Thursday, September 21, 2017

जागर स्त्री शक्तीचा.....



सर्वमंगल मांडूल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते ॥
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीयांचा आदर राखला जातो. याची सुरूवात नक्की कधीपासून झाली हे सांगणे कठीण आहे. भारतामध्ये राजे महाराजांच्या काळापासून ते आजच्या २१ व्या शतकात देखील स्त्रीयांना आदराचे स्थान आहे. असे म्हणतात की, 'नवनिर्माण करण्याची दैवी शक्ती फक्त आणि फक्त स्त्रीलाच दिली गेली आहे.१६ व्या शतकामध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य करण्यासाठी, सिद्ध होण्यासाठी आणि सक्षम बनवणारी व्यक्तीसुद्धा एक स्त्रीच होती. त्या म्हणजे त्यांच्या आई जीजामाता. नंतरच्या काळात १८ व्या शतकाच्या दरम्यान स्त्री चा जन्म हा चूल आणि मुल सांभाळण्यासाठीच झाला आहे, असे अंधश्रद्धाळू व्यक्तींचे मत होते. परंतु खूप कष्ट, अपमान, शारीरिक, मानसिक त्रास सहन करून महात्मा जोतीबा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण दिले. स्त्रीयांना शिकवण्यासाठी सक्षम केले. दोघांनाही स्त्रीयांना व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या लोकांसाठी यातना सहन केल्या. पुढे दादाभाई नौरोजी यांनी ही स्त्रीयांसाठी “सतीची चाल” ही अनिष्ठ परंपरा मोडीत काढली. या सर्व गोष्टीतून स्त्रीला नवीन इच्छाशक्ती मिळाली.
स्त्री शक्तीच्या या जागरामुळे आज सर्वच ठिकाणी स्त्रीया आघाडीवर आहेत. काही क्षेत्रांमध्ये पुरुषाबरोबर दिसत आहेत, तर काही क्षेत्रांमध्ये पुरूषांपेक्षा उत्तम पद्धतीने कार्य करताना दिसत आहेत. २१व्या युगात अनेक कठीण क्षेत्रामध्ये स्त्रीयांनी स्वत:चे एक वेगळे स्थान बनविले आहे. भारतीय सैन्य दलात आर्मी, नेव्ही, एअर फोर्स आणि बोर्डर सेक्युरिटी फोर्स अशा ठिकाणी सुद्धा महिला आघाडीवर आहेत. हवाई दलात जवळपास ३o ते ४o टक्के कर्मचारी महिला आहेत. हवाई दलाची लढाऊ विमाने चालविण्याची खूप मोठी जबाबदारी महिला वैमानिक पार पडत आहेत.
महिलांना प्रत्यक्षात युद्धात पाठविण्याची योजना नसली तरी लष्करी मोहिमेसारख्या कामगिरीवर त्यांना पाठविले जाऊ शकते. लष्कराच्या सेवेतील महिला वैमानिक सध्या हवाई दलाची मालवाहतूक विमाने, तसेच हेलिकॉप्टर्स चालवितात. भविष्यात त्यांना लढाऊ विमाने चालविण्याची ही संधी मिळेल. कोणत्याही शारीरिक मर्यादेवर मात करुन महिला वैमानिक लढाऊ विमानेदेखील सहजतेने हाताळतील. लढाऊ विमाने चालविण्यास शिकण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागतो. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महिला वैमानिक लढाऊ विमाने चालवू शकतील. स्त्रीयांचा हा एक सन्मान आहे. त्यांना करिअर करण्यासाठी एक उत्तम क्षेत्राची निर्मीती होत आहे.
महिलांचा आदर कसा केला पाहिजे हे जर प्रत्येक कुटुंबातील आई वडिलांनी आपल्या पाल्यांना शिकवले तर अनेक वाईट गोष्टीना आळा बसेल. आज टीव्ही वरती किंवा वर्तमान पत्रामध्ये सुद्धा कव्हर स्टोरी करून समाजात वाईट गोष्टीना प्रकाशित करण्यापेक्षा न केलेल्या बऱ्या. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीला प्राधान्याने सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे त्याची सुरुवात आपण आपल्या कुटुंबापासून करायला हवी. तरच एक उत्तम शारीरिक मानसिक आणि बौद्धिक सक्षम स्त्री उभा होईल. स्त्री शक्तीला त्रिवार वंदन.....
-         मंगेश विठ्ठल कोळी, ९०२८७१३८२०


Tuesday, September 19, 2017

पुरुष - एक अद्वितीय व्यक्ती...

एका पुरुषाचे जीवन म्हणजे ज्वलंत, तप्त निखाऱ्यात असणाऱ्या लोखंडी तुकड्यासारखे असते. त्याला स्वतः ला खूप चटके सहन करून, वेदना सहन करून खंबीरपणे आपल्या कुटुंबासाठी सशक्त व्हावे लागते. कुटुंबातील सर्व मंडळी जेव्हा गाढ निद्रेत असतात. अगदी निर्धास्तपणे, कुठलीही काळजी नसते, त्याचे ऐकमेव कारण म्हणजे घरातला कूटुंबप्रमुख होय. तो जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत त्या कुटूंबासाठी तो आधारवड असतो. कुटूंब निर्धास्थपणे झोपलेलं असते, त्यावेळी त्यांना विश्वास असतो की, आमची जबाबदारी घेणारा कुटूंबप्रमुख खंबीर आहे.
कोणीही सोबतीला नसतात त्याच वेळी तो मात्र जागा असतो, तिच ऐकमेव रात्रीची वेळ त्याला विचार करण्यासाठी अनुकुल असते. मुलांच्या भविष्याची, कुटूंबाच्या उभारणीची, अनेक चांगल्या, वाईट गोष्टींचे विचारचक्र त्याच्या डोक्यात थैमान घालत असते. या गोष्टींचा विचार करत असताना नकळत त्याला डोळा लागतो आणि तो झोपून जातो. रात्री बे रात्री जाग आली तर तो मुलांकडे आणि बायकोकडे पाहत असतो. त्यांच्या अंगावरचे पांघरून सावरुन पुन्हा तो झोपण्याचा प्रयत्न करतोउद्याचे लाखो प्रश्न डोक्यात थैमान घालत राहतात.! 
पुरूष त्याच्या मनातल्या भावना पटकन बोलून दाखवत नाही. स्वतः मोठ्याने रडता येत नाही म्हणून कुढत आणि काळजीत जिवन जगत असतो. ही एका कूटूंबाप्रती जबाबदार पुरूषाची लक्षणे आहेत. कुटुंब जस जसे मोठे होत जाते, तस तशी कुटूंब प्रमुखाची जबाबदारी वाढत जाते. संसार करणे आणि तो नेटाने निभावने वाटते तितकी साधी आणि सोपी गोष्ट नसते.
     संसाराची किंमत त्यांना विचारा ज्यांचा संसार अर्धवट राहीलाय, कधी अकाली निधनाने पुरूष तर कधी स्त्री संसारातून बाहेर पडते.
लग्न करुन बायकोला घरी घेऊन येणे व दोन मुलांना जन्माला घालणे याला पुरूष म्हणत नाही. मंडळी पुरूष त्यालाच म्हणतात, "जो कूटूंबाची संपूर्ण जबाबदारी पार पाडून बायकोची आणि मुलांची सर्व स्वप्ने साकार करतो." समाज्यासाठी तुम्हाला काही करता आले नाही तरी चालेल,  पण स्वतःच्या बायको, मुलांसाठी आणि आपल्या आई वडीलांसाठी तुम्ही कुटूंबातले हिरो म्हणून जगला पाहिजे. एक आदर्श मुलगा, आदर्श बाप आणी आदर्श बाप हिच खरी ओळख किमान कूटूंबाप्रती प्रत्येक पुरूषाची आहे. स्वतः अनेक इच्छा, आकांक्षा, भावना यावर तुळशी पत्र ठेऊन इतरांच्यासाठी पुरुष हा एकमेव, अद्वितीय व्यक्ती असतो.
- मंगेश विठ्ठल कोळी
- मो. 9028713820


क्षणभंगुर आयुष्य....

     काल मी ऑफिसातनं लवकर घरी आलो. साधारणपणे मी घरी रात्री ८ वाजेनंतर येतो. काल ७ वाजताच आलो. ठरवलं होतं की घरी जावून थोडावेळ बायकोशी बोलेन. मग मी विचारेल की आज आपण बाहेर जेवायला जाऊयात? खूप वर्षांपूर्वी आम्ही असं करायचो. घरी आलो तर बायको टीव्ही पहात होती. मला वाटलं जोपर्यंत ती ही सीरियल पहात आहे, तोपर्यंत आपण लॅपटॉपवर काही मेल चेक करून घेवूयात. मी लगेच मेल चेक करायला लागलो. थोड्या वेळानं बायको चहा घेवून आली. मी चहा पित पित ऑफिसचं काम करायला लागलो.  
आता मनात आलं होतं की, हिच्यबरोबर बसून गप्पा मारूयात मग जेवायला बाहेर जावूयात, पण केव्हा ७ चे १० वाजले कळलंच नाही. बायकोने जेवण वाढलं मी चुपचाप जेवायला बसलो. जेवतांना मी म्हणालो की, आपण जेवणानंतर थोडं फिरायला जावूयात, गप्पा मारूयात.  यावर बायको खुश झाली. मी जेवण करत असतांनाच टीव्हीवर माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला. जेवता-जेवता मी कार्यक्रमात गुंगलो. कार्यक्रम पहाता-पहाता सोफ्यावरच झोपी गेलो. जेव्हा जाग आली तेव्हा मध्यरात्र झाली होती. खूप वाईट वाटलं. मनात ठरवून आलो होतो की, आपण लवकर यायचा फायदा घेवून आज थोडावेळ बायको सोबत घालवेल. पण इथं सायंकाळच काय रात्र देखील निघून गेली. असंच होतं आयुष्यात. आपण विचार करतो वेगळा आणि होतं वेगळंच. आपण विचार करतो की, आपण एक दिवस जगूच पण आपण कधीच जगतच नाही. आपण विचार करतो की, ह्या दिवशी आपण हे करूयात पण करू शकत नाही.  
आर्ध्या रात्री सोफ्यावरनं उठलो व हात-पाय धूवून अंथरुणावर आलो. पाहिले तर बायको संपूर्ण दिवस काम करून थकली होती. बायको शांत गाढ झोपी गेली होती. मी पण गुपचूप बेडरूम मधल्या खुर्चीवर बसून विचार करत होतो. सहा वर्षांपूर्वी ह्या मुलीला पहिल्यांदा भेटलो होतो हिरव्या रंगाच्या पंजाबी ड्रेस मध्ये. मी हिच्याशी लग्न केलं होतं. मी वचन दिलं होतं की सुखात, दुखात जीवनातील कोणत्याही वळणावर मी तुला साथ देईन.
पण ही कसली साथ? मी सकाळी उठतो तर आपल्या कामात व्यस्त होतो. ती सकाळी जागी होते तर माझ्यासाठी चहा बनवते. चहा पिऊन मी जगाशी जोडला जातो तर ती नाष्टाची तयारी करते. मग आम्ही दोघं व्यवसायाच्या कामाला लागतो.  मी ऑफिसच्या तयारीला लागतो तर ती त्या सोबतच माझ्या लंचची व्यवस्था करते. मग आम्ही दोघं भविष्याच्या कामात जुंपले जातो.  
      मी एकदा ऑफिसात गेलो की, मी माझी शान समजतो की माझ्याशिवाय माझ्या ऑफिसचं काम चालत नाही. ती आपलं काम निपटून डिनरच्या तयारीला लागते.  
रात्री घरी उशिरा येतो व जेवण करून सुस्त होवून जातो. एक संपूर्ण दिवस खर्च होतो जगायच्या तयारीत. ती पंजाबी ड्रेस मधली मुलगी माझ्याकडं कसलीही तक्रार करत नाही. का करत नाही? मला नाही ठावूक? पण माझी स्वतः विषयीच तक्रार आहे. मनुष्य ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याचीच सगळ्यात कमी काळजी करतो असे का?
बऱ्याचदा वाटतं की आपण आता स्वतःसाठी काम नाही करत आहोत. आपण एखाद्या अज्ञात भयाबरोबर लढण्यासाठी काम करतो आहोत. आपण जगण्यासाठी आपलं आयुष्य बरबाद करतो आहोत. कालपासूनच विचार करतोय तो कोणता दिवस असेल, जेव्हा आपण जगायला सुरवात करूआपण काय फक्त गाडी, टीव्ही, फोन, कॉंम्प्यूटर, कपडे खरेदी करण्यासाठीच जगतो आहोत का? मी तर विचार करतोच आहे आपणही जरूर करा.
आयुष्य खूप छोटं आहे. त्याला असंच वाया घालवू नका. आपल्या प्रेमाला ओळखा, त्याच्या सोबत वेळ घालवा. जीनं आपल्या आई, वडील, बहिण, भाऊ तसेच सख्खे नातेवाईक सोडून तुमच्याशी नातं जोडलंय. आपल्या सुख, दुःखात सामील व्हायचं वचन दिलंय, तिला विचारा तर खरं. एक दिवस पश्चाताप करत बसण्यापेक्षा जे सत्य आहे ते आजच समजून घ्या. आयुष्य हे मुठीतल्या रेती सारखं असतं कधी ते मुठीतनं कधी निसटून जाईल कळणार देखील नाही. 
आपल्या सोबत कोणत्याही कठिणातील कठीण प्रसंगी आपली साथ न सोडणाऱ्या व्यक्तीवर नेहमी प्रेम करा.
- मंगेश विठ्ठल कोळी
- मो. 9028713820

झेड पी भरती ऑनलाईन...

प्रशासनाची कार्यक्षमता, गतिशीलता, पारदर्शीपणा अशी सर्वसमावेशकता आणण्याचे काम राज्यात डिजीटायझेशनच्या माध्यमातून सुरु आहे. याचेच उत्त्म उदाहरण म्हणजे ऑनलाईन योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत आलेली पारदर्शकता. आता शेततळ्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट जमा केल्यामुळे भ्रष्टाचार थांबला. यावर्षी शेततळयांसाठी एकूण 2 लाख 83 हजार 620 अर्ज प्राप्त झाले. त्यातील 51 हजार 369 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून 204 कोटी रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा झाली. सेवा हक्क कायद्याद्वारे राज्य शासनाच्या 399 सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन सेवांच्या माध्यमातून जवळपास 1.14  कोटी अर्ज आपल्याला प्राप्त झाले आणि यापैकी 1.08 कोटी म्हणजे लोकांना म्हणजे जवळ-जवळ 88 टक्के सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचबरोबर राज्य शासनाने सुरु केलेले आपले सरकार पोर्टल या पोर्टलवर आलेल्या तक्रारीपैकी 88 टक्के तक्रारी वेळेत निकाली काढण्यात आल्या असून 78 टक्के लोकांनी निकालावर समाधान व्यक्त केले आहे.
भारतनेट’ च्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘महानेट ग्रामीण भागातील प्रत्येक घरात किमान एक व्यक्ती डिजीटली साक्षर असावा म्हणून थेट इंटरनेट कनेक्टिव्हीटीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या भारतनेटच्या संकल्पनेवर आधारित राज्यात महानेटसुरु केले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात किमान एक व्यक्ती डिजीटली साक्षर असावा म्हणून थेट इंटरनेट कनेक्टिव्हीटीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या भारतनेटच्या संकल्पनेवर आधारित राज्यात महानेटयोजना सुरु करण्यात आली आहे. याद्वारे आतापर्यंत 14 हजार ग्रामपंचायती फायबर ऑप्टीकने जोडल्या असून 2018 अखेरपर्यंत सर्व ग्रामपंचायतींमध्ये महानेटचे काम होईल. यापुढील पाऊल म्हणजे यापुढे जिल्हा परिषद पद भरती च्या वेळी ऑनलाईन अर्जा आणि निकालाबरोबरच परीक्षा पद्धतीही ऑनलाईन करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेमध्ये वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या पद भरतीसाठी यापुढे हि पद्धती अवलंबली जाणार आहे.
कृषी अधिकारी, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी (कृषी) प्रयोगशाळा तंत्रज्ञ, जोडारी, कनिष्ठ यांत्रिकी, तारतंत्री, पर्यवेक्षिका,(एकात्मिक बालविकास सेवा योजना), विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग ३ औषध निर्माता, वरिष्ठ सहायक (लेखा) आरोग्य सेवक (पुरुष/महिला), कनिष्ठ आरेखक, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी (पंचायत) आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, वरिष्ठ सहायक (लिपिक) कनिष्ठ सहायक (लिपिक/लेखा), पशूधन पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी सांखिकी, लघुलेखक, कनिष्ठ लेखा अधिकारी या प्रक्रियेमुळे जिल्हास्तरावर  परीक्षासाठी प्रश्नप्रत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे, उत्तर पत्रिका तपासणेआदी कामे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या यंत्रणेला करावी लागणार नाहीत. परिणामी वेळ श्रम वाचेल आणि संपूर्ण भरती प्रणाली पारदर्शकता देखील राहील.  
-         मंगेश विठ्ठल कोळी, ९०२८७१३८२०

Monday, September 18, 2017

एक चित्र आणि मित्र....


आज मी आणि माझा मित्र गजेंद्र ऑफिसातील काम संपवून घरी जाण्यासाठी बाहेर पडलो. बोलत असताना गजेंद्रने त्याच्या मोबाईल खिश्यातून बाहेर काढला आणि आज त्याने काढलेला फोटो दाखवला. फोटो पाहताक्षणी मला खूप काही सांगून गेला. त्याच बरोबर गजेंद्रची त्या फोटो बदल भावना मी विचारपूस करता, त्याने खूप वर्षापूर्वीच्या एका गोष्टीची आठवण करून दिली. माझ्या गजेंद्रचे मत असे होते की, तो फोटो घेण्यामागचे खरे कारण आणि त्याने केलेला विचार गजेंद्र सांगू लागला. आम्ही पायी चालत चालत आणखी थोडसं अंतर त्याच विषयी बोलत पुढे आलो आणि ट्रेनमध्ये बसलो. प्रवासाला सुरवात झाली. मी गजेंद्रकडून हक्काने तो फोटो माझ्या मोबाईलमध्ये घेतला. त्याने काढलेला फोटो अप्रतिमच होता, परंतु मला मात्र तो फोटो वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला.
आज फार वर्षापूर्वीची गोष्ट आठवली. लहानपणी शाळेत असताना गुरुजींनी कावळ्याची गोष्ट सांगितली होती. जेंव्हा कावळ्याला तहान लागते. तेंव्हा तो पाणी पिण्यासाठी खूप व्याकून झालेला असतो. भर उन्हात हरीण जसे पाणी पिण्यासाठी मृगजळाच्या पाठीमागे धावून स्वत:चे प्राण गमावते. तशीच काही अवस्था त्या कावळ्याची झालेली असते. खूप वेळ भटकल्यानंतर त्याला एका मडक्यात पाणी दिसते. कावळा पाणी पिण्यासाठी खूप प्रयत्न करतो. पाणी मडक्याच्या तळाला असल्याने हे सारे प्रयत्न व्यर्थ जातात. शेवटी त्याच्या लक्षात येते की, पाण्यात बाजूला पडलेले खडे टाकले तर पाणी वरती येईल. मग तो बाजूला असलेले खडे उचलून त्या मडक्यात टाकत असतो. जस जसे लहान लहान खडे उचलून त्या मडक्यात टाकतो, तस तसे ते पाणी वरती मडक्याच्या तोंडाशी येत असते. शेवटी मडक्यातील पाणी पिऊन कावळा स्वत:ची तहान भागवतो आणि उडून जातो.
आज प्रत्येक जन वेगवेगळ्या तहानेने व्याकूळ झालेला आपण पाहतो. प्रत्येकाची आवडी निवडी वेगवेगळ्या आहेत. त्याच बरोबर प्रत्येकाची वागण्याची पद्धत वेगळी, बोलण्याची पद्धत वेगळी, विचाराची पातळी वेगळी, राहण्याचे स्थान मान वेगळ, आवडते गाणे वेगळे, कपडे परिधान करण्याची पद्धत वेगळी, केसाची स्टाईल वेगळी, त्याच बरोबर खाण्याची पिण्याची पद्धती वेगवेगळी, आवडत्या दारूचा ब्रॉन्ड देखील वेगळा आहे. परंतु दोन गोष्टी सर्वांनमध्ये समान आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, दोन गोष्टी या समान आहे. एक म्हणजे मला सुख पाहिजेच आणि दुसरे म्हणजे मला आनंद पाहिजेच. एवढ्या दोन गोष्टी सोडल्या तर सर्वांच्या सर्वच गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
गजेंद्रने काढलेल्या चित्रामध्ये एक व्यक्ती चहा पीत आहे. त्याच्या आजूबाजूला काही कावळे आहेत. ते कावळे माणसांनी पिलेल्या चहाचा ग्लास पडून त्यातील उरलेला चहा पिण्याचा प्रयत्न करत आहेत. सुखी आणि आनंदी राहण्यासाठी माणसाला नक्की काय हवं आणि काय नको हे समजले की, जीवन सुखकर आणि आनंदी झाल्याशिवाय राहत नाही. मला आज गजेंद्रच्या या चित्रामधून खूप महत्वाची गोष्ट शिकता आली. जीवनात समाधानी असणे म्हणजे सुखी आणि आनंदी असणे होय. केंव्हा तरी स्वत:चे आयुष्य मनसोक्त जागून पहा आयुष्य खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल.
-    मंगेश विठ्ठल कोळी, ९०२८७१३८२०.

Wednesday, September 13, 2017

मुलांची शिक्षण व्यवस्था...



आपला देश हा प्राचीन काळापासून शिक्षण देण्यात अव्वल ठरला आहे. खूप जुनी विद्यापीठे आजही देशामध्ये आहेत. देशातील शिक्षण पद्धतीचा अवलंब बाहेरील देशांनी सुद्धा स्वीकारला आहे. योगाचे फायदे तर संपूर्ण जगाने पाहिले. १८ व्या शतकानंतर भारतामध्ये इंग्रजांचे राज्य आले त्यावेळीपासून ते आज तागायत आपली शिक्षण पद्धतीमध्ये फारसा फरक झालेला पहावयास मिळत नाही. काही इंग्रज येऊन बहुसंख्य असणाऱ्या भारतीय नागरिकांवर हुकुम गाजवू लागले. याचे मुख्य कारण म्हणजे सर्व प्रथम एक इंग्रज भारतात येऊन गेला आणि त्याने इंग्रजांना ठणकावून सांगितले कि, भारतावर विजय मिळवणे खूप कठीण गोष्ट आहे. कारण तेथे सर्व व्यवहार हे वस्तूंची देवाण घेवाण करून केले जातात. कोणत्याही प्रकारच्या चलनाला जास्त किंमत दिली जात नाही.

आठराशेच्या कालावधीपासून ते आजपर्यंत शिक्षणाच्या बाबतीत विचार केला, तर भारत हा जगातील पहिल्या १०० महाविद्यालयांच्या यादीत एकही महाविद्यालय नसणारा देश आहे. याचे कारण म्हणजे येथे मोठ्याप्रमाणात व्यावसायिक बनण्यापेक्षा मजूर निर्माण केले जात आहेत. एखाद्या लहान मुलाला सुद्धा पालक सांगत असतात. मोठेपणी तुला चांगली नोकरी मिळाली कि, आयुष्य खूप सोप होईल. याच वयापासून आपण त्यांना उत्तम नोकर होण्याचे बाळकडू देण्यास सुरुवात करतो. मग बालक सुद्धा वेगळा विचार करत नाही, जास्तीत जास्त गुण मिळविण्याच्या प्रयत्नात पुस्तकी किडा बनते. अपयश आले तर ते पचवण्याची क्षमताच आजच्या बालकांची कमी होत चालली आहे. पालक सुद्धा समाज काय म्हणेल? याची प्रचंड भीती बाळगतात त्याच बरोबर कळत नकळत बालकांची तुलना करतात.

काही दिवसापूर्वी लहान मुलाच्या बाबतीत ज्या काही घटना आपण पेपर किंवा न्यूज चॅनेल वरती पाहत आहोत. त्यावरून एक गोष्ट लक्षात येते कि, ज्या गोष्टीची जास्त चर्चा व्हायला नको त्याच गोष्टींना मोठ्या प्रमाणावर वाव दिला जात आहे. मग ती ब्लुव्ह व्हेल गेम असो, किंवा मुलाच्याकडून होणारे गुन्हा असो या बाबतीत सर्व पालक हे दोष देताना संपूर्ण व्यवस्थेला देत आहेत. परंतु आपण हि त्या व्यवस्थेचाच एक भाग आहे हे मात्र आपण विसरून जात आहे. लहान बालकांना कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यायचे यावर पालकांना चर्चा करावयास सांगितले तर खूप दीर्घकाळ चालेल. मात्र एकच गोष्ट त्यामध्ये दिसून येईल ती म्हणजे, “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते .....”

-        मंगेश विठ्ठल कोळी, मो.९०२८७१३८२०

Friday, September 8, 2017

सोबत कुणाची......



आजकाल प्रत्येकजण खूप व्यस्त झाला आहे. त्यापेक्षा जास्त एकलकोंडी व्यक्तीमत्व वाढले आहे. आपण आणि आपला मोबाईल इतर कोणाच काहीही देण घेण आता उरलं नाही. कुणाशीही बोलावसं वाटत नाही, खूप खूप कंटाळा येतो. सगळीकडे वेगवेगळे मुखवटे चढवलेले चेहरे पहावयास मिळत आहेत. एकत्र बसून बोलणे आणि खोटी स्तुती करणे हि आत व्यसनाधीनता वाढत आहे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे प्रत्येक ठिकाणी समाजात वावरताना दिसतात. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना की, नको वाटतं. इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही? ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष! ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला एडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका नकाराने बदललेले बघितले आणि वाटलं, ‘आपण एकटे असतो तेच बरं असतं.

एखाद्या व्यक्तीपेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदामध्ये रमावं, मन प्रसन्न राहतं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता. हळूहळू सकारात्मक गोष्टींची वाढ होते. कधीतरी अशी वेळ येते की, तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते. प्रत्येकाचे मूड संभाळण, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण फार दमून जातो. सतत दुसऱ्यांचा विचार करताना आपल्याला स्वतःला काय हवं आहे.हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आपण इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही. मग अशा वेळी प्रश्न पडतो हे सगळं कशासाठी?”

खूप विचार केला की, ह्या प्रश्नाचे एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे, “आपण एकटेपणाला घाबरतो.सुरक्षितेसाठी कळपात राहिलं पाहिजे. ही एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. एकटे पडू? या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना पाठींबा देतो. मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण सोबती”, “मैत्री “जीवा भावाची” ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो. लोकांनी केवळ आपल्या सोबत असण्याला सोबतअसं गोंडस नाव देतो. आपणही तसेच खोटे वागत जातो. पण एक क्षण असा येतो, जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोस होतो. मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो. जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.

मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीनअसा मनाशी निश्चय केला की, आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. मोजकीच पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी सोबत. आजकाल अशी सोबत शोधण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. ज्याप्रमाणे एखादे हरीण उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात मृगजळाच्या मागे धावते अशी अवस्था माणसांची झाली आहे.!

-       मंगेश विठ्ठल कोळी, मो. ९०२८७१३८२०

दिनांक 09 सप्टेंबर 2017 व्यक्तिमत्व विकास हे साप्ताहिक सविस्तर वाचण्यासाठी......





Tuesday, September 5, 2017

शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती....


समाजामध्ये अनेक प्रकारच्या जाती जमाती तयार झाल्या आहेत. प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मोठ मोठे मोर्चे आंदोलने केली जात आहेत. परंतु या सर्व बाबींचा  विद्यार्थी  वर्गावर किती मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे याचा कोणी विचार करत नाही. मुख्य म्हणजे कोणत्याही बालकाला शिक्षण घेण्याचा हक्क सर्वोच्च न्यायालयाने देवून सुद्धा अनेकजण त्यापासून वंचित राहिल्याचे चित्र आपण पाहत आहे. त्यातूनही काही विद्यार्थी शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी शासनाने विविध शिषवृत्ती जाहीर केल्या आहेत. पदविकाधारक जे विद्यार्थी थेट द्वितीय वर्षाच्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात अशा विद्यार्थ्यांसाठी पदविका अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुणांऐवजी ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असल्याची अट निर्धारीत केली आहे. सदरचे विद्यार्थी वगळता या प्रवर्गातील उर्वरित अन्य विद्यार्थ्यांकरिता राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिषवृत्ती योजनेंतर्गत लाभाच्या पात्रतेसाठी किमान ६० टक्के गुणांची अट आहे.
सदर योजनेंतर्गत लाभाकरिता पात्रतेसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उर्वरित विद्यार्थ्यांकरिता देखील सध्या निर्धारित केलेली किमान ६० टक्के गुणांची अट शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व विद्यार्थ्यांसाठी योजनेच्या लाभाकरीता पात्रतेसाठी निर्धारित केलेली किमान ६० टक्के गुणांची अट ही शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून शिथील करण्यास मंत्रिमंडळाने दिनांक १० ऑगस्ट २०१७ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला.
राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील  विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पदविका व पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांकरीता पात्रतेसाठी अनुक्रमे इयत्ता दहावी/ इयत्ता बारावी मध्ये किमान ६० टक्के गुणांची अट घालण्यात आली होती. तथापि, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रतेकरिता ६० टक्के गुणांची अट शिथील करण्यात आली आहे. सध्या सामाजिक न्याय विभागामार्फत इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता ज्या विविध सुमारे ६०५ अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती देण्यात येते, त्या सर्व अभ्यासक्रमांचा समावेश हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या प्रचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत करण्याचा देखील मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुमारे ६०५ अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रचलित योजनेंतर्गत शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.
-         मंगेश विठ्ठल कोळी, मो.९०२८७१३८२०