Tuesday, July 23, 2019

आळशी वृत्ती...



*आळशी वृत्ती* 
आज खूप दिवसांनी बसने प्रवास करण्याचा योग आला. बसचा प्रवास हा मला नेहमी काहीतरी नवीन शिकवून जातो. आज अगदी तसेच झाले. प्रवासामध्ये माझ्या बाजूच्या सीटवर एक व्यक्ती बसली होती बसचा प्रवास सुरु झाला. तसा मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ती व्यक्ती खूपच अस्वस्थ वाटत होती. माझ्यातील मानसशास्त्रज्ञ जागा झाला. मी त्या व्यक्तीची सहज विचारपूस केली, त्याच्याशी संवाद साधला. त्या संवादातून माझ्या असे लक्षात आले की, ती व्यक्ती एकाच पद्धतीचे काम वर्षानुवर्षे करत आहे.
त्या व्यक्तीला त्याच्या कामाचा कंटाळा आला होता. आता त्या कंटाळवाण्या पद्धतीचे रूपांतर आळसामध्ये झाले होते. या आळशी वृत्तीमुळे त्याला जे काम करायचे होते ते काम तो आळशीवृत्तीने किंवा कामातील पळवाटा शोधून कस बस पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. दिवस भरत होता. घोड्याच्या डोळ्याला बांधलेल्या झापडीसारखे जीवन झाले होते. त्या कामापासून पुर्णतः तो असमाधानी, निरुत्साही, निराशेने ग्रासलेला वाटत होता.
आज आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्तींमध्ये अशा प्रकारची वृत्ती वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. या आळशी वृत्तीपासून दूर राहायचे असल्यास एकमेव उपाय आहे तो म्हणजे, ‘जे कोणते काम तुमचे पोट भरण्याचे किंवा जीवन जगण्याचे, उदरनिर्वाहाचे साधन आहे, त्या कामावर कसल्याही प्रकारचा आळस किंवा कोणत्याही प्रकारच्या पळवाटा न शोधता ते काम प्रामाणिकपणे करणे.’ त्यावर मनापासून प्रेम करणे आणि ते काम अधिक उत्साहाने करायला हवे, त्यापासून मिळणारे समाधान हे नक्कीच भविष्यकाळात अनेक ठिकाणी उपयोगी पडते.
तुम्ही ज्याप्रमाणे एखाद्या कामामध्ये उत्साह दर्शविता त्याचप्रमाणे त्यातून मिळणारे यश देखील अवलंबून असते. अनेक व्यक्ती नवीन पिढीला काही कळत नाही, असे समजतात. परंतु तरुण पिढीही वास्तवदर्शी आणि प्रथम कशाला प्राधान्य द्यावयाचे? यामध्ये खूपच कौशल्यपूर्णतेचा उपयोग करत असतात. त्याचाच परिणाम अनेक मोठमोठी कामे आज खूप लहान वयातील मुले-मुली यशस्वीरीत्या पूर्ण करताना दिसत आहेत.
2008 मध्ये पार पडलेल्या झालेल्या ऑलम्पिक स्विमिंग चॅम्पियनशीपला अमेरिकेच्या तरुणाने 8 गोल्ड मेडल मिळविले होते. व्यक्तीला स्वतःचा आयडल मानणाऱ्या एक मुलाने 2016 मधील ऑलम्पिक स्विमिंग स्पर्धेमध्ये हरवत स्वतः स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे. स्वतःच्या कामावर आणि ध्येयावर अचूक लक्ष केंद्रित करून ते यशस्वीरीत्या पूर्ण करत असताना पहावयास मिळते.
यशासाठी स्वतःच्या ध्येयावर किंवा कामावर प्रेम केले पाहिजे. जे काम दररोजचे आहे ते दररोज नवनवीन पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादा निर्णय घेत असताना तुम्ही आळस करत असाल, तर त्यातून तुम्हाला कधीही समाधान मिळू शकत नाही. त्यासाठी आळशी वृत्ती आणि आळशी व्यक्तीपासून नेहमी दूर राहा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि तुमचे आयुष्य समाधानी होईल.
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.
-   मंगेश विठ्ठल कोळी.
-   मो. ९०२८७१३८२०
-   ईमेल – mangeshvkoli@gmail.com

Wednesday, July 17, 2019

डिपेंडींग नकोच...

डिपेंडींग नकोच...
आज सायंकाळी ऑफिसमधून लवकर घरी आलो फ्रेश झालो, निवांत व शांततेत गच्चीवर येऊन सायंकाळची थंड हवेचा आनंद लुटत बसलो होतो. बऱ्याच दिवसापूर्वी एका ठिकाणी समुपदेशन करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळचा एक प्रसंग माझ्या लक्षात आला, आज समाजामध्ये अनेक व्यक्तीपेक्षा मी तर अस म्हणेन की, प्रत्येकाला इतरांच्यावर ठराविक कारणांसाठी अवलंबून रहावेच लागते हे ठिक आहे. परंतु छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांच्यावरती अवलंबून रहावे लागणे. पुढे जाऊन त्याची सवयच अंगी जडली की मानवाची प्रगती खुंटायला सुरुवात होते हे तितकच वास्तव आणि सत्य आहे.
ज्या गोष्टी आपण सहज करू शकतो त्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळा आपण इतरांना हुकुमशहा सारखे हुकुम करून करून घेतो. त्यावेळी ज्या ज्या व्यक्ती तुम्हाला मदत करतात. ते त्यांच्यातील तुमच्याविषयी असणारे प्रेम, आपुलकी किंवा तुमच्याशी काही कालावधीसाठी बांधील असतात म्हणून त्या करत असतात. त्या पाठीमागे त्यांचा दुसरा कोणताही भाव नसतो. परंतु जी व्यक्ती अशा प्रकारच्या हुकुम सोडतात त्यावेळी त्यांचा थोडासा का होईना पण अहंम (EGO) जागा झालेला असतो, मदत करणाऱ्या व्यक्ती आपल्याला घाबरतात असा त्यांचा निव्वळ गैरसमज असतो.
आपण जी कामे सहजपणे करू शकतो, ती सुद्धा करत नाही. त्यातून आपल्या आळशी स्वभावात वाढ होत असते. त्याच बरोबर त्याची वाईट सवयीमध्ये रूपांतर होत असते. आपण कोणतेही काम करत असताना नेहमी इतरांच्या मदतीची अपेक्षा करण्याची सवयच अंगी जडवून घेत असतो. या सर्वांचा एकच परिणाम होत असतो तो म्हणजे आपणाला जे काही यश मिळते त्यामध्ये भागिदारांची संख्या वाढत असते.
प्रसिद्ध तज्ज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन असे म्हणतात की, “मी त्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे, ज्यांनी मला कामामध्ये मदत केली नाही.” त्याचा फायदा म्हणजे ती कामे मी स्वतः करू शकलो, त्यातून मिळणारा अनुभव प्रत्यक्ष मला घेता आला. ते काम करत असताना मिळणाऱ्या यशामध्ये कोणीही भागिदारी नव्हता. प्रत्येकाने सुद्धा आपली दैनंदिनी आठवा. सकाळी झोपेतून जागे होण्यापासून ते रात्री झोपे पर्यंत स्वतः करू शकणारी कामे कोणकोणती आहेत. याची एक यादीच तयार करा, त्यापैकी जास्तीत जास्त कामे स्वतः एकट्याने करण्याचा प्रयत्न करा. ते काम पूर्ण केल्यानंतर जो आनंद मिळतो, त्याचे कशातच मोल नसते.
स्वतःला सर्वच कामामध्ये झोकून देऊन, मन लावून काम करण्याची सवय लागली पाहिजे. त्याचबरोबर इतरांवर कमीत कमी अवलंबून रहावे लागेल अशी सवय अंगी जडली गेली पाहिजे. असे केल्याने आळशी किंवा अवलंबून राहण्याची वाईट सवय आपोआप दूर होते आणि उत्तम प्रकारचे यश तुम्हाला मिळू शकते. एकदा याची सवय झाली की, यशाची प्रत्येक पायरी आपण सहजपणे चढू शकतो. अशा छोट्या छोट्या पायरी वरून आपण खूप मोठी यशाची शिखरे सहज सर करू शकतो. तर आज आणि आतापासूनच इतरांच्या वरती अबलंबून राहणे कमी करा व दररोज एक तरी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा. जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल.
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.
श्री. मंगेश विठ्ठल कोळी.
मो.- ९०२८७१३८२० ईमेल – mangeshvkoli@gmail.com

Sunday, July 7, 2019

स्वत: ला काय समजतात?



स्वत: ला काय समजतात?

समाजामध्ये अनेक व्यक्तींचे वर्तन हुकुमशाहसारखे झाले आहे. स्वत: एखाद्या पदावर असणे म्हणजे आपण सर्वेसर्वा आहोत, मालक आहेत असे वाटते. कोणतेही गैर वर्तन किंवा समाजाला सामान्य जनतेच्या दिखाव्यासाठी सरळसरळ कायदा हातात घेणे, कितपत योग्य आहे. याचे भान ही न बाळगता अनेक गैरवर्तन राजरोसपणे करत आहेत. सामान्य जनतेचे प्रश्न शासन स्तरावर योग्य रीतीने राबविण्यासाठी रात्रीचा दिवस करून, कष्ट करून व अभ्यास करून स्वत:च्या हिमतीवर एखाद्या पदावर पोहचतात. जास्तीत जास्त प्रामाणिक राहून जनतेची सेवा करण्याऱ्या अधिकारी वर्गाला आज चांगले काम करताना सामान्य जनतेचे समस्या मांडण्यासाठी प्रतिनिधी म्हणून  निवडून दिलेल्या राजकारणी व्यक्ती अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन करतात. तसेच अधिकाऱ्याला धक्काबुक्की करणे, मारहाण करणे, त्यांच्यावर शाई फेकणे, चिखल फेकणे, अधिकाऱ्यांना कोंडून ठेवणे, बांधून घालणे, भर रस्त्यात त्यांना शिविगाळ करणे असे समाज विघातक कृत्य करण्याचा अधिकार अशा व्यक्तींना कोणी दिला किंवा हे लोक प्रतिनिधी असणारे राजकारणी मंडळी नक्की स्वत:ला काय समजतात? सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळ टाकून ठराविक अधिकारी हाताशी बाळगून सामान्य जनतेला, अधिकारी वर्गाला दिला जाणारा त्रास केव्हा थांबविणार?  याचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. तरच उत्तम अधिकारी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी निर्भीडपणे आणि चांगले निर्णय घेऊ शकतील.

-    श्री. मंगेश कोळी, मो.– ९०२८७१३८२०