Thursday, March 30, 2017

रांगेतील मुंबई - एक अनुभव




माझा मुंबई मधील पहिला दिवस. जयसिंगपूरमधून आरामदायी खासगी बसने प्रवास सुरु झाला. बस हळूहळू मुंबईच्या दिशेने पुढे जात होती सांगली-कराड-सातारा-पुणे-मुंबई असा प्रवास करीत मुंबईमध्ये पोहोचलो. पहाटेच्या साडेपाच वाजले होते गाढ साखर झोपेत असतानाच बसमधील एक मुलगा ओरडला चला व्हीटी कोण आहे त्यांनी येथे उतरायचं आहे. मला दचकल्यासारखे झाले अचानक गाढ झोपेतून उठलो. सर्व समान एकत्रित केले आणि बसमधून खाली उतरलो.

मुंबईमध्ये पहिले पावूल टाकले. थोडस पुढे चालत गेल्यानंतर एका व्यक्तीला विचारले मंत्रालायला जवळील आमदार निवासकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे? त्यावर तो व्यक्ती म्हणाला इकडून खूप दूर आहे आणि माझ्याकडील सामानाचे ओझे पाहून त्यांनी मला टॅक्सी करून जाण्याचा सल्ला त्यांनी दिला. मग मी टॅक्सी शोधण्याचा प्रयत्न करू लागलो टॅक्सी मिळण्याचे ठिकाण सापडले. परंतु एवढ्या सकाळी टॅक्सी साठी एका मागून एक असे जवळपास दहा ते पंधराजण एका रांगेत उभे असल्याचे दिसून आले मी एका व्यक्तीला विचारले टॅक्सी येथेच मिळेल का? तेंव्हा ते म्हणाले हो रंग त्यासाठीच आहे. तेंव्हा मला मुंबईतील पहिल्या रांगेचा अनुभव आला.

टॅक्सीने आमदार निवास जवळ पोहोचलो तेंव्हा पासेस दाखविण्यासाठी तिकडे हि एक रंग होती. रूममध्ये गेलो फ्रेश झालो, मुंबई पाहण्यासाठी बाहेर पडलो. बसचे तिकीट काढले परंतु बसमध्ये प्रवेश करण्यासाठी सुद्धा एका रांगेतूनच जावे लागले. त्यानंतर मी दिवसभरामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो सर्वत्र रांगच रांग असल्याचा अनुभव मिळाला.

आज मुंबईत येऊन तीन महिने पूर्ण झाले. मला या तीन महिन्यामध्ये अनेक ठिकाणी फिरण्याचे / जाण्याचे प्रसंग आले मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिकडे मुंबईतील शिस्तीचा म्हणजेच रांगेचा अनुभव आला. सकाळी बसमधून प्रवासाबरोबर या रांगेची झालेली सुरुवात हि हळू हळू पुढे जात सकाळच्या नाष्ट्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत आणि सायंकाळी ऑफिस सुटल्यानंतर घरी पोहोचे पर्यंत सर्वच ठिकाणी रांगेतील मुंबईचा वेळोवेळी अनुभव येतो.

असे म्हटले जाते कि, “कोणत्याही शहराची ओळख हि त्या शहराच्या शिस्तबद्ध वागणुकीमुळे समजते” याचा प्रत्यक्ष अनुभव मी दररोज घेत होतो. आज ऑफिसला जाण्यास बाहेर पडलो चर्चगेट स्टेशन मधून बाहेर पडून रस्ता पार केला. तिकडे हि भली मोठी रांग मला पहावयास मिळाली मी ऐका व्यक्तीला विचारले कशासाठी हि रांग आहे तेंव्हा ते म्हणाले कि आम्ही सर्वजण ऑफिसला जाण्यासाठी टॅक्सीची वाट पाहत आहोत आणि प्रत्येक टॅक्सीमध्ये फक्त ४ व्यक्तीच जातात त्यामुळे हि रांग आणखीनच मोठी झाली आहे.

आज मला आणखीन एका रांगेचा अनुभव आला. खूप वर्षापासून ऐकले होते कि मुंबई हे खूप धावपळीचे आणि धकाधकीचे शहर आहे इथे जी व्यक्ती व्यवस्थित राहते ती जगाच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणी स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवते. मुंबई या महानगरीला माझा मनाचा सलाम.......

Tuesday, March 28, 2017

एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - गणपतराव कणसे.



     मी आज पर्यंत अनेक व्यक्तींना भेटलो, बोललो, अनेक व्यक्तींचा सहवास लाभला आहे. मी समुपदेशनच्या किंवा व्याख्यानाच्या माध्यमातून अनेक व्यक्तींशी माझा परिचय होत असतो.अनेक जेष्ठ, श्रेष्ठ, विचारवंत, लेखक, कवी, कादंबरीकार, लघुनाटिका लिहिणारे अशा अनेक प्रकारचे समाजातील तळागाळातील व्यक्तीपासून ते उच्च पदावर कार्यरत असणारे असे अनेक प्रकारचे लोक मला भेटत असतात. त्यांच्यातील चांगले गुण मला आत्मसात कसे करता येतील, याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. काही दिवसांपूर्वी कवितासागर प्रकाशनचे संस्थापक डॉ. सुनिल पाटील भेटले. त्यांनी श्री. गणपतराव रघुनाथराव कणसे सरांच्या कार्याचा उल्लेख केला. 
     मला अशा 60 वर्ष ओलांडून गेल्यावर सुद्धा कणसे सरांचे कार्य, त्यांचा उत्साह, त्याच बरोबर त्यांच्या विविध संकल्प पूर्तीची माहिती मिळाली आणि मी सरांना भेटण्याची उत्सुकता दर्शवली. योगायोगाने कणसे सरांनी केलेल्या कार्याची प्रचिती आली. काही दिवसापूर्वी श्री गणपतराव रघुनाथराव कणसे यांनी 12 मार्च 2012 ते 12 मार्च 2013 या कालावधीत म्हणजेच भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जीवनातील कष्ट करण्याची ताकद, उत्साह, खंबीर नेतृत्वगुण, सर्व समावेशक प्रगती आणि विकास या सर्वच गोष्टी आजही समाजासाठी अत्यंत आवश्यक आहेत. 
     समाजाला झालेला विसर पुन्हा नव्याने समाजाला सांगण्याचे काम कणसे सरांनी केले आहे आणि तेही स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म शताब्दी वर्षामध्ये 80 दिवसामध्ये विविध शाळा-महाविद्यालयामध्ये 208 व्याख्याने देण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम कणसे सरांनी केला आहे. 2015 साली या उपक्रमाची नोंद " इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस " या संस्थेने " इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस 2015" असा किताब कणसे सरांना बहाल केला. सरांनी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाले अस म्हणायला काहीही हरकत नाही. असे म्हणतात कि, कोणत्याही अपेक्षा शिवाय कोणाचे हि चांगले करण्याचा प्रयत्न करावा, कारण एक जुनी म्हण आहे. " जे लोक फुलेच वाटण्याचे काम करतात, त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो." 
     श्री गणपतराव कणसे सरांनी विविध पदे भूषविली आहेत. स्वतः ज्या शाळेत शिकत होते त्याच शाळेमध्ये अध्यापकाचे काम करून मुख्याध्यापक म्हणून सेवा निवृत्तीचा योग्य का फारच दुर्मिळ व्यक्तीच्या भाग्यात असतो. कोणतेही पद भूषविताना कणसे सर हे नेहमी समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो आणि जो प्रत्येकाजवळ असतोच असा नाही. असे सांगतात कारण अनेक समस्या ह्या न समजून घेतल्यामुळेच मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असतात हे खरे आहे. 
     कणसे सरांचे जीवन हे कुठल्याही इमारत सुरुवातीला साधा नकाशा असते, तुंहु आज कुठे आहात हे महत्वाचे नाही तर उद्या कुठे पोहचता हे अत्यंत महत्वाचे असते. अशा प्रकारचे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. नेहमी इतरांना सकारात्मक पद्धतीने सामावून घेण्यात आणि समजावून सांगण्याचे त्यांचे कौशल्य असे अबाधित राहो. फक्त स्वतः चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात परंतु जे सगळ्यांसाठी विचार करतात. त्यांची प्रगती कायम होतच राहते असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे श्री गणपतराव कणसे सर होय. 
     शेवटी एवढेच म्हणेन कि, आयुष्याला अर्थ आहे का नाही हे महत्वाचे नाही. आपल्या आयुष्यात आपण किती अर्थ भरतो हे महत्वाचे असते. म्हणून आपण अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगणारे कणसे सर यांना दीर्घायुष्य लाभो आणि पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो.

दिनांक 25 मार्च 2017 रोजीचा व्यक्तिमत्त्व विकास हे साप्ताहिक सविस्तर वाचण्यासाठी.

Wednesday, March 8, 2017

जागतिक महिला दिनानिमित्त....


जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.



भारतीय दंडसंहीतेचं कलम ३७७ समलैंगिक संबंधांना अनैतिक ठरवून त्यांना अजामीनपात्र आणि  दखलपात्र गुन्हा ठरवतं. आपल्या देशावर इंग्रजांचं परकी सरकार होतं तेव्हा वसाहतवादी शोषणाचं धोरण राबवणाऱ्या गोऱ्या सरकारनं मेकॉलेद्वारा भारतीय दंडसंहितेच्या माध्यमातून बुरसटलेल्या १९ व्या शतकातल्या 'व्हिक्टोरीयन' नैतिकतेचे बंध आपल्यावर लादले ! पण आता आपण स्वतंत्र आहोत. समलैंगिकता ही स्वाभिमानी राष्ट्राची गरज आहे. 



कारण आपल्या देशात घरात मुलीचा जन्म झालेला कुणालाच नकोय. सर्व घरांमध्ये मुलंच जन्मणार, मुली 'नकोशी' झालेल्या. की मग एका पिढीच्या आत समलैंगिकतेशिवाय पर्यायच उरणार नाही! मुलगी माझ्या घरात जन्माला यायला नको, पण शेजारच्या घरात मात्र जन्माला यावीच. हुंडा मिळण्याच्या कामी येते. आणि पुढच्या पिढीच्या कुलदीपकाचा जन्म कसा होणार? शिवाजी पण शेजारच्या घरात जन्माला यावा आणि मुलगी पण. माझ्या घरात मुलगाच जन्माला यायला हवा कुलदीपक.



मुलगी येणार असेल तर? टेन्शन नको. गर्भपात करता येतो. कायदा त्याविरुद्ध आहे? म्हणून काय झालं! कायदा काय भ्रष्टाचार अन् जातिभेदाविरुद्ध सुद्धा आहे. त्यानं काय थांबला का भ्रष्टाचार आणि जातीभेद? तसंच आहे. जन्माला येणारी जर मुलगी असेल तर निस्वार्थी भावनेनं आणि कायद्यापासून धोका पत्करून गर्भपात करणारे समाजसेवक स्त्री-पुरुष डॉक्टर आहेत की. त्यांनी 'हिपोक्रॅटीक' शपथ घेतलेली असते ना की रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मुलींचे गर्भ आम्ही पाडूच पाडू. शिवाय मुलीला जन्माला घालणाऱ्या आईला आपण अवदसा, पांढऱ्या पायाची म्हणतोच की. 



जन्माला येणाऱ्या बाळाचं लिंग पुरुषावरून - वडिलांवरून ठरतं असं विज्ञान सांगतं म्हणून काय झालं? बाई मुलीला जन्माला घालते म्हणजे समजते काय मेली चांडाळीण अवदसा घरभेदी. दोष सावित्रीचाच कशावरून, माझा कशावरून नाही असं दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले म्हणून गेले. त्याचं काय राव, तो काळ जुना होता, फुले महात्मा होते. आम्हाला चौकात आमचे पुतळे नकोत, घराण्याची परंपरा चालवणारा कुलदीपक हवा. मुलीला जन्माला येण्याचा हक्कच नाही. 



आलीच तर तिला बालपणीच मारून टाकली पाहिजे. थेट मारता आलं नाही तर कुपोषण, शिक्षणाचा अभाव, गुराढोरांचं हगणं-मुतणं काढ, वर्षाच्या वर्षाला जन्माला येणाऱ्या भाऊरायाला पाठुंगळी बांधून कंबरडं मोडून घे (नाहीतर तो भाऊराया वयात आला की तुझ्या कंबरड्यात लाथ घालणारच आहे उमराव जान!) असे अनेक उपाय आहेत. सूनबाई हुंडा आणायच्या कामी येते ना. आणला नाही किंवा आणून झाल्यावर तिचा बाप खंक झाला की तिला जाळून मारता येतं ना.  मुळात स्त्री इतकी समजूतदार आहे की ती जळून मारण्याची वेळ येऊ देत नाही, आपणहून दोर, पंखा, स्टोव्ह, विहीर यांना जवळ करते



उगीच नाही आपण ईश्वराचीही स्त्री रूपात पूजा करणाऱ्या संस्कृतीचे वारस आहोत. ती विश्वजननी असते, जगदंबा असते, आई भवानी असते. आपण पृथ्वीला धरती माता, देशाला भारत माता, गृहिणीला गृहलक्ष्मी म्हणतो! 'मातृदेवो भव' म्हणणारी संस्कृती आहोत आपण !! तिनं अमूर्त देवताच राहावं, मानव रूपात जन्म घेऊ नये.



पण सन्मानीय सुप्रीम कोर्टानं मोठ्या दूरदृष्टीनं ओळखलंय की आपण ज्या वेगानं प्रगती करतो आहोत ते पाहता लवकरच अनेक पुरुषांना स्त्री मिळणारच नाहीये ! त्यांना पुरुषावरच 'भागवून' घ्यावं लागणार. शिवाय लोकसंख्या नियंत्रणाचाही याहून प्रभावी दुसरा मार्ग तरी कोणता? म्हणून आत्ताच समलैंगिक संबंधांना संमती द्या कसे.



तरी स्थलकालाच्या मर्यादेत हे सुद्धा सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं 'पुरुषप्रधान' भाष्य झालं. याबद्दल, न जन्मलेल्या सर्व मुलींच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करून थांबतो.