बऱ्याच
दिवसातून रेल्वेने प्रवास करण्याचा प्रसंग आला. आमच्या गावापासून जेमतेम सहा-सात
किलोमीटर अंतरावर जयसिंगपूर रेल्वे स्टेशन आहे. मी दिवसभरातील कामे आवरून
रात्रीच्या रेल्वेने मुंबईला जाण्याचा बेत आखला. सर्व सामानाची आवराआवर केली.
रात्रीचे जेवण आज लवकरच घेतले रात्री साडे नऊ वाजताची गाडी होती. फार दिवसातून
कुटुंबातील सर्वांसोबत जेवण घेतल्याचा अनुभव खूप अविस्मरणीय असतो. या वाढत्या
धावपळीच्या काळात एकत्र जेवण करण्याचा प्रसंग चातक पक्षी पावसाची वाट पाहत
बसण्यासारखे आहे. सार्वजन घरात राहत असून सुद्धा एकत्र जेवण घेणे हल्ली फारच कठीण
होत चालले आहे. असो. जेवलो आणि सर्व सामान आणखी एकदा तपासून घेतले.
मुंबईला
जाण्यास बाहेर पडताना आई वडिलांच्या पाया पडलो. घराबाहेर मित्र गाडी घेऊन उभा
होता. तो मला जयसिंगपूर रेल्वे स्टेशनला सोडायला येणार होता. रात्रीची वेळ होती
आणि एसटी बस वेळेत नाही आली तर रेल्वे चुकेल यासाठी मित्राला बोलावले होते. रेल्वे
स्टेशनला पोहोचलो. मित्र मला सोडून परत गेला. दादर तिकीट घेतले आणि रेल्वेच्या
प्लॉट फॉमवर रेल्वेची वाट पाहत उभा होतो. स्टेशन मास्तरला तिकीट घेतानाच जनरल डबा
कोठे लागतो याची विचारपूस केली होती. त्याप्रमाणे पुढच्या बाजूला जाऊन उभा राहिलो.
रेल्वे अगदी वेळेत आली रेल्वेच्या इंजिनच्या जवळच्या जनरल डब्यात चढलो. खूपच गर्दी
होती कशी बशी वाट काढत आतमध्ये शिरलो. सर्व सीटवर बसले होते. मी सीटच्या जवळ
असणाऱ्या जागेत उभा राहिलो.
जनरल
डबा म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती किंवा ज्यांना आरक्षण मिळाले नाही अशा व्यक्तीसाठी
प्रवास करण्यासाठी अतिरिक्त असलेला डबा. या डब्याची ओळख म्हणजे प्रचंड गर्दी होय.
जेवढे सीटवर बसलेले असतात तेवढेच सीटच्या बाजूला असणाऱ्या रिकाम्या जागेवर उभे
असतात. मी उभ्या असणाऱ्या व्यक्तींच्या
मधून वाट काढून पुढे जाऊन एका ठिकाणी उभा राहिलो.
बॅग खांद्यावर तशीच होती. मी बॅग ठेवण्यासाठी जागा शोधात होतो. माझी नजर
वरती बॅग ठेवण्याच्या जागी गेली थोडीशी जागा शिल्लक होती. मी हात उंचावून खांद्यावरची बॅग तिकडे ठेवली. थोडस हलक हलक
वाटू लागले. थोड्या वेळात मिरज स्टेशन आले. प्रवाश्यांची गर्दी आणखी वाढली. कसे
बसे बाहेरच लोक रेल्वेच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होते.
माझा
हा असा जनरल डब्याचा पहिलाच प्रवास होता. खूप त्रास होत होता. पुढच्या स्टेशन वर
रेल्वे थांबली. थोडे प्रवासी उतरले. मला बसायला जागा मिळाली. माझ्या बरोबर आणखी
काहीजण बसले. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर असे वाटत होते की जग जिंकल्याचे
समाधान दिसत होते. थोडा वेळ गेल्यानंतर त्या गर्दीची हळूहळू सवय झाली. थोड्याशा
जागेवर कसतरी अॅडजेस्ट झालो. पुढच्या स्टेशनवर गर्दी वाढली. गर्दीतून मोठ मोठ्याने
बोलण्याचा आवाज कानी पडू लागला. मी त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागलो. माझ्या
लक्षात आले की जागेचा वाद दोन व्यक्तीमध्ये सुरु होता. सर्वजण त्यांना शांत
राहण्यास सांगत होते. परंतु ते दोघे एकमेकांच्यावर तोंडात येईल तसे तोंड सुख घेत
होते.
थोड्या
वेळाने सर्व काही शांत झाले. रात्रही खूप झाली होती. जिथे जागा मिळेल तिकडे बसून
किंवा उभे राहून काहीजण झोपी गेले होते. मी पाहिलं थोड्या वेळा पूर्वी भांडणारे ते
दोघेजण एकमेकांशी गोडीगुलाबीने बोलत बसले होते. स्वतः जवळ असणारे खाद्य पदार्थ
एकमेकांना देवघेव करत होते. यावरून मला या जनरल डब्यात खूप काही शिकायला मिळाले.
या जनरल डबा असला तरी मानवतेची एक खूप मोठी शिकवण देण्याची जागा आहे अस मला वाटले.
सकाळी दादर स्टेशनला उतरलो. उतरताना पाहिलं तर रात्री ज्या व्यक्ती भांडत होत्या
त्या एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन निरोप घेत होते. मीही पुढच्या प्रवासाला निघालो
आणि दादरच्या प्रवाश्यांना सोडून रेल्वेसुद्धा पुढच्या प्रवासाला निघाली.
-
मंगेश विठ्ठल
कोळी.
-
मो. ९०२८७१३८२०
No comments:
Post a Comment