Wednesday, January 27, 2016

स्पर्धा परीक्षा???

    आज कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करणे सोपे राहिले नाही याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या त्याच बरोबर वाढती बेरोजगारी. अनेक युवक आज खूप उच्च शिक्षण घेवून ही बेरोजगार फिरताना आपण पाहत आहे. शासनाच्या सर्व पद भरतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारने प्रवेश परीक्षा म्हणजेच स्पर्धा परीक्षा सुरू केल्या आहेत. परंतु या निवड पद्धतीमध्ये अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा उभा राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच झालेली शिक्षक पात्रता परीक्षा ही परीक्षा शिक्षण विभागामध्ये उच्च शिक्षण आणि उच्च पात्रता प्राप्त असणार्‍या व्यक्तींची निवड करता यावी या साठी हि परीक्षा घेण्यात आली परंतु गेल्या दोन वर्षांचे निकाल पाहता जे उत्तीर्ण झाले आहेत त्यांची संख्या अत्यल्प आहे. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत तुटपूंजी आहे. 
    स्पर्धा परीक्षेमधून अधिकाधिक उत्तम व्यक्तीची निवड करण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. परंतु या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम हा त्या पदासाठी आवश्यक असणार्‍या पात्रतेच्या योग्य आहे का याची खातरजमा करणे गरजेचे आहे. आज शिपाई पदासाठी किंवा शासनाच्या गट ड प्रवर्गातील पदासाठी काही मोजक्याच जागा उपलब्ध असतात. परंतु अर्जांची संख्या पाहता तीन ते चार पट ऐवढी असते. आणि पात्रता पाहिली तर सर्वजण पात्र ठरतात. मग उत्तम व्यक्तीची निवड कशा पद्धतीने करावी या साठी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले जाते आणि त्यांनी निवड केलेल्या व्यक्तींची निवड योग्य उमेदवार म्हणून केली जाते. 
    आज राज्य किंवा केंद्र शासन पुर्णतः योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्यासर्व प्रकारच्या परीक्षा आणि त्यांचा अभ्यासक्रम पाहता. अभ्यासक्रमातील काठीण्यपातळीमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर काही स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम एकच असल्याने अनेक उमेदवार सहजरित्या या परीक्षा उत्तीर्ण होतात. आज अशी अवस्था निर्माण झाली आहे की, स्पर्धेसाठी परीक्षा घेतली जाते की परीक्षेसाठी स्पर्धा घेतली जाते यामध्ये खूप संभ्रमावस्था आज अनेक उमेदवारांची झाली आहे. आयुष्यात प्रत्येक परीक्षेला किंमत देत रहावी कारण जी परीक्षा चांगली गुणवत्ता निर्माण करण्यास मदत करते परंतु काही परीक्षा या फक्त अनुभव देण्यासाठी निर्माण केल्या असाव्यात असे स्पष्ट जाणवते.

सल्ला घेऊनच काम करा

    तुमच्या सभोवताली अनेक लोक यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ते लोक कसे यशस्वी झाले आणि त्यामागची कारणे काय आहेत याची तुम्ही कधी शहानिशा केली आहे का? आज प्रत्येक जण यश मिळविण्यासाठी धडपडत आहे परंतु नाकी योग्य दिशा कोणती आहे याची खात्री न करताच पुढे पाऊल टाकत आहे. खूप प्रयत्न करून तुम्हाला यश प्राप्त होत नसेल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने प्रयत्न करत आहात हे जाणून घ्या. सर्व प्रथम तुम्ही शांतपणे स्वतः ला नक्की कोणते ध्येया पर्यंत पोहचावयाचे आहे ते ठरवा, आणि तुम्हाला काय करायचे आहे आणि काय नाही याची एक यादी तयार करा. तुम्हाला जे काही करायचे नाही त्या यादीतील एकही काम आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे जे ध्येय गाठवयाचे आहे त्याच गोष्टी शिल्लक राहतील. मगच स्वतः च्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास सुरुवात करा.
    माणूस हा समूहात राहणारा प्राणी आहे आणि सर्व प्राणांपेक्षा जास्त अहंम त्याच्या कडे आहे, तुम्हाला थोडेसे ज्ञान अवगत झाले म्हणजे सर्वच गोष्टी तुम्ही एकटे करू शकता अशा भ्रामक कल्पनेत तुम्ही कदापीही राहू नका. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळवायचे आहे त्यासाठी त्यामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मगच पुढे चालत रहा. म्हणजे तुमचे ध्येय योग्य वेळी आणि अचूक पद्धतीने होत राहील, नाहक वेळ आणि श्रम वाचतील. नवनवीन गोष्टी करत असताना पुढचा विचार करा किंवा ज्या त्या क्षेत्रातील अनुभवी आणि कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. 
    येथे एक छानसे उदाहरण आठवते. एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.
    वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.
    त्याने राजाला असा सल्ला दिला,"महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले. लक्षात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.
त्यासाठी कोणतेही काम करताना सल्ला घेऊनच काम करा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.

Thursday, January 21, 2016

झिरो माइंड कल्पना नको.

      प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होताना अनेक अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. असे म्हणतात की, 'अपयश हि यशाची पहिली पायरी असते' परंतु अपयशाची पहिली पायरी म्हणजे स्वतः च्या झिरो माईंड असल्याची कल्पना खूप खोलवर रुजवणे होय. तुम्ही कोणतेही कार्य करत असाल ते सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन आणि एखाद्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी त्याचे केलेले नियोजन आणि नियोजन पूर्वक केली जाणारी कृती फार महत्वाची असते.   
     तुम्हाला कोणीतरी सांगत असते की, एखाद्या वेळी जीवनामध्ये खूप कठीण प्रसंग आला म्हणजे त्यावेळी देवाचे नाव घेतले तर तो कठीण प्रसंग नाहीसा होतो. परंतु हे साफ खोटे आहे असे उपाय योजणारे फारच मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये वावरताना दिसतात. ज्या वेळी स्वतः मेंदू काम करण्यापासून थांबविला जातो किंवा स्वतः ची हार मानून विचारच थांबविले जातात तेंव्हा स्वतः ची अवस्था हि झिरो माईंड असते आणि अशा अवस्थेमध्ये नेहमी अपयशच पदरी पडते.
      स्वतः च्या बुद्धीवर आणि शारीरिक क्षमतेवर ज्या व्यक्तीचा आत्मविश्वास नसतो अशा व्यक्ती ह्या झिरो माईंडच्या असतात. झिरो माईंड म्हणजे नक्की काय हे जाणून, समजावून घेणे गरजेचे आहे. जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग समोर उभा ठाकला तरी त्या कठीण प्रसंगाला सांगा मी हरलो नाही कारण अजून तुम्ही जिंकला नाही. हे स्पष्ट आणि ठामपणे सांगता आले पाहिजे. कोणत्याही कठीण प्रसंगी पॉसिटीव्ह माईंड ठेवणे म्हणजे यशाच्या रस्त्यावर चालण्या सारखे असते. अनेक जण एक सारखाच मार्ग निवडतात म्हणून त्यांना समान यश प्राप्त होते. परंतु सर्वांपेक्षा वेगळा आणि कठीण मार्गावर जो चालतो त्याच्या मागून सर्वजण चालत असतात.
      तुम्ही अनेक यशस्वी माणसांच्या गोष्टी ऐकत असाल ते कशा प्रकारे यशस्वी झाले, त्यांनी कोणकोणत्या कठीण प्रसंगाला कशा प्रकारे सामोरे गेले वगैरे वगैरे. परंतु एक लक्षात ठेवा या व्यक्तींना जी समस्या अडचणी आल्या त्या कदाचित तुम्हाला कधीही येणार नाहीत. जीवन हि एक शाळा आहे या शाळेत सर्वजण शिकत असतात. कोणालाच माहित नसते आपण कोणत्या वर्गात शिकत आहे आणि पुढे काय होणार आहे. येथे प्रत्येकाचे धडे वेगवेगळे असतात समस्या तशीच असली तरी त्याचे उपाय मात्र वेगवेगळे असतात हे लक्षात ठेवा.
     तुम्हाला स्वतः ला यशस्वी व्हावयाचे असेल तर एक लक्षात ठेवा उद्या काय होणार आहे किंवा इतरांचे काय होणार आहे याचा विचार करून स्वतः च्या माईंडला झिरो बनवू नका. तुम्ही स्वतः च्या जीवनाचा विचार करा कारण ते खूप महत्वाचे आहे. इतर काय करतात हा त्यांची समस्या आहेत. नेहमी पॉसिटीव्ह माईंडने विचार करा. कारण झिरो माईंड मुळे कोणाचीही कधीही प्रगती होऊ शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा.

दिनांक 17 जानेवारी 2016 रोजी शब्दांकूर या कविता संग्रह प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमास उपस्थित मा. श्री. अमृत नाटेकर (उपजिल्हाधिकारी, सातारा) याना यशोमंदिर हे पुस्तक भेट देताना श्री. मंगेश विठ्ठल कोळी, प्रकाशक डॉ. सुनील पाटील, कवी डॉ. कुमार पाटील व इतर मान्यवर.