Thursday, November 18, 2021

मिठासारखी माणसं हवीतचं...

     पंगतीत मीठ वाढणारा परत येत नाही तसेच काही माणसं देखील आयुष्यातून एकदा निघून गेले की परत येत नाहीत. बहुदा ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते.
का घडतं असं??
    मिठाचं महत्व जेव्हा पानात असतं तेव्हा कळतच नाही. कारण त्यावे माणसाचं लक्ष पानात येणाऱ्या गोड पदार्थावर असतं. तो पदार्थ कुठला, कसा, त्याची चव कशी, तो चांगल्या तुपापासून बनवलाय का? ते खाऊन आपल्याला काही त्रास होऊ शकतो का?? हे काहीच माहीत नसतं तरी देखील तो गोड पदार्थ हवासा असतो. कारण मोह. असं म्हणतात की संकट हे नेहमी सुंदर रूप घेऊनच येतं.
     त्या गोड पदार्थाच्या मोहापायी ताटातल्या मिठाकडे जराही लक्ष जात नाही. कारण आपण त्याला कुठेतरी गृहीत धरायला लागतो. त्याचा खारटपणा नकोसा वाटतो. ते आपल्या पानातील इतर पदार्थात मिक्स होऊ नये म्हणून आपणच त्याला स्वतःहून बाजूला करतो. त्यात कधी वाटीतील रस्सा, भाजी वगैरे सांडली तर ते पानात असून देखील उपयोग नसतो.
     नको वाटतात ना आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसं? कारण ती तुमच्या चांगल्यासाठी सल्ला देतात, कधी हक्काने कान धरतात तर कधी पोटतिडकीने समजावून सांगतात. नकोच वाटतात, कारण त्यावेळी गोड पदार्थाची झिंग चढलेली असते. त्याशिवाय पानातील इतर पदार्थ दिसत नाही तर वाटीमागे असलेलं ते एवुढंस मीठ काय दिसणार ना?? पण जेव्हा तोच गोड पदार्थ खाऊन तड लागते ना तेव्हा पाण्याच्या ग्लासमध्ये लिंबाची फोड पिळली जाते आणि हात आपसूक मीठ शोधायला लागतो. कारण त्याशिवाय खाल्लेलं अन्न पचणार कसं ?
     म्हणून देवाने वाढलेल्या ह्या आयुष्यरूपी पानात प्रत्येक व्यक्तीला महत्व असतं आणि ते द्यावं. आपल्याला ती व्यक्ती आवडो की न आवडो ती आयुष्यात आलीयत ना म्हणजे नक्कीच मागील जन्माचा संबंध असतो आणि मिठासारखी माणसं तर नक्कीच ओळखावी. भलेही ती तुमच्या आयुष्यात महत्वाचे नसतीलही पण निदान वाईट तर करणार नाहीत ना?
  (वरील लेख मी लिहिलेला नाही, सुंदर विवेचन आहे.)

Monday, September 27, 2021

आपल्यात काही टॅलेंट आहे??


*आपल्यात काही टॅलेंट आहे किंवा टॅलेंट होते,  त्याने जरूर वाचावे...*

*दोन चोरांची गोष्ट*

चोर १ –
अमेरिकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅंलेंट लाभलेला चोर होऊन गेला. अमेरिकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही एक नंबरला आहे, इतका तो सफाईदार चोर होता. 
एकोणीसशे वीसच्या दशकात लोकांनी त्याला ‘ग्रेटेस्ट ज्वेल थीफ’ अशी उपाधी देऊन एक प्रकारे त्याचा गौरवच केला होता. तो फक्त अतिश्रीमंत लोकांनाच टारगेट करायचा, आणि त्याने चोरी करणं, हे सुद्धा एक प्रतिष्ठेचचं लक्षण होवुन बसलं .
चोरी करणं वाईट असलं तरी लोकांमध्ये ह्या चोराबद्द्ल आकर्षण, कौतुक आणि सहानभुती होती.
त्याच्या दुर्दैवाने एक दरोडा टाकताना, पोलीसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या, आणि त्याला पकडला! 
वयाची पुढची अठरा वर्षे त्याने जेलमध्ये काढली. जेलमधुन बाहेर आल्यावर त्याने गुन्हे करणं, चोर्‍या करणं सोडुन साध जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला, पण ‘द ग्रेट ज्वेल थीफ आर्थर बेरी’ बद्द्ल लोकांचं कुतुहुल अद्यापही कमी झालं नव्हतं.
लोकांनी बदललेल्या आर्थर बेरीची एक सार्वजनिक मुलाखत घेतली, ती ऐकायला मोठा जमाव जमला होता, अनेक प्रश्न विचारले, आर्थरनेही दिलखुलास उत्तरे दिली.
मुलाखत खुप रंगली,
मुलाखतकाराने शेवटचा प्रश्न विचारला, “तुम्ही सर्वात मोठी चोरी कोणत्या माणसाकडे केली?, खरं खरं उत्तर द्या.”
“तुम्हाला खरचं, खरं खरं उत्तर ऐकायचं आहे का?” गर्दीकडे पाहुन आर्थरने विचारले.
“हो, हो!” एकच गलका झाला.
“मी सर्वात मोठी चोरी ज्या माणसाकडे केली, त्या माणसाचे नाव आहे, ‘आर्थर बेरी’, हो! मीच माझा सर्वात मोठा गुन्हेगार आहे.” 
सगळे एकदम अवाक आणि शांत झाले.
“मी एक सफल व्यापारी होऊ शकलो असतो, मी वॉल स्ट्रीटचा अनाभिषिक्त सम्राट होवु शकलो असतो, मी समाजाची सेवा करणारा एक नशीबवान व्यक्ती बनु शकलो असतो, पण हे न करता मी चोरी करण्याचा मार्ग निवडला, आणि माझं एक तृतीयांश जीवन मी जेलमध्ये वाया घालवलं.”

चोर २ –
१८८७ चा एक पावसाळा, एका किराणा दुकाना मध्ये भिजत भिजत एक ग्राहक आत शिरला. त्याने काही वस्तु खरेदी केल्या, आणि काऊंटरवर वीस डॉलर्सची नोट दिली आणि तो बाहेर पडला. 
कॅश काऊंटर वर असलेल्या स्त्रीने स्मितहास्य केले, आणि नोट गल्ल्ल्यात टाकली, तो त्यांचा नेहमीचा ग्राहक होता, दुकानाजवळच राहणारा तो एक होतकरु चित्रकार होता. एमानुअल निंगर त्याचं नाव!
नोटा ओल्या असल्याने तिच्या हाताला शाई लागली, तिने बारकाईने नोट पाहिली, ती हुबेहुब नोट होती, पण शाई सुटल्याने तिला बनावट नोट असल्याचा संशय आला,
शहानिशा करण्यासाठी, तिने पोलिसांना बोलावले. 
ती एक बनावट नोट होती, पण इतकी हुबेहुब नक्कल पाहुन पोलिसही चक्रावले.
पोलिसांनी चित्रकाराच्या घरावर छापा मारला, त्याच्या पेंटींग्ज जप्त केल्या गेल्या. चित्रकार निंगर जेलमध्ये गेला. आतापर्यंत अनेक बनावट नोटा रंगवुन बाजारात वापरल्याचे त्याने कोर्टासमोर कबुल केले. 
कोर्टाने त्याच्या चित्रांचा लिलाव करुन नुकसानभरपाईचे आदेश दिले.
तो जेलमध्ये असतानाच त्याच्या चित्रांचा लिलाव झाला, त्याचे प्रत्येक चित्र पाच हजार डॉलरहुन अधिक किमतीला विकले गेले. लाखो डॉलर्स जमा झाले. 
विडंबना ही होती की पाच हजार डॉलर्सचे चित्र बनवणार्‍या निंगरला त्यापेक्षा जास्त वेळ, वीस डॉलर्सची नोट बनवायला लागायचा. 

*तात्पर्य:-*
- आपली अंगभुत कला न ओळखणारा, प्रत्येक जण चोर आहे.
- ती प्रत्येक व्यक्ती चोर आहे, जो आपल्या पुर्णपणे क्षमतेचा वापर करत नाही.
- ती व्यक्ती चोरच आहे, ज्याला, आपल्या स्वतःवर विश्वास नाही.
- तो प्रत्येक रिकामटेकडा चोर आहे, जो समाजाला काहीही देत नाही. आणि केवळ राजकारणावर फुकट चर्चा करण्यात आपला वेळ वाया घालवतो.
- आपल्या कामावर प्रेम न करणारा, कामाला न्याय न देणारा प्रत्येक जण चोर आहे.
- ती प्रत्येक व्यक्ती चोर आहे, जी संपूर्ण माहिती, लेख न वाचताच प्रतिक्रिया देत असते.
- स्वतः मधील टॅलेंट ओळखा व ते योग्य कामात वापरा  ।
👍👍👍👍👍

Saturday, July 31, 2021

“अण्णा भाऊ साठे" जयंतीनिमित्त....

 

अण्णा भाऊ साठे– अष्टपैलू व्यक्तिमत्व

अष्टपैलू व्यक्तिमत्व असा शब्द उच्चार करणे याचे खरे कारण म्हणजे जी व्यक्ती विविध क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी किंवा यशाच्या अति उच्च ठिकाणी असते त्यांच्या बाबतीत असा शब्द प्रयोग करत असताना आपण पाहतो. वडीलभाऊराव साठेआणि आईवालबाई साठे यांच्या पोटी जन्म घेतलेले “तुकाराम भाऊराव साठे” अर्थात “अण्णा भाऊ साठे” या टोपण नावाने ओळखले जातात.महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारकलोककवी,लेखक आणि लोकप्रिय शाहीर अशी त्याची ख्याती होती आहे आणि यापुढे देखील असणार आहे. 

अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली.जातीने एका  दलित समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.

अण्णा भाऊ साठेहे नामांकित साहित्यिक आहेत. त्यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लोक प्रेरित झाले.

साठे पहिल्यांदा कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले.  १९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची "१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना" होती. भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!" इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.

साठे नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. इ.स. १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे" यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य बौद्ध धर्माऐवजी मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते.

त्यांनी म्हटले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.”

अण्णा भाऊंच्या गोष्टींत अथवा लिखाणात विनोद नसतो, असं नाही; पण त्यांचा प्रकृतीधर्म आहे गंभीर लेखकाचा. ज्यांन फार भोगलं आहे, सात पडद्यांतून नव्हे, तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं आहे. अशा पोटतिडकीने लिहणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांना लाभला आहे. म्हणून साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिट्यपूर्ण असतात. म्हणून तत्कालीन सर्व बड्या कथाकारांपेक्षा ते निराळे आहेत. या लेखकाला प्रतिभेचे देणं लाभलं आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हरतर्हेच्या गोष्टींच्या अनुभव त्यांच्या गाठी आहे. त्यांच्या मनात एकप्रकारचा पीळ आहे. ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा पूजक आहे.

१ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने ४ रुपयाच्या खास टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९ रोजी हे टपाल तिकीट वितरित करण्यात आले.पुण्यातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक आणि कुर्ला मधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.

अण्णा भाऊ साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जिला इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.

अण्णा भाऊ साठे यांचा पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले. नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.

मुंबईमधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.. त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" या दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण' असे म्हटले आहे.

कोणत्याही व्यक्तीने जीवनात एकदातरी अण्णा भाऊ साठे यांची पुढील वाचनीय पुस्तके वाचलीच पाहिजेत असा माझा आग्रह आहे, याचे कारण देखील खास आहे जी व्यक्ती आळसावलेली आहे, मरगळलेली आहे, नैराश्याने ग्रासलेली आहे त्या व्यक्ती साठी अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे नव संजीवनीचे काम करते. अकलेची गोष्ट, अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा, अमृत, आघात, आबी, आवडी, इनामदार, कापऱ्या चोर, कृष्णाकाठच्या कथा, खुळंवाडा, गजाआड, गुऱ्हाळ, गुलाम, चंदन,चिखलातील कमळ, चित्रा, चिरानगरची भुतं, नवती, निखारा, जिवंत काडतूस, तारा, देशभक्त घोटाळे, पाझर, पिसाळलेला माणूस, पुढारी मिळाला, पेंग्याचं लगीन, फकिरा, फरारी, मथुरा, माकडीचा माळ, रत्ना, रानगंगा,रूपा, बरबाद्या कंजारी, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, रानबोका, लोकमंत्र्यांचा दौरा, वारणेचा वाघ, वैजयंता, वैर, शेटजींचे इलेक्शन, संघर्ष, सुगंधा, सुलतान, कविता आणि माझा रशियाचा प्रवास इ. साहित्यापैकी किमान एक तरी पुस्तक प्रत्येकाने वाचावीत.

अण्णा भाऊ साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट पुढीलप्रमाणेवैजयंता, टिळा लावते मी रक्ताचा, डोंगरची मैना, मुरली मल्हारीरायाची, वारणेचा वाघ, अशी ही साताऱ्याची तऱ्हा, फकिरा आपण सर्वांनी पाहिले असतील.

अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा...

-       श्री. मंगेश विठ्ठल कोळी.

-       मो.:- ९०२८७१३८२०


Monday, June 28, 2021

सेवेची गोष्ट....


गोष्ट वाचायचा आधी एक दीर्घ श्वास घ्या आणि या क्षणाचा अनुभव घ्या.
आमचे वडिलोपार्जित घर भोपाळ मध्ये होते आणि मी कामासाठी चेन्नई  येथे राहत होतो. अचानक एक दिवस घरून वडिलांचा फोन आला ताबडतोब निघून ये, महत्त्वाचे काम आहे. मी घाईघाईने रेल्वे स्टेशनवर पोहोचलो व रिझर्वेशनचा प्रयत्न केला, पण उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे एकही जागा शिल्लक नव्हती.
समोरच्या प्लॅटफॉर्मवर ग्रँड ट्रंक एक्सप्रेस गाडी उभी होती, पण त्यातही बसायला जागा नव्हती. कोणत्याही परिस्थितीत घरी जायचे होते, त्यामुळे मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, समोरच्या साधारण श्रेणीच्या डब्यात घुसलो. मला असे वाटले की एवढ्या गर्दीत रेल्वेचा  टि.सी. काही बोलणार नाही.
डब्यात कुठे जागा मिळते का, हे बघण्यासाठी मी इकडे तिकडे बघितले. तर एक सज्जन गृहस्थ बर्थवर झोपले होते. मी त्यांना, "मला बसायला जागा द्या" म्हणून विनंती केली. ते सज्जन उठले, माझ्याकडे पाहुन हसले व म्हणाले, "काही हरकत नाही आपण येथे बसू शकता." 
मी त्यांना धन्यवाद दिले व तिथेच कोपऱ्यात बसलो. थोड्याच वेळात गाडीने स्टेशन सोडले व गाडी वेगाने धावू लागली. डब्यामध्ये प्रत्येकाला व्यवस्थित जागा मिळाली होती. प्रत्येकाने आपापले जेवणाचे डबे आणले होते, ते उघडून सर्वांनी जेवायला सुरुवात केली. डब्यामध्ये सर्वत्र जेवणाचा वास दरवळला होता. डब्यातील माझ्या सहप्रवाशाशी संवाद साधण्याची चांगली वेळ आहे असा विचार करून मी माझा परिचय करून दिला,  “माझ नाव आलोक आणि मी इस्रो ( ISRO ) मध्ये शास्‍त्रज्ञ आहे. आज अचानक मला गावी जावे लागत आहे, म्हणून या साधारण श्रेणीच्या डब्यात मी चढलो. अन्यथा मी ए.सी.डब्ब्याशिवाय प्रवास करत नाही.”
ते सज्जन गृहस्थ माझ्याकडे पाहून हसले व म्हणाले, “अरे वा ! म्हणजे माझ्या बरोबर आज एक शास्त्रज्ञ प्रवास करीत आहेत. ते म्हणाले, “माझ नाव जगमोहन राव आहे. मी वारंगळ येथे चाललो आहे. तिथे जवळच्या एका गावामधे मी राहतो. मी बऱ्याच वेळा शनिवारी घरी जातो.”
एवढे बोलून त्यांनी आपली बॅग उघडली व त्यातून आपला जेवणाचा डबा काढला व म्हणाले, “हे माझ्या घरचे जेवण आहे, तुम्ही घेणार का?”
माझ्या संकोची स्वभावामुळे, मी नकार दिला व माझ्या बॅग मधील सँडविच काढून, खाऊ लागलो.
खाताना मी मनाशीच विचार करीत होतो की, 'जगमोहन राव ' हे नाव मी कुठेतरी ऐकल्या सारखे वाटतेय, पण आठवत नाही.
काही वेळातच सर्व लोकांची जेवणे झाली व सगळे झोपण्याची तयारी करू लागले. माझ्या समोरच्या बर्थवर एक कुटुंब होते. आई वडील व दोन मोठी मुले होती. ते पण झोपण्याच्या तयारीला लागले आणि मी एका बाजूला बसून मोबाईल मधील गेम खेळू लागलो.
रेल्वे वेगात धावू लागली होती. अचानक माझे लक्ष समोरच्या बर्थवर झोपलेल्या 55 - 57 वर्षाच्या त्या सज्जन गृहस्थाकडे गेले, तर ते तळमळत होते व त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत होता. त्यांचा परिवार घाबरून जागा झाला व त्यांना पाणी पाजू लागला. पण ते गृहस्थ बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मदतीसाठी मी जोराने ओरडलो, “अरे कोणीतरी डॉक्टरांना बोलवा. इमर्जन्सी केस आहे.”
पण रात्रीच्या वेळी स्लीपर श्रेणीच्या डब्यात डॉक्टर कुठला मिळणार? त्यांचा सारा परिवार त्यांची असहाय्य अवस्था पाहून रडायला लागला. तेवढ्यात माझ्या सोबतचे जगमोहन राव जागे झाले व त्यांनी मला विचारले, “काय झाले?”
मी त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. त्यांनी ताबडतोब आपली बॅग उघडली. त्यातून स्टेथोस्कोप काढला व त्या गृहस्थाला तपासू लागले. 
काही मिनिटातच त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे जाळे पसरले, परंतु ते काही बोलले नाहीत. मात्र त्यांनी आपल्या बॅगेतून इंजेक्शन काढले आणि त्या गृहस्थाला छातीत इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांच्या छातीवर दाब देऊन, तोंडाला रुमाल लावून त्यांनी तोंडावाटे त्याला श्वास देण्यास सुरुवात केली. काही वेळातच, त्या श्वासोच्छ्वासामुळे त्या गृहस्थांचे तडफडणे कमी झाले.
नंतर जगमोहन रावांनी आपल्या बॅगमधील काही गोळ्या त्या गृहस्थांच्या मुलाला दिल्या व सांगितले, “तुम्ही घाबरू नका. तुमच्या वडिलांना गंभीर हार्ट अटॅक आला होता पण मी इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा धोका आता टळला आहे. त्यांना आता या गोळ्या द्या.”
त्या मुलाने आश्चर्याने विचारलं, “पण आपण कोण आहात?”
ते म्हणाले, “मी एक डॉक्टर आहे. मी एका कागदावर त्यांच्या तब्येतीची माहिती व औषध लिहून देतो.  कृपया तुम्ही पुढच्या स्टेशन वर उतरा व त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा.”
त्यांनी आपल्या बॅगमधून एक लेटर पॅड बाहेर काढले व लेटर पॅड वरील माहिती वाचल्यावर मला आठवले.
त्यावर छापले होते - डाॅ.जगमोहन राव, हृदय रोग तज्ञ, अपोलो हॉस्पिटल, चेन्नई.
आता मला आठवले की, काही दिवसांपूर्वी मी माझ्या वडिलांना अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता घेऊन गेलो होतो, तेव्हा डॉक्टर जगमोहन रावांबद्दल ऐकले होते. त्या हॉस्पिटल मधील, ते सर्वात हुशार व वरिष्ठ हृदयरोग तज्ञ होते. त्यांची अपॉइंटमेंट घेण्याकरिता कित्येक महिने लागत असत. मी आश्चर्यचकित नजरेने त्यांच्याकडे पहात होतो. एवढा मोठा डॉक्टर रेल्वेच्या साधारण डब्यातून प्रवास करीत होता. आणि मी एक छोटा शास्त्रज्ञ - मी ए.सी. शिवाय प्रवास करत नाही अशा बढाया मारत होतो. आणि हे एवढे असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व असूनही सामान्य माणसासारखे वागत होते!
एवढ्यात पुढचे स्टेशन आले व ते आजारी गृहस्थ आणि त्यांचा परिवार टि.सी.च्या मदतीने खाली उतरले.
रेल्वे पुन्हा सुरू झाली. मी उत्सुकतेने त्यांना विचारले, “डॉक्टर! आपण तर आरामात ए.सीच्या डब्यातून प्रवास करू शकला असता, मग या सामान्य डब्यातून प्रवास का करता ?”
ते हसून म्हणाले, "मी जेव्हा लहान होतो, गावाकडे राहत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले की रेल्वेमध्ये विशेषतः सेकंड क्लासच्या डब्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यामुळे मी जेव्हा गावी जातो किंवा प्रवासाला जातो तेव्हा सामान्य डब्यातून प्रवास करतो. कारण कुणाला कधी डॉक्टरची गरज लागेल सांगता येत नाही. आणि मी डॉक्टर झालो ते लोकांची सेवा करण्याकरताच. आम्ही कोणाच्या उपयोगी पडलो नाही तर मग आमच्या शिक्षणाचा काय फायदा?"
नंतरचा प्रवास मी त्यांच्याशी गप्पा मारतच केला. पहाटेचे चार वाजले होते. वारंगल स्टेशन जवळ आले होते. ते उतरून गेले व बाकीचा प्रवास मी त्यांच्या सीटकडून येणाऱ्या सुगंधामध्ये न्हाऊन निघत पूर्ण केला. येथे एक महान माणूस बसलेला होता, जो हसत खेळत लोकांची दुःख वाटून घेत होता, प्रसिद्धीची हाव न बाळगता निरपेक्षपणे जनसेवा करीत होता.
आत्ता माझ्या लक्षात आले की डब्यात इतकी गर्दी असूनही हा सुगंध कसा काय जाणवत होता. तो सुगंध दरवळत होता त्या महान, असामान्य व्यक्तिमत्त्वाचा आणि एका पवित्र मनाच्या आत्म्याचा, ज्याने माझे विचार आणि जीवन दोन्ही सुगंधित करून टाकले होते.
म्हणूनच तर, "जसे आम्ही बदलू, तसे जग ही आपोआपच बदलेल.”
(वरील लेखन मी केलेले नाही.)
   

Friday, June 4, 2021

दुसऱ्यांचे विचार...


        सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं, आणि ओवलेला दोरा संपला, तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा, दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.

        पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं, दुसऱ्यानं तिसऱ्या साठी, जेणेकरुन वेळ आणि इंधनबचत व्हायचीच, पण गैरसोयही टाळता यायची.

       सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवनशैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही.

        आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं (नीट पुरवणी आत ठेऊन) निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो, शोधाशोध करावी लागत नाही.

       पाण्याची बाटली आपण रिकामी केली व लगेच भरुन फ्रीजमधे ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.

        बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं, ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही.

       पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून/घासून ठेवायचे, हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.

       खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा  कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे, आपली टर्न आल्यावर संपल्या/बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.

      घर सगळयांचं असतं, 'सगळी जवाबदारी गृहिणीची' असं म्हणून जवाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे.

       प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो, चुकीच्या सवयी लागतात.

       घर ही एक संस्था समजून घराची एक शैली, एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात, तसे घरातही काही नियम असले पाहिजेत, तरच त्याचं हाॅटेल होणार नाही. (खरंतर हाॅटेलचेसुध्दा नियम असतातच!)

      लाॅकडाऊनचा काळ ही एक संधी आहे घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत. काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर पुढं भविष्यात फायदा होईलच आणि नातीसुध्दा चांगली होतील. लहान मुलांना हे शिकवता येईल. 

      थोडं थांबून आपल्या नंतर येणाऱ्याचा विचार केला तर ही मदतीची साखळी सुरु राहील. मुख्य म्हणजे आपली वेळ येईल तेव्हा आपल्यालाही फायदे मिळतील.

टीप :- सदर लेख मी लिहिलेला नाही, सुंदर विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी आपणास वाचण्यासाठी उपलब्ध करत आहे.

Monday, May 24, 2021

गौतम बुद्धांचे विचार - सत्याची वाट

 

गौतम बुद्धांचे विचार - सत्याची वाट

आपल्याकडे अनेक लोकांनी प्रेरित होऊन बौद्ध धर्म स्वीकारला. या धर्माची गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आचरणात आणल्याने आयुष्य नक्कीच सुखकर होते असे मानले जाते. बुद्ध पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. 

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला बुद्धांची काही विचार सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जे व्यक्ती त्यांच्या विचारांचे आचरण करतात त्याची काटेकोरपणे अमलबजावणी करतात त्यांना नक्कीच सत्याची वाट गवसते आणि अशाच व्यक्तींच्यामुळे आपला समाज शिकून संघटीत होतो आणि संघर्ष करून न्यायाने मिळवतो. तुम्हीही ही शिकवण पाळली तर तुमचं आयुष्य नक्की सुखकर होईल.

प्रत्येक उजाडणारी पहाट दोन पर्याय घेवून येते, एक म्हणजे झोपून स्वप्न पहात रहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. दोन्ही ही पर्याय सर्वांना मिळतात. एव्हाना प्रत्येक क्षणाला वेळ बदलत असते. स्वतःला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक क्षणी नवीन काही तरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यश मिळाले तर उत्तमच परंतु अपयश मिळाले तर त्यातून मिळणारा अनुभव हा फक्त स्वतःचाच असेल. सतत नवनवीन प्रयत्न करत राहिले पाहिजे. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. संकट कितीही मोठं असुद्या, फक्त प्रयत्न आणि विश्‍वास कायम ठेवा,  तुम्हाला जरूर यश मिळेल.

नेहमी एक लक्षात ठेवले पाहिजे. “ज्याला धन कमवायचे आहे, त्याने कण सुद्धा वाया घालवू नये.” “ज्याला ज्ञान कमवायचे आहे. त्याने क्षण सुद्धा वाया घालवू नये.” याचे एक उत्तम उदारहण द्यायचे झाले तर, एकदा गौतम बुद्ध समुद्राच्या किनारी फिरण्यासाठी जातात. तेथे त्यांना लाटेबरोबर किनार्‍यावर येणारे असंख्य मासे तडफडताना दिसतात. ते लगेचच त्या माश्यांच्या मदतीला धावून जातात. लाटेबरोबर किनार्‍यावर येणारे तडफडणारे मासे एकेक करून पुन्हा समुद्रात टाकत होते. त्याच वेळी दुसरी एक व्यक्ती किनार्‍यावर फेरफटका मारत होती.

बुद्धांच्या कृतीकडे पाहून त्याला हसायला आले. तो म्हणाला, ‘अरे, “तु हे काय करतो आहेस? असे हाताने एकेक मासा पाण्यात टाकून काय मिळणार आहे? का स्वत:चा वेळ वाया घालवत आहेस? हे ऐकूण बुद्धांनी त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करत म्हणाले, ‘मला समाधान मिळेल, परंतु ज्याच्यासाठी मी हे करत आहे, त्या माशांना याचा नक्कीच फायदा होईल.” काही गोष्टी क्षुल्लक आणि छोट्या वाटतात. म्हणून त्या करणे टाळल्या जातात. परंतु ज्याच्यासाठी आपण करत असतो, त्याच्यासाठी ती गोष्ट फार मोठी आणि महत्वाची असू शकते. एक मात्र खरे आहे, “चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतात.”

या उदाहरणातून एवढंच लक्षात घेतले पाहिजे. ‘आजचा एखादा चांगला विचार, उद्या कोणाचे तरी उत्तम भविष्य घडवू शकतो.’ इतर व्यक्ती काय आणि कसा विचार करतात यापेक्षा आपण स्वत: बद्दल कसा विचार करता हे महत्वाचे असते. फुलाला वाढायला ज्या प्रकारे सुर्य किरणांची आवश्यकता असते, तसेच स्वतःच्या प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते. आपल्या गुणवत्तेवर किंवा क्षमतांवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा मानू नका. कारण, “लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही.”

बुद्ध हे अतिशय शांत होते. त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे. असे संत ज्यांनी समाजाला शांततेची शिकवण दिली. गौतम बुद्धांचे विचार खास तुमच्यासाठी सांगण्याचा छोटासा माझा प्रयत्न आहे. गौतम बुद्धांचे सुविचार अगदी शाळेपासून शिकवण्यात येतात. गौतम बुद्ध विचार मांडल्यानंतर त्यांचे आचरण करण्यासाठी थोडे सुकर करून देण्याचा प्रयास आहे. गौतम बुद्ध विचारांच्यामुळे आपल्याला रोजच्या आयुष्याला प्रेरणा मिळते. आयुष्याला प्रेरणादायी ठरणारे असे काही गौतम बुद्धांचे विचार म्हणजे सत्यवाणीच अमृतवाणी आहे, सत्यवाणीच सनातन धर्म आहे. सत्य, सदर्थ आणि सधर्मावर संत सदैव दृढ असतात. असत्य बोलणारे नरक जिवंतपणी यातना भोगतात.

ज्याला खोटं बोलायला लाज वाटत नाही, त्याचे साधूपण रिकाम्या मटक्याप्रमाणे आहे. साधुतेचे एक थेंब देखील त्याच्या हृदयात नाही. सभेत, परिषदेत किंवा एकांतात कोणाशीही खोटे बोलू नये. खोटे बोलण्यासाठी दुसर्‍याला भाग पडू नये. असत्य बोलण्यासाठी प्रोत्साहित करू नये. असत्याचा परित्याग केला पाहिजे. जीवनात हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय प्राप्त करणे सर्वोत्तम ठरेल. मग जीत नेहमी आपलीच होणार, ही जीत तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. हजारो पोकळ शब्दांपेक्षा एकच चांगला शब्द योग्य आहे ज्यामुळे शांती नांदेल. संतोष सर्वात मोठे धन आहे, निष्ठा सर्वात मोठे संबंध आहे आणि आरोग्य सर्वात मोठे उपहार आहे. भूतकाळावर लक्ष देऊ नये, भविष्याबद्दल विचार करू नये, आपले मन वर्तमानावर केंद्रित करा. ज्याला हेतुपुरस्सर खोटं बोलण्यात लाज वाटत नाही, ती व्यक्ती कुठलेही पाप करू शकते. म्हणून मनात ठरवून घ्यावे की मी विनोद करताना देखील असत्य बोलणार नाही.

काही लोक सांप्रदायिक मतांमध्ये पडून विविध प्रकाराचे तर्क प्रस्तुत करतात आणि सत्य - असत्य दोन्ही मांडतात, अरे पण सत्य तर जगात एकच आहे, अनेक नव्हे. ध्यान करून ज्ञान मिळवता येते आणि ज्ञान नसेल तर माणूस अज्ञानी राहतो. आपण ह्या गोष्टी जरूर लक्षात घ्याव्यात की कोणत्या गोष्टी आपल्याला समोर घेऊन जातील आणि कोणत्या अडवून ठेवतील, म्हणून तेच निवडा जे तुम्हाला ज्ञानाकडे, ध्येयाकडे घेऊन जातील.  हे एक अंतिम सत्य आहे की द्वेषाचा अंत हा द्वेषाने नाही तर प्रेमानेच संभव आहे. आपण जो आणि जसा विचार करू अगदी तसेच बनतो. काय घडून गेलं यापेक्षा काय करायचं बाकी आणि काय करता येईल याकडे मी जास्त लक्ष द्यावं. राग येणे ही समस्या नाही तर विचार आहे. जसा तुम्ही रागाचा विचार करणे सोडून द्याल तसा तो सहज नाहीसा होईल. रागाला शांततेने जिंका, वाईटाला चांगल्याने जिंका आणि असत्याला सत्य बोलून जिंका. जे लोकं राग येणाऱ्या विचारापासून स्वतःला मुक्त करतात, शांतता त्यांनाच प्राप्त होते. जर तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्यांना दुःख देऊ शकत नाही. आभाळासाठी पूर्व आणि पश्चिम दोन्ही सारखेच मात्र लोकं अश्या गोष्टीमध्ये भेदभाव करतात त्यावर विश्वास देखील ठेवतात.

जर तुम्ही रागावले तर तुम्हाला शिक्षा मिळणार नाही मात्र राग येणे हिच तुम्हाला खूप मोठी शिक्षा आहे. तुम्ही कितीही चांगले विचार वाचा, बोला मात्र जो पर्यंत तुम्ही त्यांना अमलात आणणार नाही तोपर्यंत तुमचं काहीही चांगलं होणार नाही. जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणे आणि त्यांचा द्वेष करणे सोडून द्या. जर तुम्ही तुमचा मार्ग नाही सोडला, त्यावरच चालत रहाल तर निश्चितच तुम्ही तिथं पोहचाल जिथं तुम्हाला जायचं आहे. लहान लहान नद्याच जास्त आवाज करतात, विशाल महासागर तर अगदी शांत असतात. पूर्ण विश्वात असा एक पण व्यक्ती नाही जो तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करेल. तुम्ही बाहेर कितीही शांतता शोधा परंतु मिळणार ती तुम्हाला तुमच्या आतच मिळणार आहे. जंगली प्राण्यापेक्षा आपण आपल्या कपटी आणि दुष्ट मित्रापासून जास्त सावध रहा. जंगली प्राणी फक्त तुम्हाला शारीरिक हानी पोहचवू शकतो मात्र एखादा वाईट मित्र तुम्हाला मानसिक हानीही पोहचवू शकतो. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्याला सत्याचा विसर पडू शकतो. जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल त्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागेल, दुसऱ्यावर अवलंबून राहून ती मिळणार नाही.

सूर्य, चंद्र आणि सत्य हे जास्त काळ लपून राहू शकत नाही. अंधारात चालण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते तशीच जीवन जगण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची गरज असते. आरोग्य ही सर्वात चांगली भेट, समाधान हे सर्वात मोठं धन तर विश्वास हे सर्वात चांगलं नातं आहे.  आज आपण जे काही आहोत, ते आपण जो विचार केला आणि त्यावर काम केलं त्याचाच परिणाम आहे. जो वाईट विचार करेल आणि त्यावरच काम करेल त्याला नेहमी दुःखच मिळेल याउलट जर चांगला विचार करून त्यावर काम केलं तर आनंद हा सावलीसारखा आपल्या सोबत असेल. केवळ चांगला विचार करून, बोलून कुणी चांगलं ठरत नाही तर त्या विचारांना अमलात आणून जगणारे चांगले असतात.

प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्यासाठी स्वतः जबाबदार  असतो. आज या कोरोना महामारीमध्ये स्वत: शासनाने सांगितले आहे की, “माझे कुटुंब माझी जबाबदारी”, “मीच माझा आणि माझ्या समाजाचा जबाबदार आहे”, तसेच आपण प्राथमिक स्वरुपात स्वत:ची जबाबदारी काळजी घेतली तर आपण समाज सुद्धा वाचवू शकतो. आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही तर आनंद हा आपण कसं अनुभवतो, इतरांसोबत कसा व्यवहार करतो आणि इतरांशी कसं बोलतो यातून मिळतो. एक क्षण दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन हे पूर्ण विश्व बदलू शकतो.

जीवनाचा सर्वात मोठा उद्देश हा स्वतःच्या जीवनाचा उद्देश माहिती करून घेणे असतो आणि त्यानंतर पूर्ण समर्पण करून तो पूर्ण करण्यासाठी जीवन घालवणे. आनंद हा आपल्याजवळ काय आहे यात नसून आपण काय देऊ शकतो यात आहे. जर तुम्ही हा विचार करत असाल की तुम्हाला इतर कुणी आनंद आणि दुःख देऊ शकतो तर ते हास्यास्पद असेल. इतरांवर विजय मिळवणे यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे खूप मोठं आहे. जर एखाद्या समस्येचं समाधान निघत असेल तर चिंता का करायची? आणि समाधान निघत नसेल तर चिंता करून काहीच उपयोग होणार नाही.

ज्याप्रकारे एखाद्या डोंगराला वाहत्या हवेने काहीच फरक पडत नाही अगदी तसंच एखाद्या बुद्धिमान व्यक्ती प्रशंसा आणि निंदा यांनी तिळमात्रही विचलित होत नाही. या पूर्ण जगात एवढा अंधार नाही की तो एका दिव्याचा प्रकाश विझवू शकेल. केवळ मनाला वाटते म्हणून माणूस वाईट कृत्य करतो. जर त्या मनालाच परिवर्तित केलं तर सर्व वाईट कामं संपतीलजर तुमच्या आयुष्यात मायाळूपणा, दयाभाव नसेल तर तुमचं जीवन अर्धवट आहे. आपणच आपल्या नशिबाचे लेखक आहोत. आपण जन्म एकट्यानेच घेतो आणि मरतोसुद्धा एकटेच म्हणून स्वतःचा रस्ता स्वतः बनवा आणि त्यावरच चालत रहा. आपल्याला उन्नतीसाठी आपल्यालाच काम करावं लागेल यासाठी तुम्ही इतरांवर अवलंबून नाही राहू शकत. आपलं असत्यवादी असणं हेच आपल्या अपयशाचं कारण असते. 

या लेखातून बुद्धांचे विचार मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी जेवढे जमतील तेवढे विचार अवलंबून स्वत:चे जीवन अधिक सुखकर करावे एवढीच विनंती आहे.

धन्यवाद...

- श्री. मंगेश विठ्ठल कोळी, शिरोळ.

मो.- ९०२८७१३८२०.


Thursday, March 25, 2021

स्वतःची भरीव साथ हवी.

 

आज समुपदेशन करीत असताना एक खूप सुंदर गोष्टींचा शोध मला लागला. एक सुशिक्षित व्यक्ती ज्याच्याकडे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असून सुद्धा त्याचे मन मात्र उदास, खिन्न, निरुत्साही, नैराशेच्या छायेत गुरफटून गेले होते. आपण या नैराश्य रुपी संकटातून कधीच बाहेर पडू शकणार नाही, इतपत त्याची मानसिकता झाली होती. त्याच्या कोण्या मित्राने उत्तम समुपदेशक म्हणून माझे नाव त्याला सुचवले होते म्हणून तो माझ्याकडे आला होता. मी ठरवून दिलेल्या वेळेस आम्ही माझ्या समुपदेशनाच्या खोलीमध्ये भेटलो. भेटल्यानंतर सुरुवातीच्या संभाषणातून त्याचे नैराश्येने ग्रासलेले मन मला जाणवले. त्या व्यक्तीने स्वतःचा भूतकाळ, स्वतःची पार्श्वभूमी सांगितली. त्यातून त्या व्यक्तीने खूप प्रगती केल्याचे मला जाणवले. परंतु ती व्यक्ती मनापासून सुखी, आनंदी वाटत नव्हती. त्याचे एक कारण माझ्या लक्षात आले. भेटायला आलेली व्यक्ती शारीरिक दृष्ट्या सदृढ होती. भौतिक सर्व सुख देणाऱ्या वस्तू त्याच्याकडे होत्या. परंतु अंतर्मन सुखी नव्हते, याची त्या व्यक्तीला पुरेपुर जाणीव होती. उदासीनता, खिन्न झालेले मनाचे आनंदात, उत्साहात कसे रूपांतर करायचे हा प्रश्न घेऊन माझ्याकडे आली होती.

मी त्या व्यक्तीच्या सर्व गोष्टी शांतपणे ऐकून घेतल्या. मी त्यावरील उपाययोजना सांगण्यास सुरुवात केली. मी जसजसे त्याच्या मनाचे समाधान करत गेलो तसतसे त्याचे नैराशेच्या गर्द छायेत असणारे मन ताजेतवाने, आनंदी, उत्साही होऊ लागले. शेवटी मी त्या व्यक्तीला माझ्या वाचनात आलेलं उदाहरण सांगितले. ते उदाहरण असे की...

एका गावात फुटबॉलचा सामना चालू होता. लोकं, प्रेक्षक खेळाचा आनंद लुटत होते. तेव्हा रस्त्याने जाणारा एक व्यक्ती. काय झाले म्हणून उत्सुकतेने त्यात सामील झाला आणि पाहू लागला. तर खेळाडू फुटबॉल लाथेने मारत मैदानात टोलवाटोलवी करत होते.

त्या व्यक्तीला आश्र्चर्य वाटले. हे लोकं त्या चेंडूला लाथेने का मारत असतील बरे!

नाराजी व्यक्त करत त्याने जवळच्या एका जाणकारांना विचारले.

हे सर्व लोकं त्या चेंडूला का मारत आहेत? त्याची काय चूक आहे?

तो जाणकार व्यक्ती म्हणाला, त्या चेंडूची एकच चूक आहे की तो आतून पोकळ आहे.

जर तो चेंडू आतून भक्कम असता तर, या लोकांची काय बिशाद आहे त्याला लाथेने मारायची..!

आज माझ्या समोर बसलेल्या त्या व्यक्तीची हीच अवस्था झाली आहे. समाज बाह्यांगाने, भौतिक सुखाने तो भक्कम दिसत होता. त्यासाठी तो सतत कार्यरत होता. परंतु स्वतःच्या आत्मिक, मानसिक सुखपासून दूर गेला होता. परंतु तो भौतिक सुखाच्या मागे लागून तो आतून पोखरला गेला होता. त्यामुळेच आज ती व्यक्ती मानसिक दृष्ट्या कमकुवत होत चालली होती. आतून मजबूत व्हायला हवे. तरच आपण सुखी होऊ शकतो याची जाणीव मी त्याला करून दिली.

सर्व समुपदेशनाच्या शेवटी मला समजले की, आपल्या समाजामध्ये जवळपास सर्वच व्यक्तींना अशा समुपदेशनाची गरज आहे.

वरील उदाहरण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात त्याचा वापर केला तर कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही समस्येतून बाहेर पडण्याचे बळ, शक्ती ही इतर कोणाच्यात नसून ती फक्त आणि फक्त स्वतः मध्ये असते. हा आत्मविश्वास जरूर निर्माण होईल. याची मला नक्कीच खात्री आहे.

- श्री. मंगेश विठ्ठल कोळी.

- मो. 9028713820

Monday, January 25, 2021

समज - गैरसमज...

तहान-भुकेने अगदी व्याकुळ घामाने चिंब झालेले तुम्ही  बऱ्या पैकी सावली असलेलं झाड शोधून आस-पास कुठे पाणी मिळतय का हे बघताय तेवढ्यात समोरच्या बिल्डिंग मधल्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्ती कडे तुमचं लक्ष जात आणि ती व्यक्ती तुम्हाला पाणी हवंय का विचारते !

त्या क्षणी तुम्हाला काय वाटेल? त्या व्यक्ती बद्दल तुमचं मत काय होईल?

ती व्यक्ती मग  खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते , तुम्ही लगबगीने तिथे जाता पण नंतरची 15 मिनटं तिथे कोणीही येत नाही !

आता तुम्हाला त्या व्यक्ती बद्दल  काय वाटेल?

हे तुमचं दुसरं मत असणार आहे?

थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथे येते आणि म्हणते "सॉरी मला जरा उशीर झाला पण तुमची अवस्था बघून मी तुम्हाला नुसत्याच  पाण्या ऐवजी लिंबू पाणी आणलं आहे ! "

आता तुमचं त्या व्यक्ती बद्दल मत काय आहे ?

तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येत की अरे ह्यात साखर अजीबातच नाहीये !

आता तुमचं त्या व्यक्ती बद्दल काय मत होईल?

तुमचा आंबट झालेला चेहरा पाहून ती व्यक्ती खिशातून हळूच एक साखरेचा छोटा पाऊच काढते आणि म्हणते..

तुम्हाला चालत असेल नसेल आणि किती कमी जास्त गोड आवडत असेल हा विचार करून मी मुद्दामच आधी साखर घातली नाहीये !

आता तुमचं त्या व्यक्ती बद्दल काय मत झालं आहे?

मग विचार करा अवघ्या 15 -20 मिनिटात तुम्हाला तुमची मत, तुमचे आडाखे भरभर बदलावे  लागतायत.

अगदीच सामान्यातल्या सामान्य परिस्थितीत क्षणात आपले विचार, आपली मतं तद्दन चुकीची ठरू शकतात तर मग कोणा बद्दल फारशी काहीच माहिती नसताना, ती व्यक्ती पुढे कशी वागणार आहे हे माहीत नसताना केवळ वरवर पाहून त्या बद्दल चुकीची समजूत करून घेणं  योग्य आहे का ?

जर नाही तर एखाद्या बद्दल गैरसमज करून घेण्या पेक्षा त्या व्यक्तीला समजून घेणे योग्य नाही का ?

असं आहे की, जो पर्यंत कोणी तुमच्या अपेक्षे प्रमाणे वागतय तो पर्यंतच ते चांगले असतात नाहीतर वाईट ?

गैरसमज फार वाईट परिणाम करणारे ठरतात तेव्हा "एकमेकांना समजून घ्या" म्हणजे जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत.

कोणाविषयी मत बनवताना घाई करु नये...!!

Friday, January 22, 2021

कर्म रिटर्न्स मिळतेच...

 

एका सुंदर शहरात छान बंगल्याची एक कॉलनी होती. त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा असतो. त्यामुळे शेजारच्या बंगल्यातील मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत. त्यामुळे तिथं कचऱ्याचा भला मोठा ढीग साचलेला. 

अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडपं राहायला येत. कंपाउंड दार उघडून ते आत येताच समोर हा कचऱ्याचा ढीग दिसतो. ती चिडते, वैतागते. हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते. तो मात्र शांत असतो. तिला "आधी आत तर जाऊया" असं हसून म्हणत तिला आत घेऊन येतो. येतानाच बाहेरून जेवून आल्याने आता हाताशी वेळ असतो. तर तो तिला म्हणतो, "गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसतेय तर तू  तिथं थोडा आराम कर" असं म्हणून तिला तिथं बसवून हा पठया हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो. नंतर बागेत येतो. तिथला कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो. बागकामासाठी लागणारी हत्यारे तिथेच बागेत एका छोट्या कपाटात असतात. त्यातून तो कुदळ फावडे घेऊन एक छोटा खड्डा तयार करतो. त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती व पाणी शिंपडून खड्डा बंद करतो. 

नंतर पाईप घेऊन त्याने पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो. मरगळलेली ती झाडे आता एकदम तरारून येतात. जमिनीवरची हिरवळ देखील जणू खुश होऊन डोलू लागते. एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरत. अन त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याचे, चिकूचे, पेरूचे झाडे आहेत. त्या झाडाला मग तो थोडं पाणी टाकून ठेवतो. 

हे करता करता संध्याकाळ होते. तोही थकून गेलेला असतो. तोवर ती हि आतून बाहेर येते. म्हणते, "मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे. मात्र आता किचनचा कंटाळा आलाय रे"

तो म्हणतो, "हरकत नाही, आपण बाहेर जाऊया. थोडं फिरणं पण होईल अन येताना खाऊन येऊ"

त्याप्रमाणे दोघे तयार होऊन बाहेर जातात. 

त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोवर हे सगळं पाहत असतात. मात्र रोजच्या सवयीने रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात. अन दार बंद करून आत बसतात. 

हे तरुण जोडपं जेव्हा फिरून खाऊन घरी येत तर दिसत की पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकला आहे. ती आता मात्र खवळते. "मी बघतेच त्यांच्याकडे" असं म्हणून ती शेजारी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो अन हसून म्हणतो, "तू आत जा. बाकी सोड माझ्यावर" असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून त्या दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो.

असे रोजच होऊ लागते. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात अन हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवत असे. हळूहळू त्या खड्ड्यातील कचऱ्याचे मस्त सेंद्रिय खत तयार होते. ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकत राहतो. त्यामुळे लवकरच त्या झाडाला मस्त फळे येतात. 

अन त्या दिवशी तो एक धमाल निर्णय घेतो. 

नेहमीप्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात. तो हा कचरा गोळा करून शोष खड्ड्यात टाकतो. अन सकाळी उठल्यावर त्या बागेतली झकास अशी तयार झालेली फळे तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो. बेल वाजवतो. आतून तिथली मंडळी पिप होलमधून पाहतात तर हा तरुण दिसतो. ते शेजारी गडबडतात की आता भांडायला आला की काय ? असं म्हणून ते भांडणाच्या तयारीत दार उघडतात तर समोर हा तरुण हसतमुखाने हातातली फळाची टोपली त्या शेजाऱ्याला देतो. 

शेजारी चकित होतो. शेवटी ओशाळून तोच म्हणतो की, "आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाहीत तर उलट आम्हालाच फळे द्यायला आलात. हे कसे काय?"

तर तो तरुण म्हणाला, 

*ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो.*

तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला. माझ्याकडे फळे होती ती मी दिली, 

उलट यामध्ये पण तुमचेच आभार मानेल की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या झाडाला लवकर फळे आली. थँक्स"

असं बोलून शांतपणे तो तरुण निघून येतो. 

 तुम्हाला सुखी व्हायच असेल तर एकच गोष्ट विसरू नका. कर्म रिटर्न्स हे तर असतंच. तुम्ही चांगले केले तर त्याचे फळ चांगले मिळणार, मात्र त्याचवेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉजिटीव्ह असे काहीतरी काय करता येईल हे पहा. (जसे त्या तरुणाने कचऱ्याचे खत केले) मग तुमच्या मनाला शांतता लाभेल. चिडचिड होणार नाही. 

*कर्म हे असे एक हॉटेल आहे,*

*जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही.*

*तिथे तुम्हाला तेच मिळते*

*जे तुम्ही शिजवलेले असते.*

कुठेतरी मस्त ऐकण्यात आलेलं सांगतो.....

*दाग तेरे दामन के धुले न धुले,

नेकी तेरी कही तुले न तुले,

मांग ले गलतियो कि माफी,

कभी तो खुदसे हि,

क्या पता ये आँखे,

कल खुले न खुले..!!

Saturday, January 16, 2021

नक्की काय हवं???


 कामाची लाज वाटणं हा तरुण मुलामुलींचा पहिला दोष. इच्छाशक्ती कमी आणि मेहनतीचा कंटाळा हा दुसरा मोठा दोष आहे. सगळ्यांना भरपूर पॅकेज देणारं, बिनकष्टाचं करिअर हवंय. सगळे गर्दीत, इंजिनिअरिंगच्या रांगेत उभे. का उभे? तर तिथं सगळेच जातात म्हणून आपणही जायचं. नवीन काही सुचत नाही, कुठल्याच विषयाची पुरेशी माहिती नाही, अभ्यास नाही, वाचन नाही, इंग्रजीची भीती वाटतेच आणि मराठीत धड काही बोलता येत नाही. आपण जे शिकतो, त्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या माणसांची नावं सांगता येत नाही. भविष्यातल्या बदलांचा अंदाज तर शून्यच. परिणाम काय? नैराश्य, हताशा आणि पैशाचा चक्काचूर.

दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्यात आमचा करिअर काऊन्सेलिंगचा हंगाम सुरू होतो. यावर्षीही झाला. मी यावर्षी जवळपास एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांच्या पालकांशीदेखील मी चर्चा केली. आपल्या मुलांनी संधी असूनसुद्धा अनेक गोष्टी पाहिलेल्या किंवा ऐकलेल्यासुद्धा नाहीत, असा मला अनुभव आला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण साध्या साध्या माहितीपासूनसुद्धा किती दूर आहोत, याची दुर्दैवी जाणीव झाली. 

उदाहरणादाखल मी काही गोष्टी पालकांसमोर मांडू इच्छितो -

१) मलाला युसुफजाई? - कोण ते माहीत नाही.

२) मेक इन इंडिया हे प्रदर्शन? - काय होते, कशासाठी होते हे माहीत नाही.

३) कोणत्याही १० पुस्तकांची नावं (तुम्ही वाचलेल्या किंवा न वाचलेल्या) - सांगता आली नाहीत.

४) भारतातील एकूण राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश यांची नावं? - सांगता आली नाहीत.

५) बॅँकेत डिमाण्ड ड्राफ्ट कसा काढतात? - माहीत नाही.

६) भारताचं चीनशी नेमकं भांडण आहे तरी काय? - माहीत नाही.

७) इनव्हर्टर नेमकं कसं काम करतो? - माहीत नाही.

८) आॅनलाइन मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांना नफा मिळतो का? किंवा कसा मिळतो? - माहीत नाही.

९) चार्टर्ड अकाउंटंटचं नेमकं काम काय असतं? - माहीत नाही.

१०) माहितीचा अधिकार म्हणजे काय? - माहीत नाही.

११) काळा पैसा म्हणजे काय? - माहीत नाही.

१२) कोणत्याही १० आजारांची नावं? - सांगता येत नाहीत.

१३) वायरलेस चार्जरमध्ये कोणतं तंत्र वापरलं आहे? - माहीत नाही.

१४) अ‍ॅण्ड्रॉइड म्हणजे काय? - माहीत नाही.

१५) जगातील सर्वात श्रीमंत अशा कोणत्याही १० व्यक्ती? - सांगता आल्या नाहीत.

हे मी जे सांगतोय ते १०० टक्के सत्य आहे, एकही शब्द खोटा नाही. यादी खूप मोठी आहे आणि आपल्या समजुतींना मोठे हादरे देणारी आहे. मग मुलं करिअरचे निर्णय घेतात तरी कसे? पालक आणि शिक्षक नेमकं करतात तरी काय? मुलं काहीही नवीन वाचत नाहीत, त्यांची भाषा शुद्ध नाही, उच्चार स्पष्ट नाहीत, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते नीट मांडता येत नाही, एखाद्या गोष्टीवर त्यांना त्यांचं मतच नाही. अशा मुलांचा टिकाव स्पर्धेत लागणार आहे का? मुलांना जगातल्या अनेक गोष्टी माहितीच नाहीत, याची माहिती पालकांना नाही. हे सगळं फार धक्कादायक आहे. निराशाजनक आहे..

आला विद्यार्थी की करा अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट हा प्रकार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्यच अंधारात टाकणारा आहे. माझ्या परिचयातल्या एका मुलीला एका ख्यातकीर्त तज्ज्ञांनी तू टेलरिंग किंवा ब्यूटिपार्लरचा कोर्स केलेला बरा, त्यापेक्षा अधिक काही तुला झेपणार नाही असं एकदम ठासून सांगितलं. आश्चर्य म्हणजे तीच मुलगी एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजीमध्ये तिच्या कॉलेजात दुसरी आली. आणि असा दुर्दैवी प्रकार मोठ्या शहरांमध्ये चालत असेल, तर महाराष्ट्रातल्या निमशहरी किंवा ग्रामीण भागात तर दैनाच उडाली असेल..

अंगठ्याच्या ठशावरून करिअर गायडन्स करणाऱ्या व्यक्तींची संख्या पुण्यात चांगलीच फोफावतीय. करिअरविषयीचा निर्णय अशाप्रकारे बोटांचे ठसे पाहून सांगण्याचा उद्योग ‘अ‍ॅप्टीट्यूड टेस्टिंग’च्या नावानं काही लोक करतात, याचं दु:ख मोठं आहे. ‘जा तू इंजिनिअरिंगला’ किंवा ‘कर तू सीए’ असा एका वाक्यात संपणारा करिअर गायडन्सचा उद्योग मी अनेक ठिकाणी पाहतो, मला त्या पालकांची कीव येते. अ‍ॅप्टीट्यूड हा एक अतिशय गहन अभ्यासाचा विषय आहे. कुणीही उठावं आणि स्वत:ला करिअर गायडन्स तज्ज्ञ म्हणवून घ्यावं, इतकं ते सोपं नाही. अर्धवट माहिती, अपुरं ज्ञान, क्र ेझ आणि कमी कष्टात दणदणीत पॅकेज मिळवण्याचा मोह या गोष्टींमध्ये आजचा विद्यार्थी अडकला आहे. त्याचे पालकही याच चक्र व्यूहात अडकले आहेत. त्यांना नीट मार्गदर्शन मिळालं नाही तर त्या मुलाचं पूर्ण करिअरच धोक्यात येतं आणि शिवाय आईवडिलांचं मोठं आर्थिक नुकसानही होतं. 

अनेक करिअर काऊन्सेलर्सना स्वत:लाच आयआयटी, मेडिकल, चार्टर्ड अकाउन्टन्सी या क्षेत्रांबद्दल इतकं प्रचंड आकर्षण असतं की, ते जो येईल त्याला हेच २-३ पर्याय सुचवत असतात. समाजातली बेरोजगारी आणि सुशिक्षित तरुणांमधलं नैराश्य वाढायला याच गोष्टी कारणीभूत असतात. अनेक कोचिंग क्लासेस स्वत:चा व्यवसाय वाढावा म्हणून विद्यार्थ्यांच्या कुठल्यातरी प्रवेश परीक्षा घेऊन पालकांना वाटेल ती चकचकीत आश्वासनं द्यायला अजिबात मागे-पुढे पाहत नाहीत. दहावीनंतर असा चुकीचा गायडन्स घेऊन पुढचा रस्ता पकडणारा विद्यार्थी बारावीला बरोबर खड्ड्यात पडतोच. तोपर्यंत कॉलेजची फी, कोचिंग क्लासची फी, टू व्हीलर, मोबाइल फोन, लॅपटॉप, पर्सनल ट्यूशन, वह्यापुस्तकं या व अशा अनेक गोष्टींवर कमीत कमी ६-७ लाख रुपयांचा अवाढव्य खर्च करून पालकांना आधीच दरदरून घाम फुटलेला असतो. तेल गेलं, तूपही गेलं आणि शेवटी धुपाटणंसुद्धा गेलं अशी पालकांची अवस्था होते. या अवस्थेतलं गांभीर्य नीट समजून घ्यायला पाहिजे.

शिक्षण आता पूर्वीसारखं साचेबद्ध राहिलेलं नाही. ते आता खरोखरच व्यापक झालं आहे. नव्या संधी उपलब्ध होत आहेत. भविष्यातही अनेक नवी दारं उघडतीलच. लेदर प्रोसेसिंगपासून ते फूड कॉर्नर चालवण्यापर्यंत आणि सोने-चांदीवरील कारागिरीपासून ते पिठाच्या गिरणीपर्यंत जवळपास १० हजारांहून अधिक उद्योगमार्ग आणि योजना उपलब्ध असतानाही मुलंमुली नैराश्यात जातातच कशी आणि आत्महत्या करतातच कशी हा प्रश्न कुणालाच कसा काय पडत नाही? स्वत:विषयीच्या वाढलेल्या खोट्या आणि बेगडी अपेक्षा हे या समस्येचं खरं कारण आहे. अन्यथा कुणी विद्यार्थी केवळ नापास झाला म्हणून आत्महत्या करेल का? - हा साधा सरळ प्रश्न आहे. 

कॉस्मेटिक्स मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, टाउनशिप मॅनेजमेंट, वॉटर हार्वेस्टिंग, अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स मॅनेजमेंट, कोल्ड स्टोरेज मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये आभाळभर संधी असतानाही विद्यार्थ्यांना नैराश्य का बरं यावं? अपुरी आणि अर्धवट माहिती, चकचकीत आयुष्याची क्रेझ, चुकीचे आदर्श, चटकन भरमसाठ पॅकेजेस मिळवण्याचा हव्यास हे नैराश्येचं खरं कारण..

मी तुम्हाला एक गंमत सांगतो..

पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर पोरवाल सायकल्सच्या बाहेर काही मसाजवाले बसतात, हे मी पाहिलं होतं. मी गेलो. बेताची उंची, अंगात कॉटनचा शर्ट, काचा मारलेलं धोतर, पायात स्लीपर आणि हातात टॉवेल अशा पोशाखाची दोन-तीन माणसं बसलेली होती. जॉनी वॉकरच्या मालिश तेल मालिश गाण्यात त्याच्याकडे निदान एक लाकडी खुर्ची तरी होती, इकडे तर सगळा फुटपाथवरच कारभार. मी त्यांच्यातल्या एका मुलाला भेटलो. आंध्र प्रदेशातून हा मुलगा पुण्यात आला. सुरुवातीला मजूर, हमाल, कष्टकरी माणसांचे हातपाय रगडून द्यायचा. मग मार्केटयार्ड ते लक्ष्मीरोड अशी प्रगती झाली. जागा भाडं नाही, विजबिल नाही, कुठलीही साधनं नाहीत. एक साधी तेलाची बाटली आणि एक स्वच्छ टॉवेल. बास. भांडवल काहीही नाही. बंद दुकानाच्या पायरीवर व्यवसाय चालतो. पण, कौशल्य आहे आणि मेहनतही आहे. अतिशय मितभाषी असावं लागतं. बोलणं कमी अन् काम जास्त करावं लागतं. अर्थप्राप्ती उत्तम होते. खेळाडू, दुकानदार, व्यावसायिक, अर्धांगवायू रुग्ण अशा अनेक प्रकारच्या व्यक्ती मालिशकरिता येतात. अगदीच नाही म्हटलं तरी रोज रात्री ९.३० ते १२.३० यावेळात बिनभांडवली ८०० ते १२०० रुपये मिळतात. साधारण मासिक अर्थप्राप्ती २५ ते ४० हजारांच्या दरम्यान होते. वर्षाकाठी साधारण पाच लाख रुपये मिळतात. काही लोकांच्या घरी जाऊन मालिश करायची असल्यास ५०० ते १००० रुपये घेतात. त्याचे साधारण वर्षाकाठी दीड ते दोन लाख रुपये मिळतात. 

काय वाईट आहे? आणि काय गैर आहे?

आपण जरा कल्पना करून पाहू..

एखाद्या शहराच्या महापालिकेच्या शाळांमध्ये पहाटे ५.३० ते ८.३० योगासनं व सूर्यनमस्कार वर्ग चालतो आहे. त्या शहरातले इयत्ता बारावीनंतर योगासनं व सूर्यनमस्कार प्रशिक्षण घेतलेले महापालिकेच्या शाळांमधून शिकलेले १००० विद्यार्थी आता सूर्यनमस्कार प्रशिक्षक बनले आहेत. आर्थिक प्रगती उत्तम. सायंकाळी महापालिकेच्या शाळांच्या मैदानांवर हास्ययोग क्लब चालतो. त्या शहरातील १००० महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी हास्ययोग प्रशिक्षित असून, त्यांच्यामार्फत हे वर्ग चालवले जातात. महापालिका शाळांच्या मैदानावर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सायकल क्लब चालतात. सुरक्षित वातावरणात सायकल चालवून व्यायाम व खेळ या दोन्हीचाही आनंद शहरातले नागरिक घेत आहेत. शहरातले विविध महाविद्यालयांमध्ये शिकणारे १००० विद्यार्थी हे क्लब्ज चालवतात. त्याच शहरात महापालिकांच्या शाळांमध्ये काम करणारे ३५० समुपदेशक आहेत. हे समुपदेशक प्रत्येक आठवड्यातून दोन दिवस प्रौढांकरिता तणावमुक्त होण्यासाठी ध्यान शिबिर घेतात. १०० शाळांमध्ये ही शिबिरे चालतात. ही शिबिरे सशुल्क आहेत, त्यामुळे महापालिकेतील समुपदेशकांना उत्तम मानधन मिळत आहे. 

कल्पनेतलं हे चित्र पाहायला कसं वाटतंय? नक्कीच फार आशादायक चित्र असेल. पण अशी उद्योगव्यवसाय आयडिया कुणाला सुचते का?

या सगळ्या प्रगतीच्या संधी नाहीत का? आपल्या समाजातील बेरोजगारी कमी करण्यासाठीचा हा सर्वात जवळचा उपाय आहे. नव्या संधी शोधणं, नवे रोजगार विकसित करणं आणि त्या व्यवसायांमधील उद्योजक-व्यावसायिक तयार करणं हा मार्ग जास्त विश्वासार्ह आहे. स्वत:च्या प्रामाणिक कष्टांना चांगली फळं यायला लागली की शॉर्टकट्स मारावे लागत नाहीत. कारण, स्वत:ची प्रगती करण्याचा मार्ग चांगला स्पष्ट झालेला असतो. मराठी मुला-मुलींनी कामाची लाज वाटणं सोडून दिलं तर त्यांचं कल्याण होईल. आयुष्याचं भलं होईल. पानाच्या गादीवर बसून सिगारेटी-गुटखा-मावा विकणं, आॅनलाइन लॉटरीचे उद्योग करणं किंवा तत्सम टुकार कामं करण्यापेक्षा सेवाक्षेत्रात यावं आणि सचोटीनं मोठं व्हावं. खरंतर इच्छाशक्ती आणि मेहनतीचा कंटाळा हा मोठा दोष आहे. शिक्षण आवश्यक तर आहेच, पण ते योग्य दिशा देणारं आणि प्रगती करणारं हवं. योग्य करिअर निवडण्याकरिता करिअर काऊन्सेलिंग अपरिहार्य आहे. 

गेल्या सहा महिन्यांपासून माझं विविध विद्यार्थ्यांशी बोलणं होत होतं, चर्चा व्हायच्या. इमेल संवाद सुरू होते. अजूनही मी ईमेल्स वाचतोय, मुलांचे विचार पाहतोय. काम सुरू आहे. जवळपास १५०० विद्यार्थ्यांशी मी बोललो, त्यांच्या मनातले करिअरबद्दलचे विचार जाणून घेतले. 

अनेक नकारात्मक आणि निराशाजनक धक्के बसले.

या मुला-मुलींपैकी जवळपास ८५ टक्केविद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग हेच करिअर निवडायचं ठरवलंय. पण यांच्यापैकी जवळपास ७० टक्के विद्यार्थ्यांना आतापर्यंत कधीही ५५-६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले नाहीत. खोलात जाऊन पाहिलं, मग लक्षात आलं की यातले अनेकजण वारंवार नापासही झालेले आहेत. अभ्यासाचा कंटाळा आहे, इंग्रजीची भीती आहे. शाळेतही नियमित जात नाहीत. मग या विद्यार्थ्यांकडून मी आणखी माहिती मिळवली. तेव्हा लक्षात आलं की, या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगविषयी काहीच माहिती नाहीय. आणि तरीही त्यांचं स्वप्न मात्र तेच आहे. यांना इंजिनिअरिंगच्या शाखा माहीत नाहीत, जगातली सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजेस, विद्यापीठं माहीत नाहीत, संशोधनांविषयी माहिती नाही, शास्त्रज्ञ माहीत नाहीत, पेटंट्स वगैरे तर ऐकूनही माहीत नाहीत. इंजिनिअरिंग करून पुढे काय करायचंय, याची दिशाही माहीत नाही. पण तरीही यांना इंजिनिअरिंगच करायचंय. 

एकूणच परिस्थिती कठीण आहे. आता अशा मुला-मुलींकडून ते इंजिनिअर होतील आणि भारताला तांत्रिक महासत्ता करतील अशी अपेक्षा करणं म्हणजे प्लॅस्टिकच्या वेलीला खरा भोपळा लागण्याइतकं अशक्य आहे. पण मुलं आणि त्यांचे पालक हे दोघेही मृगजळाच्या मागे लागलेले असतात. त्यामुळे, वास्तविक परिस्थितीपासून ते हजारो कोस लांब असतात. हे आपल्या देशातलं चित्र असंच राहिलं तर येत्या काही वर्षांत रस्त्यावरच्या पानवाल्यापासून ते रिक्षावाला, दूधवाला, कॅब ड्रायव्हर या सगळ्या जागी इंजिनिअरिंग पदवीधरच दिसतील. जगातल्या सगळ्यात तरुण देशाची अंतर्गत अवस्था फार दयनीय होईल. 

बुद्धिमत्ता, क्षमता, संशोधक वृत्ती हे जिथं महत्त्वाचं आहे, तिथं यातलं काहीच न पाहता केवळ आंधळेपणानं आणि इतरांशी तुलना करून करिअर करायला जाणं भविष्यात अत्यंत नुकसानकारक ठरणार आहे. गेली ७० वर्षे आपण विकसनशील देश या प्रतिमेतून बाहेर का पडलो नाही, याचं हेच कारण असण्याची दाट शक्यता आहे. काय करणार, सत्य तर नेहमीच कडवट असतं...

गर्दीत जगायचं की वेगळ्या रस्त्यानं जायचं?

काही मुलं मात्र वेगळीच असतात.वेगळा विचार करतात, नव्या वाटा त्यांना माहिती तरी असतात नाहीतर त्यांनी शोधलेल्या तरी असतात. अशा मुलांकडे पाहून मात्र त्यांचं फार कौतुक वाटतं. अशा मुलांचं प्रमाण कमी आहे हे खरं पण करिअर म्हणून त्यांना जे दिसतं, त्यांची करिअरची स्वप्न म्हणून ते जी वाट पाहतात, ते पहा. त्यांना नव्या जगात करिअर म्हणून ही कामं करायची आहेत असं काहीजण सांगतात. त्या यादीवर एक नुस्ती नजर घाला, आपल्यालाच एक वेगळीच नजर मिळते..

* इकोफ्रेंडली सिमेंट

* एक लाख तास चालणारा एलईडी बल्ब

* रस्त्यावरचा धूर आणि धूळ शोषून घेणारे अ‍ॅबसॉर्बर्स

* घाण न होणारं कापड

* बाहेरचं तापमान कंट्रोल करणारी वीट

* न झजिणारे टायर्स

* टेलिरंग प्रोग्रॅमर्स

* सोलर जनसेट्स

* भाजी ताजी ठेवणारा व्हेजिटेबल कुलर

* १०० तासांहून अधिक काळ चालणारी मोबाईल बॅटरी

* तीन मजली रस्ता

* प्रोजेक्टर टीव्ही

* देशभर फ्री कॉलिंग देणारी वायर्ड टेलिफोन यंत्रणा

* शाळांकरिता डिजिटल डेस्क

* कम्युनिकेशन व लॅपटॉप चं कॉम्बिनेशन असणारा टेलिटॉप

* मिल्क ब्लॉक्स

हे सगळं या मुलांना सुचतं तरी कुठून? या गोष्टी प्रत्येकालाच सुचणं आणि जमणं शक्यच नाही. असा विचार करणारी मुलं नक्कीच सामान्य नाहीत. त्यांच्या बुद्धिमत्तेचा दर्जा अत्यंत उत्तम आहे. या मुलांनी शालेय स्तरावरच्या तथाकथित कोणत्याही स्पर्धापरीक्षा दिलेल्या नाहीत, ही गोष्ट अनेक मुद्यांवर विचार करायला लावणारी आहे. या कुशाग्र बुद्धिमत्तेला संधी देणं आवश्यक आहे. त्यांना काही वेगळं मार्गदर्शन आवश्यक आहे. या स्वप्नांच्यामागे निश्चितच अभ्यास आहे, निरीक्षण आहे, भरपूर वाचन आहे, माहिती गोळा केलेली आहे. हे सगळं खूप सकारात्मक आहे. आता अशा मुलांना पालकांनी वेडगळ कल्पना-बोगस कल्पना असं म्हणून झटकणं मात्र चुकीचं आहे. बुद्धिमत्ता आणि क्षमता यांचा अजिबातच विचार न करता घेतलेलं शिक्षण तसं पहायला गेलं निरूपयोगीच ठरतं. कारण, ते तुम्हाला दिशाही देऊ शकत नाही आणि विचारांची श्रीमंतीही देत नाही. 

जेवणाच्या ताटात केवळ समान संधी द्यायची म्हणून भाताएवढं मीठ किंवा मिठाएवढा भात कधीही वाढला जात नाही. ज्याचा त्याचा वकुब वेगळा! व्यक्तीनं तिच्या क्षमता आणि बुद्धीचा खरा उत्तम, नैतिक आणि संतुलित वापर करणं आणि तिला योग्य त्या क्षेत्रापर्यंत पोचवणं महत्वाचं आहे. बिनकष्टाचं करिअर होणार नाही आणि या जगात कुणीही नर्मदेतला गोटा नाही, हे पक्कं लक्षात ठेवा. टक्के-टोणपे खावेच लागणार आणि गर्दीतले धक्के तर बसणारच आहेत. गर्दीतच जगायचं की, वेगळा रस्ता निवडायचा हे आपल्यालाच ठरवावं लागणार आहे. स्पर्धेचं वास्तव जितक्या लवकर स्वीकाराल तेवढे अधिक यशस्वी व्हाल...

अरे, अ‍ॅप्टीट्यूड म्हणजे काय?

सकाळचीच गोष्ट. एकाचा फोन आला. 

अरे, अ‍ॅप्टीट्यूड म्हणजे काय? ते सोप्या शब्दात सांग ना जरा. मी त्याला जे सांगितलं ते शेअर करतो. छत्रपतींच्या एका शब्दावर ज्यांनी अपार मेहनत घेऊन प्रतापगड उभा केला ते मोरोपंत पिंगळे किंवा रायगडाचं काम करणारे हिरोजी इंदुलकर म्हणजे बांधकामशास्त्रातलं अ‍ॅप्टीट्यूड. बसल्या बैठकीत एकटाकी गाणं लिहीणारे गदिमा म्हणजे शब्दरचनेतलं अ‍ॅप्टीट्यूड आणि त्याला तशीच बसल्या बैठकीत चाल लावणारे बाबूजी म्हणजे सूररचनेतलं अ‍ॅप्टीट्यूड. हजारो शस्त्रक्रिया अत्यंत अचूक करणारे डॉ.नीतू मांडके म्हणजे शल्यशास्त्रातलं अ‍ॅप्टीट्यूड. मनातल्या विचारांचा आणि अंतरंगाचा वेध घ्यायला शिकवणारे तेजज्ञान फाऊंडेशनचे सरश्री म्हणजे मानसिक प्रशिक्षणातलं अ‍ॅप्टीट्यूड. एका खोलीत कंपनी सुरू करून तिला जगातल्या सर्वोत्तम आयटी कंपनीपर्यंत नेणारे नारायण मूर्ती म्हणजे तंत्रज्ञान संसाधनातलं अ‍ॅप्टीट्यूड.

तो मला म्हणाला, अरे, हे फारच अशक्य आहे. या लेव्हलला जाणं सध्याच्या काळात जवळ पास अशक्य आहे. स्पर्धा बघ ना किती वाढलीय ते.. 

मी त्याला उत्तर दिलं, जर तुमचं अचूक अ‍ॅप्टीट्यूड तुम्हाला समजलं असेल तर स्पर्धेचा संबंधच नाही. स्वत:ला परफेक्टली ओळखलेल्या माणसाला स्पर्धेची भीती वाटण्याचं काही कारणच नाही. अंगभूत क्षमतेच्या जोरावर तो त्याचं स्थान निर्माण करण्यास सक्षम असतो. त्यानं कशाला घाबरायचं स्पर्धेला? 

नैसर्गिक क्षमतेला पर्यायच नाहीय, असं म्हणायचंय का तुला? त्यानं विचारलं.

मीच म्हणतोय असं नाही. जगातल्या प्रत्येक क्षेत्रात टॉपला गेलेल्या प्रत्येकानं हेच आयुष्य जगलेलं आहे. त्यांना तर अप्टीट्यूडचा जिवंत अनुभवच आहे. स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..