्थापना न मिळाल्याने रूजू होत नाहीत. त्यामुळे पुन्हा भरती प्रक्रिया करावी लागते.  रूग्णसेवा आणि शैक्षणिक कार्यक्रमावर विपरित परिणाम होतो. तसेच पदे रिक्त राहिल्याने विद्यापीठाकडून संलग्नता मिळण्यास अडचणी निर्माण होतात.
यापुढे ही पदे लोकसेवा आयोगाऐवजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अपर मुख्य सचिव किंवा प्रधान  सचिव किंवा सचिव यांच्या ‌अध्यक्षतेखालील बहुसदस्यीय स्वतंत्र निवड मंडळातर्फे भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे. या पद्धतीने जर पद भरती झाली तर ती लवकरात लवकर होऊन अनेक महाविद्यालासमोरील अनेक अडचणी दूर होऊन विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे शिक्षण मिळण्यास सुलभता होईल. अनेक बेरोजगार वैद्यक शास्त्रातील पदवी उत्तीर्ण आलेल्या विद्यार्थ्यांना रुग्ण सेवेची संधी लवकरच प्राप्त होणार आहे. नागरिकांना उत्तम प्रकारची आणि जलद सेवा मिळण्यास प्रारंभ होईल.
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो.९०२८७१३८२०

No comments:

Post a Comment