Wednesday, September 5, 2018

माझा बाप शून्य झाला....

आज का कुणास ठाऊक? अनेक दिवसापासून मनात वडिलांविषयी नेहमीचा आदर सोडून, वेगळ काहीतरी जाणवू लागल होत. आपले पिताश्री, पिता, वडील, पालक, बाप, बाबा, डॅडी, फादर, पपा अशा अनेक नावांनी हाक मारल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या कष्टाची गोष्ट तुम्हाला सांगाविशी वाटत आहे. अनेक मुलांच्या मनामध्ये आपल्या बापाविषयी असणारी सहानुभूती किंवा त्यांच्या प्रती असणारे प्रेम कमी झाल्याची खदखद अनेक ठिकाणी बोलून दाखविली जाते, पाहायला मिळते. याची कारणे वेगवेगळी असू शकतील, परंतु हे सत्य आहे.
नेहमी सर्व ठिकाणी आईचे गुणगौरव किंवा महती सांगितली जाते. याचे कारण ही तसेच आहे, आई नेहमी मुलाच्या अनेक चुका सांभाळून घेत असते. स्वत:च मुल चुकीच वागलं तरी सुद्धा तो कशा प्रकारे बरोबर आहे, हे सांगण्याचे काम आई करत असते. हे आईचे मुला प्रती असणारे प्रेम असते, म्हणून नेहमी आई कशी चांगली आणि किती प्रेमळ हे अनेकजण सांगत असतात.
अनेक वडील मंडळी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुलाला घडविण्यासाठी खर्ची केले. अशा एका वडिलांची गोष्ट मी आपणाला सांगत आहे. जी माझ्या जीवनाशी त्याच बरोबर अनावधानाने अनेकांच्या जीवनाशी मिळती जुळती असू शकेल?
एक मुलगा आपल्या घरापासून साधारणपणे दीड-दोनशे किलोमीटर दूर कामाच्या शोधात जातो. खूप कष्टाने सतत प्रयत्न करतो. अचानक त्याला एका कारखान्यात लिपिक/टंकलेखक म्हणून नोकरी असल्याची माहिती मिळते. तो मुलगा मुलाखत देण्यासाठी त्या कारखान्यात जातो. एक साधा शर्ट-पॅन्ट त्याला कशी बशी इस्त्री केलेली, शर्ट पॅन्टमध्ये खोचून इन केलेला, केस विंचरून, पायात साधी चप्पल घातलेली असे काहीसा पोशाख केलेला. मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचतो, मुलाखतीची वेळ येते. त्या मुलाला कारखान्याचे सर्वेसर्वा असणारे संचालक त्यांच्या खोलीत मुलाखतीसाठी बोलावून घेतात. खोलीचे दार अर्धवट उघडून आतमध्ये बसलेल्या व्यक्तीची परवानगी घेऊन तो मुलगा त्या खोलीत प्रवेश करतो. त्याला खोलीत येण्याची परवानगी दिली जाते.
खोलीत गेल्यावर तो पाहतो, मुलाखत घेणारे संचालक दुसऱ्या कोणाशी तरी गप्पा मारत बसलेले असतात. तो एका बाजूला जाऊन उभा राहतो. संचालक व खोलीत बसलेल्या व्यक्तीचे संभाषण सुरु असते. त्याला काही उमजत नाही. तो शांतपणे एका बाजूला उभा राहून त्यांचे संभाषण ऐकत असतो. स्वत:च्या हातामध्ये असणाऱ्या छोट्या वहीत काहीतरी लिहित असतो. बराच वेळ गेल्यानंतर त्या संचालकाच्या लक्षात येते की, आपण कोणाला तरी मुलाखतीला बोलावले आहे. ते त्या मुलाला समोर बोलावतात आणि काही प्रश्न विचारतात. शेवटी त्या मुलाला सांगितल जात की, थोड्या वेळापूर्वी चाललेले आमचे संभाषण टाईप करून घेऊन ये. म्हणून सांगितले जाते. तेव्हा त्याच्या लक्षात येते की, खऱ्या अर्थाने तिच आपली मुलाखत होती.
मुलगा त्या मुलाखत कक्षातून बाहेर जातो. काही कालावधीनंतर पुन्हा तो त्या मुलाखत कक्षात येतो. आपल्या हातात असणारे कागद त्या संचालकांना दाखवतो. त्या कागदावरील मजकूर वाचून ते संचालक खूप आनंदी होतात. याचे कारण म्हणजे मुलाखत कक्षात संचालक आणि त्यांच्या सोबती बसलेल्या व्यक्तीमधील संभाषणाचे अगदी हुबेहूब वर्णन त्या टाईप केलेल्या पानांवरती छापलेले असते. मनोभावे आनंदी होऊन त्या मुलाची नोकरी पक्की केली जाते.
तो मुलगा आनंदाने उत्साहाने मुलाखत कक्षातून बाहेर पडतो. दुसऱ्या दिवशी स्वत:च्या घरी येतो. झालेला प्रसंग आई-वडिलांना सांगतो. तेव्हा आईचा आनंद गगनात मावेनासा असतो. मात्र वडीलांचा चेहरा त्याच्यापेक्षा बरचसं काही सांगत असतो. त्या चेहऱ्यावरील भाव त्या मुलाच्या लक्षात येतात. त्या मुलाला नेहमी चाणाक्ष, कार्यशील, गतिमान, त्याच बरोबर नेहमी अनेक अडचणी कशा पद्धतीने मात करायची. या सर्वांचे धडे देणारा आपला बाप आठवतो. नेहमी शांत राहणारा, स्वत:ला कितीही यातना झाल्यातरी पाठीशी खंबीरपणे उभा असलेला याची जाणीव करून देणारा, आपला मुलाला शिखरावर घेऊन जात असताना किंवा नेहमी दूरचा उत्तम विचार हा दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतून शिकवणारा त्याच बरोबर दूरवर उभ्या असणाऱ्या संकटाना कशा पद्धतीने सामोरे जायचे याचे धडे देणारा आपला बाप आठवतो.
नेहमी देवळात गेल्यावर देवाचे दर्शन व्यवस्थित व्हावे यासाठी स्वत:ला खांद्यावर घेऊन दर्शन घडविणारा, आपल्या स्वत:चा बाप कोणत्याही परमेश्वरा पेक्षा कमी नाही याची जाणीव होते. त्यावेळी त्याच्या मनातून एकच आवाज येतो, "आज माझा बाप शून्य झाला”. शून्यू हा असा अंक आहे, ज्याची एरवी काहीही किंमत नसते. परंतु तो ज्याच्या पाठीशी उभा राहतो, त्याची किंमत मात्र दहा पटीने वाढली जाते, हे त्या मुलाच्या लक्षात येते. तो आपले हात जोडून आपला माथा बापाच्या पायावर ठेवतो आणि डोळ्यातून निघणाऱ्या अश्रुनी त्यांचे पाय धुवून टाकतो.
-    मंगेश विठ्ठल कोळी.
मो. ९०२८७१३८२०