Wednesday, July 12, 2017

आज 'ती' आठवते....


साधारणतः चार साडेचार वाजले होते. दिवस पावसाळ्याचे होते. शाळा सुटायला आणखी आर्धा तास वेळ होता. दुपारच्या जेवणाच्या सुट्टी नंतर सहसा मुलांचे लक्ष शिकण्यावर नसते. शाळेच्या वेळापत्रकामध्ये सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये सोप्या विषयांचे तास ठेवलेले असतात. त्यातही खेळांच्या तासांचा समावेश अधिक असतो. शाळा सुटायला थोडासा अवधी उरलेला असतानाच आकाश अगदी काळेकुट्ट झाले होते. पावसाचे वातावरण झाले. शाळा सुटण्याच्या घंटेकडे सर्वांचे कान होते. माझी नजर अचानक वर्गाच्या खिडकीतून बाहेर पडली. शाळेचा शिपाई व्हरांड्यातील एक लोखंडी सळईला अडकवलेल्या घंटेकडे जाताना दिसला. मला आनंद वाटू लागला. जस जशी शिपायाची पावले घंटेच्या दिशेने पडू लागली, तस तसे माझे हात बाकावर विस्कटलेले साहित्य गोळा करून दप्तर भरण्यासाठी उंचावला जात होता. शाळा सुटण्याच्या घंटेचा आवाज कानी पडला.
सर्वजण आपापले दप्तर आवरून बाहेर बाहेर पडत होते. तेवढ्यात पावसाच्या तुरळक सरी सुरु झाल्या. सर्व विद्यार्थी, शिक्षक लगबगीने शाळेतून घरी जाण्यासाठी पावले टाकीत होते. काहीजण मात्र धावत जात होते. ज्यांनी छत्री सोबत आणली होती ते आपल्या सोबत मित्र मैत्रीणीना घेऊन जात होते. सकाळीच आई मला छत्री घेऊन जा? म्हणून ओरडून सांगत होती. परंतु तिच न ऐकता, छत्री न घेता शाळेत आलो होतो. आमची शाळा घरापासून फार दूर नव्हती. अगदी चालत गेलो तर पंधरा-वीस मिनिट लागतील. वडील साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये नोकरीला होते. त्यामुळे कारखान्याच्या कॉलनी राहत होतो. आमच्यासारखे अनेकजण त्या कारखान्यात काम करणाऱ्यांचे जवळपास शंभर-सवाशे कुटुंब तिकडे राहत होते. पाऊस आता मोठमोठ्याने कोसळू लागला होता. थोडावेळ वर्गातून बाहेर पडून शाळेच्या व्हरांड्यात उभा होतो. बऱ्यापैकी मुले, मुली, शिक्षक घरी जाताना नजरेस पडत होते. बराच वेळ मी तिकडे थांबलो होतो.
पाऊस अगदी वेडापिसा झाल्यासारखा पडत होता. त्यातच वाऱ्याची झुळूक येत-जात होती. पावसाच्या पाण्याचे तुषार अंगावर येऊ लागले. हवेत ओलावा जाणवत होता. अगदी थोड्या अंतरावर सुद्धा कोणी आहे की नाही दिसेनासे झाले होते. त्या वेडापिसा पडणाऱ्या पावसाकडे पाहत उभा होतो. पाऊस रात्रभर थांबलाच नाहीतर? मी घरी पोहोचलो नाही तर? असे अनेक चित्र-विचित्र विचार मनात येऊ लागले. थोड्या वेळाने पाऊस थोडासा कमी झाला. परंतु एका मिनिटात संपूर्ण शरीर ओलं होईल एवढा पाऊस होता. घरी जाण्यासाठी तयारी करू लागलो. पॅन्ट खालून घडी करून गुडघ्यापर्यंत वर करू लागलो. तेवढ्यात कोणीतरी माझ्या दिशेने येत असल्याचा आवाज कानी पडू लागला. विचार केला मला कदाचित भास होत असेल. तसाच मी माझ्या पॅन्टचे दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत वरती केले. दप्तर व्यवस्थित करू लागलो. पावसामुळे दप्तरातील साहित्य ओले होणार नाही, याची काळजी घेऊ लागलो.
सर्व काही आवरत असताना थोड्या वेळापूर्वी माझ्या दिशेने येणारा आवाज मला स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर कोणाची तरी अस्पष्ट येण्याचे चित्र दिसत होते. थोडे जवळ आल्यावर लक्षात आले. आमच्या कॉलनीतील एक मुलगी माझ्याच दिशेने येताना दिसली. आता ती माझ्या जवळ येऊन उभा राहिली. मी तिला न पहिल्यासारख केले. माझे सर्व आवरून बाहेर पडणार तेवढ्यात.
छत्री आणली नाहीस ना आज? ती म्हणाली...
मी तिच्याकडे वळून पाहिलं तर ती माझ्याशीच बोलत होती.
नाही आणली मी म्हणालो...
सकाळी तुमची आई छत्री घेऊन जा म्हणून सांगत होती ना? ती म्हणाली...
तुला हे कस काय माहीत? मी आश्चर्याने तिच्याकडे पाहून म्हणालो...
सकाळी शाळेला बाहेर पडला तेंव्हा मी ही आवरून बाहेर पडत होते तेंव्हा हे ऐकायला आले. ती म्हणाली...
ठीक आहे मी म्हणालो... चल जातो म्हणालो...
तेवढ्यात...
थांब पाऊस केवढा पडतो आहे. ती म्हणाली...
खूप वेळ झालं पाऊस पडत आहे आणि लवकर थांबेल अस वाटत नाही. मी म्हणालो...
माझी छत्री आहे आपण सोबतच जाऊया. ती म्हणाली...
मला आश्चर्य वाटले माझ्याशी कधीही न बोलणारी माझ्यापेक्षा एक-दोन वर्षाने लहान असणारी ती आजच अशी का बोलली.
तुझ्या मैत्रिणी गेल्या का? मी म्हणालो...
केंव्हाच गेल्या सगळ्या. ती म्हणाली....
पुढे म्हणाली थोड्यावेळापूर्वी शाळा सुटल्यावर मी वर्गातून बाहेर पडले तेंव्हा तू मला दिसलास म्हणून मी ही थांबले आहे. ती म्हणाली...
ठीक आहे. मी म्हणालो...
तिने जाण्यासाठी छत्री उघडली. आम्ही त्याचा आधार घेऊन घराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर चालू लागलो. थोडे अंतर पुढे गेलो. अचानक वाऱ्याची एक मोठी झुळूक आली आणि तिने पकडलेली छत्री तिला सावरता येईनासी झाली.
ते पाहून छत्री मी घेतो. मी म्हणालो...
छत्री माझ्याकडे घेतली आणि पुढे चालू लागलो.
तू आज दुपारी जेवला नाहीस ना? ती बोलली
मला प्रश्नच पडला हिला कस काय माहीत झाले? मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन विचारले तुला कस काय माहीत.
सकाळी डबा ही न घेताच बाहेर पडला होतास ना? ती म्हणाली...
खर आहे. मी म्हणालो...
परंतु तुला कस कळाल? ते सांग. मी म्हणालो...
ती हसत होती.
परंतु माझ्या मनात अनेक प्रश्नांचे वादळ उठत होते.
शाळेला निघण्यासाठी तू पुढे गेलास त्याच्या थोड्याच वेळाने मी बाहेर पडले. तेंव्हा तुझी आई बोलत होती. आज डबा न घेताच गेला म्हणून... अशी चिंताग्रस्त बडबड सुरु होती. ती म्हणाली...
फार कमी वयात खूप हुशार बुद्धी आहे तुझी. मी म्हणालो...
ती हसली.. आम्ही बोलण्यात एवढे मग्न झालो की, घर कधी जवळ आले समजले नाही.
पाऊस आणखी सुरूच होता.
शेवटी जाताना..
तुझ्या बद्दल मला खूप काही माहिती आहे. ज्या गोष्टी तुझ्या घराच्या नंतर कदाचित मलाच माहीत आहेत. ती म्हणाली...
माझे मन विचारात मग्न असतानाच तिचा आवाज आला. माझ्या हातातील छत्री घेत ती बोलली तुझं घर आल मी जाते...
 ती पुढे चालत जात होती. मी तिच्या त्या पाठमोऱ्या सावलीकडे पाहत उभ्या पावसात पूर्ण ओला झालो होतो. अगदी मन सुद्धा ओल झाल्याचा अनुभव आला. तो दिवस मला आजही तसाचा तसा आठवतो. या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव.
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०.

8 comments:

  1. सुरेख.....खरोखर सुंदर ....एव्कहडया कमी शब्दात एव्हड सुंदर रेखाचित्र...
    अप्रतिम.....

    ReplyDelete
  2. सुरेख.... खरोखर खूप सुंदर
    एव्हडया कमी शब्दात एव्हड सुंदर रेखाचित्र...
    अप्रतिम....

    ReplyDelete
  3. हे खरंच झालं होतं कि कल्पना होती?

    ReplyDelete
  4. प्रेम ही युनिव्हर्सल भावना आहे. ती जितकी दमन केली जाते तेव्हढी लाव्हारसा सारखी बाहेर येते. खुप सुंदर लेख

    ReplyDelete