Sunday, April 30, 2017

उन्हाळ्याच्या सुट्टीत कोठे जाण्यास आवडेल?



दोन दिवसापूर्वी मी माझ्या मित्र परिवाराला एक प्रश्नार्थक मेसेज केला होता की, “तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणत्या ठिकाणी जाण्यास आवडेल?” आपल्या प्रतिक्रिया मला पाठवा. या प्रश्नार्थक मेसेजला भरभरून प्रतिसाद दिल्या बद्दल मी सर्वांचे आभार मानतो. अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणांची नावे लिहून पाठवली तर काही व्यक्तींनी मला प्रश्न केला की, मी हे सगळे का विचारात आहे? तर काही व्यक्तींनी मला मजेशीर पद्धतीने उत्तरे पाठविली ती अशी तुम्ही खर्च करत असाल तर कोठेही जाऊया, तुमच्या घरी यायला आवडेल वगैरे वगैरे...
या सर्व प्रतिक्रियामधील काही प्रतिक्रिया खूप विचार करण्यासारख्या होत्या. कधीही न गेलेल्या ठिकाणी जाण्यास आवडेल, काहीना शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्यास आवडेल, काही व्यक्तींनी त्यांच्या आवडत्या व्यक्तीकडे (उदा. आजी-आजोबा, काका, आत्या, मित्र-मैत्रिणी किंवा मामाच्या गावाला जाण्यास आवडेल) अशा प्रतिक्रिया पाठवल्या. त्यावेळी मला लहानपणीचे एक बडबड गीत आठवले. “झुक-झुक झुक-झुक अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया.” या गीतामधून अनेकजण लहानपणीच्या दिवसामध्ये आजही काही काळ रेंगाळताना दिसतात.
या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस स्वत:चे आरोग्य विशेषत: मानसिक तणावाखाली जगताना दिसत आहे. थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून सुट्टीच्या काळात आवडत्या किंवा मन प्रसन्न होण्यासाठी आणि नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी धडपडत करत आहे, असे अनेकांच्या प्रतिक्रीयामधून जाणवले. नवनवीन तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर बदलत आहे. काही वर्षापूर्वीचे दिवस आणि आजचे दिवस पहिले तर आपल्या लक्षात येईल की, खूप कमी कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होत चालला आहे.
बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सर्वांनी मान्यही करायला हवा. बदलत्या तंत्रज्ञानामुळे मानवाची सुख-शांती, समाधान, आनंद आणि उत्साह हरवत चालल्याचे स्पष्ट चित्र सर्वत्र पाहत आहे. तंत्रज्ञान ही जरी काळाची गरज असली, तरी आज ती मानवाची सवय किंवा व्यसन होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे “मोबाईल ही आजची गरज राहिलेली नसून, ते व्यसन झाले आहे.” त्यामध्ये लहानापासून ते वृद्धांपर्यंत गुरफटत चाललेले दिसतात.
मी विचारलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाला मिळालेली उत्तरे यानुसार अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्यास आवडेल असे दिसून येते. जेव्हा फिरायला जातो किंवा एखाद्या व्यक्तीला भेटायला जातो, त्यावेळी मनमोकळेपणाने बोलण सुद्धा करत नाहीत किंवा ज्या ठिकाणी फिरायला जातो, तिकडचा आनंद घेण्याऐवजी स्वत:चा सेल्फी काढण्यात किंवा इतरांचे फोटो काढण्यात जास्त वेळ खर्च करतो. ज्या व्यक्ती बरोबर फिरायला जाता त्यांना सुद्धा जास्त वेळ बोलण्यापेक्षा मोबाईलमध्ये जास्त वेळ व्यस्त असल्याची अनेक उदाहरणे पाहता येतील. खूप दिवसांनी एकत्र आलेले मित्र-मैत्रीण किंवा नातेवाईक सुद्धा आपापल्या हातामध्ये मोबाईल घेऊन व्यस्त असल्याचे चित्र पाहतो आणि अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी किंवा दररोज अनुभव घेत असतो.
वरील चित्र बदलायचे असल्यास त्याची सुरुवात स्वत:पासून आणि आताच्या वेळेपासून करायला हवी. एखाद्या वस्तू किंवा इतर कोणतीही गोष्ट असो तिची इच्छा असणे अगदी योग्य आहे परंतु त्याचे रूपांतरण जर तीव्र इच्छामध्ये झाले, तर तो हव्यास होतो. असा हव्यास मानवाला कधीही समाधान देत नाही. त्यापासून नकारात्मक भाव किंवा निराशा वाढत जाते. ज्या ठिकाणी आणि ज्यासाठी तुम्ही कोठेही गेलात तिकडे फक्त त्याच गोष्टीसाठी वेळ द्या. जीवनाचा आनंद लुटा आणि इतरांनाही आनंदात सहभागी करून घ्या.
धन्यवाद....
मंगेश विठ्ठल कोळी.
मो. ९०२८७१३८२०

Sunday, April 16, 2017

डिनर With…???



          सकाळी मला एका मित्राने एक व्हिडीओ पाठवला होता. तो पाहून मी त्याला फोन केला आणि विचारले कि, जो व्हिडीओ तू पाठवला आहेस त्यातून तुला नक्की काय सांगायचं आहे? त्यावर तो म्हणाला, काही नाही रे मला आवडला म्हणून मी पाठवला आहे. काही वेळात त्याचे आणि माझे संभाषण संपले. परंतु मला त्या व्हिडीओमधील सारांश लक्षात आला कि, काही व्यक्ती इतरांना सांगण्यात आणि स्वतःच्या वर्तनात फरक असताना सुद्धा वरवरचा चांगुलपणा टिकवण्यासाठी, मिळवण्यासाठी तसे वागत असतात.
          अनेक व्यक्तींना हेच सांगत आहे कि, आपण जे इतरांना सांगतो त्याचा सर्वप्रथम स्वतः उपयोग किंवा वापर करा. मी दोन दिवसापूर्वी माझ्या सर्व सहकाऱ्यांना व्हाटस अॅपच्या माध्यमातून एक साधा प्रश्न विचारला होता. तो म्हणजे, “आपण रात्रीचे जेवण सर्वाधिक कोणासोबत करू इच्छिता? कोण असेल?” आपल्या प्रतिक्रिया मला ९०२८७१३८२० या क्रमांकावर पाठवा. असंख्य व्यक्तींनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. अजून हि काही व्यक्ती प्रतिक्रिया पाठवत आहेत. त्या सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानतो.
          वरील प्रश्न केल्या नंतर अनेक व्यक्तींच्या प्रतिक्रियेनुसार जवळपास ९० टक्के लोक रात्रीचे जेवण हे आपल्या फॅमिली / कुटुंबासोबत घेऊ इच्छित आहेत. तर बोटावर मोजण्या इतपत व्यक्ती या मित्र-मैत्रिणी किंवा त्यांच्या खास व्यक्ती बरोबर घेऊ इच्छित आहेत. काही व्यक्तींनी नाव सांगितले तर काहींनी नाही. ज्या व्यक्ती आपले रात्रीचे जेवण आपल्या परिवारासोबत घेऊ इच्छितात, त्यांचे खरचं कौतुक करावसं वाटत आहे. त्याचे कारण म्हणजे या व्यस्त जीवनात किमान थोडा वेळ तरी ते कुटुंबाचा विचार करत आहेत.
          काही व्यक्ती आपल्या परिवारापासून दूर असतात. त्यामुळे त्यांना वाटत असते कि, आपण दररोज आपल्या माणसात बसून जेवण करूया. कारण असे म्हणतात कि, “दूर राहिल्याशिवाय आपल्या माणसांची किंमत कळत नाही.” रात्रीचे जेवण आपल्या परिवारासोबत घेण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या अनेक व्यक्तीमध्ये आपल्याला एक गोष्ट जरूर पहावयास मिळते. ती म्हणजे ज्यावेळी ते आपल्या परिवारासोबत जेवण घेत असतात. त्यावेळी ते स्वत:मध्ये एवढे गुंतलेले असतात कि, फक्त नावाला ते उपस्थित असतात.
          अनेकजण रात्रीचे जेवण करत असताना एका हातात मोबाईल किंवा टीव्हीचा रिमोट असतो. त्या जेवणावर आणि शेजारी बसलेल्या व्यक्तींकडे त्यांचे लक्षच नसते. मग अशा जेवणाचा किंवा परिवारासोबत जेवणाचा काहीही उपयोग नाही. आपण गर्वाने सर्वाना सांगतो कि, मी माझ्या कुटुंबासोबत जेवतो. परंतु त्या शरीराने फक्त कुटुंबात असून काय उपयोग. मनाने आपण त्यांच्या बरोबर असणे हि आज काळाची गरज बनत चालली आहे. किती तरी वेळा भाजी चांगली झाली नाही म्हणून किंवा आपल्या आवडीची भाजी नाही म्हणून आणि सकाळपासून आपल्या सोबत ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा राग काढण्याचे ठिकाण म्हणून आज रात्रीचे जेवण प्रसिद्ध होत आहे.
          आपण वाईट वाटून घेऊ नका. परंतु आज ही आपल्या समाजात वाढत चाललेली वाईट परिस्थिती आहे. आपल्या परिवारामध्ये लहान बालके असतात, ती बालके मग आपलेच अनुकरण करत लहानाची मोठी होत असतात. पुढील पिढी उत्तम घडविण्यासाठी आपण स्वत: मध्ये काही छोटे-छोटे बदल केले तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या परिवारासोबत / कुटुंबासोबत किंवा आपल्या प्रिय व्यक्ती सोबत आनंदाने, उत्साहाने राहू शकतो. पुन्हा एकादा मी सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो.
      धन्यवाद.....
-    मंगेश विठ्ठल कोळी.
-    ९०२८७१३८२०

Thursday, April 6, 2017

संयम आणि प्रगती




कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.
मग तुमच्यावर आरोप होतात गैर व्यवस्थापनाचे, गैर कारभाराचे, भ्रष्टाचाराचे! तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला शब्द वाढतात.... त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते. सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते.
त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतिबिंब ठरू लागतील, तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. तर ही शहाणी, समंजस पणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो.
यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. ' हेचि फल काय मम तपाला ' ? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही. कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे? वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.
आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते. शेवटी काय तर ''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू  शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,, ''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,, ''लोक तर देवाला पण नाव ठेवतात.

बदनाम - मरीन ड्राइव




जगातील गतिमान शहरातील एक शहर म्हणून मुंबई ओळखले जाते. गेली तीन महिने झाले त्याचा अनुभव मी घेत आहे. तुम्ही एकदा मुंबईमध्ये म्हणजेच स्वत:ला स्वत:च्या कामामध्ये व्यस्त करून घेतले कि, मग नवीन काही करण्याची इच्छा मरण पावल्यासारखी अवस्था होते. माझीही अवस्था तशीच झाली होती. मी दररोज ठरवत होतो कि, आज काही तरी नवीन करायचे परंतु या व्यस्त करून घेतलेल्या जीवनात मी स्वत:ला हरवत चालल्याची चिंता मला सतावत होती. आज ठरविले कि, काहीतरी नवीन करायचे पण नक्की काय करायचे हे मला स्वत: देखील माहित नव्हते. आठवड्याचे दररोजचे रुटीन वर्क सुरु होते. मी हि त्या रुटीन वर्कमध्ये खूप व्यस्त झालो होतो. आज ऑफिसच काम लवकर आटपल. घरी जाण्यासाठी ही खूप वेळ होता. ऑफिसमध्ये विचारले मंत्रायालच्या जवळपास काही पाहण्यासारखे आहे का? असा प्रश्न विचारताच अनेकांनी मरीन ड्राइवला जा असे सांगितले.

मंत्रालयाच्या बाजूला असणाऱ्या मरीन ड्राइवला गेलो. यापूर्वी अनेकांच्याकडून मरीन ड्राइव बदल त्यांची मते ऐकली होती. त्यापैकी अनेकांची मते ही मरीन ड्राइवला बदनाम करणारी होती. त्यांच्या मते मरीन ड्राइवला फिरायला जाणारे म्हणजे फक्त प्रेमवीरच असतात किंवा ज्यांना काही काम नसते ते लोक तिकडे जातात. परंतु मी जेंव्हा मरीन ड्राइववर पहिले पाऊल टाकले तेंव्हा मात्र वेगळाच अनुभव आला. अनेकांच्या बोलण्यातून, ऐकण्यातून आणि वर्णनातून मला माहित झालेला मरीन ड्राइव आणि माझ्या नजरेसमोर प्रत्यक्ष असणारा मरीन ड्राइव हा मात्र निराळाच होता. अथांग असा निळाभोर समुद्र आणि त्याच्याकडेने अर्ध गोलाकार दिसणारा नयनरम्य असा विशाल मरीन ड्राइव मी पाहत होतो.

मरीन ड्राइव वरती मी समुद्राच्या दिशेने तोंड करून निवांत बसलो होतो. खूप छान आणि थंड वाऱ्याचा अनुभव घेत होतो. या उन्हाळ्यात शरीराला सुखावणारा वारा स्पर्श करून जात होता, असा अनुभव माझ्या जीवनात पहिल्यांदाच घडत होता. काही वेळ तिकडे बसलो, हळूहळू सूर्य मावळतीला जात होता तसतशी तिकडे माणसांची वर्दळ वाढत होती. अनेक युवक-युवती, त्याच प्रमाणे ऑफिसमधून कंटाळा घालविण्यासाठी येणारे लोक देखील होते. आपल्या कुटुंबासह फिरायला येणाऱ्या व्यक्तींचीही मोठी संख्या होती. लहान मुले मनसोक्त धावत होती एकमेकाचा पाठलाग करत होती, आणि मोठ मोठ्याने हसत होती. त्याच वेळी तिकडून एक खूप उंच जवळपास सात-साडेसात फुट उंची असलेला व्यक्ती पायी चालत जात होता. अनेकजण त्याच्या बरोबरचे अविस्मरणीय क्षण आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेत होते.

मुंबई सारख्या वर्दळीच्या ठिकाणी राहणे खूप कठीण आहे. त्यातूनही आनंद लुटण्यासाठी आणि मनसोक्त गप्पा करण्यासाठी अनेक जण तिकडे आले होते. अनेकजणांचे चेहरे हसरे होते, तर कोठे तरी डोळ्यात पाणी तरळताना दिसले. अनेक जण स्वत:च्या शरीर निरोगी राहण्यासाठी इव्हिनिंग वॉकसाठी आले होते तर काहीजण धावत देखील होते. मरीन ड्राइव एक असला तरी आपण त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा हे स्वत:वर अवलंबून असते. असे आहे कि, “समुद्र एकच असतो काहीजण दुरून पाहण्यात आनंद घेतात, काहीजण जवळ जाऊन पाय ओले करून आनंद घेतात तर काहीजण त्यात मनसोक्त पोहून त्यातील मोती वेचतात. त्याच पद्धतीने मरीन ड्राइव सुद्धा आहे, त्याच्यापासून आपण काय घ्याचे ते स्वत: ठरवा. उगाचच बदनामीचे बोल लाऊन त्याचे सौंदर्य खराब करू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे.

मंगेश विठ्ठल कोळी.
मो.- ९०२८७१३८२०

Sunday, April 2, 2017

दिनांक १ एप्रिल २०१७ व्यक्तिमत्व विकास हे साप्ताहिक सविस्तर वाचण्यासाठी......

सकारात्मक दृष्टीकोन....




काल १ एप्रिल २०१७ रोजी सकाळी मी जवळपास ४ हजार व्यक्तींना एक मेसेज पाठवला होता. तो असा कि, “आज प्रत्येकाने स्वत: बद्दलचा एक सकारात्मक (Positive)  विचार मला (९०२८७१३८२०) पाठवा.” रात्री पर्यंत त्या ४ हजार व्यक्तींपैकी बोटावर मोजण्या इतपत व्यक्तींनी मला त्यांच्या बद्दलचा सकारात्मक विचार पाठविला. ज्या व्यक्तींनी मला सकारात्मक विचार पाठविले त्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो.
ज्या व्यक्तींनी मला स्वत: बद्दलचा सकारात्मक विचार पाठविले त्यातील काही मोजके विचार अनेकांचे विचार बदलण्यास नक्कीच मदत करतील. असे म्हणतात कि, आपण असे विचार मांडले पाहिजेत कि आपला विचार वाचून समोरच्याने नक्कीच विचार केला पाहिजे. या प्रमाणे पुढील काही विचार मी आपणा पुढे मांडत आहे.
१)      Positive is my strength.
२)      मला नेहमी माझ्या आवडीचे काम करताना उत्साह, आनंद जाणवतो, प्रत्येक घटनेतील सकारात्मकता शोधायला आवडते.
३)      एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळत नसेल तर दुसऱ्या मार्गाने प्रयत्न करा यश नक्की मिळेल.
४)      माझं माझ्यावर खूप प्रेम आहे.
५)      चेहऱ्यावर हास्य ठेवायचे जेणे करून समोरच्याला पान आनंद वाटायला हवे, समोरच्याची चांगली गोष्ट पाहणे.
६)      १०० present I will become a class one officer.
वरील विचार वाचले ज्या व्यक्तींनी मला स्वत: सकारात्मक विचार पाठविले ते स्वत: बद्दल खूपच जागरूक आहेत असे दिसते. ज्या व्यक्तींनी विचार नाही पाठवले त्याची हि वेगवेगळी करणे असू शकतील त्यातील काही करणे म्हणजे सर्वात पहिले कारण इगो (EGO) असू शकते म्हणजे हा कोण आहे कि सर्वाना सकारात्मक विचार पाठवा म्हणून सांगणारा? आणि दुसरे म्हणजे काही व्यक्तींनी टाळाटाळ केली असेल, काहीना ते एवढे आवश्यक वाटले नाही. 
काल दिवसभरामध्ये अनेक व्यक्तींनी मला नको असलेले किंवा फालतू जोक पाठविले. कोणी कोणी तर एप्रिल फुलचे इतरांनी पाठविलेले मेसेज न वाचताच पाठवत होते. मी कोणी मोठा व्यक्ती नाही किंवा मी म्हणालो म्हणून तुम्ही मला विचार पाठवलेच पाहिजेत असा आग्रह देखील केलेला नाही फक्त मला हे जाणवून द्यायचे होते कि या व्यस्त आणि धकाधकीच्या वेळेत स्वत:ला हरवत चाललो आहेत याची कल्पना असू द्या.
आपण दिलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद.....
-          मंगेश विठ्ठल कोळी.
    ९०२८७१३८२०