Thursday, February 7, 2019

दृष्टिकोनाचा परिणाम....

काही दिवसापूर्वी माझ्या मोबाईलवर एक फोटो कोणीतरी पाठवला. खूप सुंदर असा तो फोटो होता. एक लहान मुल एका व्यक्तीच्या पायावर निवांत विराजमान होऊन जगाकडे पाहत आहे. त्यानंतर त्या फोटोचे मी बारकाईने निरीक्षण केले तर त्या फोटोमधून वेगवेगळ्या प्रकारचे संदेश मला मिळू लागले. जस जसे त्या फोटोकडे मी वारंवार पाहत गेलो, त्या त्या वेळी मला नवीन संदेश मिळत होते. माझ्या लक्षात येईना की, नक्की त्या फोटोमधून कोणते संदेश घ्यायचे आणि कोणते सोडायचे. काही संदेश हे सकारात्मक होते, काही नकारात्मक होते. काही वरवरचे होते, तर काही मनाला भिडणारे होते.
माझ्याच बाबतीत असे का होते आहे? या प्रश्नाचे मला कोडे पडले होते. चित्र एकच आहे, परंतु त्यातून संदेश वेगवेगळे जाणवत होते. असे कसे होईल असा प्रश्न मला पडला. मग मी ठरविले की, माझ्या जवळच्या व्यक्तींना हे चित्र पाठवून त्यांचा त्या चित्राकडे पाहण्याचा नक्की दृष्टीकोन कसा असेल हे जाणून घेऊया. मला जे वाटते किंवा संदेश मिळत आहेत ते त्यांना ही मिळतात का? हे पाहण्यासाठी मी तो फोटो पाठवला. फोटो पाहताच मनातून येणारी पहिली प्रतिक्रिया द्या असे ही सांगितले. थोड्या वेळेतच प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली. त्यातील काही प्रतिक्रिया खालील प्रमाणे आहेत.
१)  सुंदर दिसणार, सुबक शिखर हे सुद्धा ओभड धोबड दगडा धोंड्यांच्या पायावर उभे असते. तसे आजचे आपले यश, कीर्ती किंवा नाव हे आपल्या आई वडिलांच्या कष्टाच्या आणि त्यांच्या निस्वार्थ परिश्रमाच्या पायावर उभे आहे.
२)  भेगाळलेल्या पावालांवर भविष्य सुखमय बालकाचे, सोसून हालअपेष्टा करती मायबाप यशस्वी जीवन लेकाचे.
३)   मायेची पाऊले खपती अन बाळाची पाऊले जपती.
४)   माय माऊली.
५)   मुलांचे पायाला जख्मा होऊ नयेत म्हणून पालक स्वत: त्रास सहन करतात.
६)   शेतकऱ्याचे कुटुंब.
७)   वडिलांची छत्र छाया असताना, आधार खूप मोठा असतो.
८)   मुलांच्या सुखासाठी आई वडील स्वत: झिजत असतात.
९)   आजीची माया नातवाची काळजी.
१०) सुरुवात आणि शेवट.
११) कभी भी अहंकार मत करो.
१२) लाखमोलाच्या सिंहासनावर बसलेला घरचा राजकुमार.
१३) आपल्या लेकरासाठी दिवसभर काबाड कष्ट करून आलेल्या एका बापाचे पाय आहेत.
१४) बाळाच्या भविष्यासाठी दरिद्रता आहेत का? अशी शंका वाटते.
१५) शेतकरी आजोबा व मुलगा.
१६) dad is great.
१७) कष्टाच्या पावलावर भविष्याचे पाऊल.
१८) स्वत:पेक्षा मुलाची काळजी घेणारा आणि जिवंत असेपर्यंत मुलाला काटे टोचू न देणारे वडील.
१९) मुलांना सुखी ठेवण्यासाठी बाप किती कष्ट करतो ते दिसते या फोटोत.
२०) कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है.
२१) आबाल वृद्ध.... पिकले पान कधीतरी गळणारच.
२२) मुलांच्या सुखासाठी झिजतात वडिलांचे पाय.
२३) मुलांसाठी बाप काहीही करू शकतो.
२४) लहानपण दे गा देवा.
२५) मुलावरची माया.
२६) वडिलांच्या पायावर पाय ठेऊन बसलेला मुलगा.
२७) मागे आई बसली आहे, तिच्या पायावर मुलगी बसली आहे.
वरील प्रतिक्रिया वाचल्यावर माझ्या असे लक्षात आले की, प्रत्येकाचा त्या चित्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगवेगळा आहे. कोणाला त्यात त्या मुलाचे वडील दिसले तर कोणाला कष्टकरी शेतकरी दिसला, तर कोणाला पिकलेले पान वाटले तर कोणाला आपल्या पाल्याचे भविष्य उत्तम घडण्यासाठी कष्ट करणारे पालक दिसले. हा फक्त पाहण्याचा दृष्टीकोन नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वातावरणाचा त्यावर प्रभाव पडत असतो. आपण कोठे राहतो, कोणत्या व्यक्ती आपल्या आसपास आहेत, ते कसा विचार करतात, त्यांच्या विचारांचा आपल्या जीवनावर नकळत होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा समावेश मला त्यात दिसून आला हे वेगवेगळे दृष्टीकोन आपल्या व्यक्तिमत्व घडवताना आपल्याला फार उपयोगी पडत असतात.
पालक आपल्या बालकावर सुसंस्कार करत असतात, तेव्हा प्रत्येकाने आसपास असणाऱ्या वेगवेगळ्या दृष्टिकोनाचा त्यावर होणारा वैचारिक परिणाम स्पष्ट जाणवतो. सर्वांनी समुद्र पाहिला असेल, त्याच्याकडे पाहिले तर काय दिसेल त्यावर अनेक व्यक्तींच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात. कोणाला लांबून समुद्र छान वाटतो, काहीजण त्याच्या किनारी जाऊन त्याच्याकडे पाहून, त्यातून बाहेर फेकला जाणारा कचरा पाहून दुर्गंधीयुक्त असलेला समुद्र पाहतात. काही व्यक्तीं गुडघ्याभर पाण्यात जाऊन समुद्र छान वाटतो तर काही जणांना त्याच्या तळाशी जाऊन मोती वेचण्याचा प्रयत्न करतात.
चित्र जरी एकच असले तरी त्यातून मिळणारे संदेश किंवा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत जीवनात अनेक गोष्टी घडत असतात. फक्त आपण त्याकडे कसे पाहतो तसे ते आपल्याला जाणवत असतात आणि तशीच विचारसरणी निर्माण होत असते. हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन पाहायला हवे. त्यातून निर्माण होणारे विचार आपणाला जगण्यास नवी उमेद देत राहतात. जीवन खूप सुंदर आहे त्याला आणखीन सुंदर बनवण्याचा दृष्टीकोन असायला हवा.
-    मंगेश कोळी, मो. ९०२८७१३८२०