Thursday, January 25, 2018

राष्ट्रध्वजाची निर्मिती झाली कशी?


     देशात साजऱ्या  होणाऱ्या “स्वातंत्र्य दिनानिमित्त" राष्ट्रध्वजाची माहिती देणारा माझा लेख. राष्ट्रध्वजाची माहिती देण्याचा माझा छोटासा प्रयत्न.
      भारतीय राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी, भारत देशाला स्वातंत्र मिळण्याच्या 24 दिवस आधी, अंगिकारला गेला.  भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पटटे आहेत ज्यामुळे त्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते.  मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.  भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण 3:2 असे आहे, भारतीय राष्ट्रध्वजाच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.

रचना-
      पिंगली वेंकय्या ह्यांनी रचलेल्या भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंग आहेत.  पांढ-या रंगाच्या पट्टयाच्या मधोमध निळ्या रंगांचे अशोक चक्र आहे. भारताच राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा आणि निळा. खरे पाहता आपला राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे.  22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगी ध्वज’ भारताचा अधिकत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकत करण्यात आला.  त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहर यांनी मांडला.  एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्टयांचा तो आहे.  वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत.  मधल्या पांढ-या पट्टयावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे आढळलेल्या सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे हे. चक्राला 24 आरे आहेत.  डॉ.एस राधाकष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे.  ध्वजात तीन समान आडव्या पट्टयांची रचना करण्यात आली आहे.
        वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.  या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
      मधल्या भागात पांढरा रंग आहे.  या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य व पावित्राचा बोध होतो.
      खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समध्दीचा बोध होतो.
      निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे  अथांगता, कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणा-या जगाचं सूचन करतो.  जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्णतेने आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलत: हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणा-या बौध्द धर्माचे धम्मचक्र आहे.  त्याला ‘अशोकचक्र’ या नावाने ओळखले जाते.  त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो.  ‘धम्मचक्र प्रवर्तनाय’ हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली -
      देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.  केंद्रीय गह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.  ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
      राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.  संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेउन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात.  ते टाळले पाहिजे.  प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग कर नये.
      ध्वजसंहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.  राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे.  शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे.रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.
    स्ंहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा. राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पध्दतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.  अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकविला पाहिजे.  कुठ्लया पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पध्दतीने फडकविला गेला पाहिजे.  ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.
      स्ंहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठ्लया मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा.  जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.  कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.  इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.
      राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी कर नये.  केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाउ नये.  तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होउ देउ नये.  ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पध्दतीने बांधला पाहिजे.  ध्वजाचा दुरपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.  त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग कर नये.  ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे,जहाजावर लावला जाउ शकत नाही.
       ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी कर नये.  कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही.  तसेच राष्ट्रध्वज गादी, रमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठलेही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.  ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.
      केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.  राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील.  जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल.  सरकारी अधिका-याच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.  आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी व घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देउ शकतात.
1. 1906 साली भारतीय ध्वजात तीन रंगांच्रा समावेश केला गेला.  सर्वात वरती गडद निळा रंगाचा पट्टा. त्यामध्ये 8 चांदण्या, मध्यभागी पिवळ्या रंगाचा पट्टा त्यामध्ये देव नागरी भाषेद वंदेमातरम लिहिले होते.  शेवटी सर्वात खाली लाल रंगाचा पट्टा त्यामध्ये एका बाजूला सूर्य व दुस-या बाजूला चंद्र होता.
2. 1907 साली भारतीय ध्वज पुन्हा बदलून पिवळा रंग तसाच ठेवून सर्वात वरती हिरवा रंग व त्यामध्ये 8 कमळ होते.  मध्यभागातील पिवळ्या रंगामध्ये वंदे मातरम लिहिले होते. शेवटी भगवा रंग वापरला गेला त्यामध्ये एका बाजूला चंद्र व दुस-या बाजूला सूर्य असे चित्र ठेवण्यात आले.
3. 1921 साली भारतीय ध्वज बदलून सर्वात वरती केशरी, मध्यभागी पांढरा, शेवटी हिरवा रंगाचा पट्टा अशी मांडणी करन मध्यभागी असणा-या पांढ-या चरख्याच्या चित्राचा समावेश करण्यात आला.
4. 22 जुलै 1947 रोजी तिरंगीध्वज व अशोकचक्र असलेला ध्वजाचा स्वीकार करण्यात आला.

- मंगेश विठ्ठल कोळी,
मो. ९०२८७१३८२०

Friday, January 19, 2018

दिनांक 20 जानेवारी 2018 ‘व्यक्तिमत्व विकास’ सविस्तर वाचण्यासाठी....





तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल....


आजच्या तरूण पिढीला काहीही समजत नाही असे वाक्य सर्वच ठिकाणी ऐकावयास मिळते. माझ्या लक्षात आले, अनेक उत्तम कामे सोप्या आणि वक्तशिरपणे करण्याच्या धडपडीमध्ये सर्वात पुढे तर हिच तरूण पिढी आहे. चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील, तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही हे आजच्या तरूणांनी ओळखले आहे. तरुण पिढीकडे असणारा स्वाभिमान आणि आत्मविश्वास याच्या जोरावर अनेक स्वप्न साकार करण्यासाठी मेहनतीच्या रुपात किंमत मोजण्याची तयारी ही या पिढीकडे आहे. हाताळत असलेले काम कोणालाही सांगता स्वत: पूर्ण केले जावू शकते. त्याचा गाजावाजा करण्याची गरज नाही हे या पिढीच्या लक्षात आले आहे. जर तुमचा विश्वास देवावर असेल तर जे नशीबात लिहिलय ते नक्किच मिळणार, परंतु जर विश्वास स्वत:वर असेल तर देव सुध्दा तेच देतो जे तुम्हाला हवं आहे.
कितीतरी माणसं आपलं आयुष्य त्यांना फसवल जाऊ शकतं या गैरसमजूतीमध्ये व्यतीत करतात. परंतु माणसाला स्वत:शिवाय दुसऱ्या कोणाकडून फसवलं जाणं अशक्य आहे. जस एखादी गोष्ट एकाच वेळेस असावी की नसावी हे सुध्दा ठरविता आले पाहिजे. आत्मविश्वास बाळगणारी व्यक्ती नेहमी स्वत:च्या मेहनतीने यशाचे शिखर गाठण्यासाठी निर्विवाद योग्यता प्रत्येकाजवळ आहे. यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट काही असू शकत नाही. आत्मविश्वास बाळगणाऱ्या व्यक्तीची चिकाटीची जगात कोणतीच गोष्ट घेऊ शकत नाही. कोणतीच प्रतिभा, कोणतीच बुध्दीमत्ता, कोणतीच विव्दत्ता, कोणतीच नाही चिकाटीसमोर कोणीच उभा राहू शकत नाही. स्वाभिमानी व्यक्ती धाडस किंवा हिंम्मतीने कार्य करते, भीती हा गुण माणसाच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे. फक्त भीतीवर नियंत्रण ठेवून भीती वाटत असतानाही जे कृती करतात त्यांनाच जग धाडसी व्यक्ती म्हणून ओळखते हे लक्षात ठेवा.
आत्मविश्वासू व्यक्ती कोणत्याही गोष्टीला किंवा घटनेला महत्व तेवढेच देते जेवढे प्राप्त होते. एखाद्या घटनेचा कसा अर्थ लावता, त्यावर तुमची प्रतिक्रिया अवलंबून असते. स्वत:चा बघण्याचा दृष्टिकोन निवडल्या नंतर एखाद्या घटनेचा परिणाम काय व्हावा हे घटना ठरवत नाही तर स्वत: ठरवतो. माणसाला जिंकायचे असेल तर केवळ माणुसकी, प्रेमळ स्वभाव, स्वाभिमान आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू दे नाही. जोपर्यंत तुम्ही पाऊल उचलणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच जागेवर राहाल. जे करायच आहे ते लगेच करायच आहे, तुम्ही काही करणार नाही तोपर्यंत तुमची स्थिती सुधारणार नाही.
काहीच नसण्यापेक्षा काही तरी असणं, हे केव्हाही चांगलं असतं. अपयश येईल या भीतीने मुर्ख माणूस कामाचा आरंभच करीत नाही. एखाद्या कामात थोडासा अडथळा निर्माण झाला की, सामान्य माणूस निराशेपोटी ते काम अर्धवट सोडून देतो. परंतु आत्मविश्वासू व्यक्ती मात्र कितीही संकटे आली, अपयश मिळाले तरी यश मिळेपर्यंत थांबत नाही. आत्मविश्वास असलेल्या मनुष्यासोबत काम करण्यात आनंद वाटतो कारण तो नेहमी इतरांशी मिळून मिसळून वागतो. आत्मविश्वास कमी असणाऱ्या व्यक्तींना थोड्या प्रेरणेची, प्रोत्साहनाची आवश्यकता असते. त्यांच्यामधील शक्तीची त्यांना कोणीतरी जाणीव करुन देताच ती सुप्त शक्ती तात्काळ प्रकट होते आणि ते विस्मयकारक कार्य पार पाडू शकतात.
नवीन आव्हाने आणि जबाबदाऱ्या स्वीकारण्यास अजिबात घाबरु नका, मला शक्य होणार नाही असे कधीच म्हणू नका. चालून येत असलेल्या संधीचे व्दार स्वत:च्या हातांनीच बंद करू नका, इतरांना जमू शकत असेल तर मला का जमणार नाही, नक्कीच जमेल असा आत्मविश्वास अंगी बाळगा. एखादी गोष्ट करु शकतो हा विश्वास निर्माण करण्याचा खात्रीचा मार्ग म्हणजे, एकदा ती गोष्ट करुन पाहणे होय. एकदा काही करण्यात यशस्वी झालो की, पुन्हा यशस्वी होऊ शकतो हा विश्वास आपोआप वाढीस लागतो. वाट पाहू नका सुरवात करा, सुरवात करण्यासाठी तुम्हाला अगदी हवी तशी वेळ कधीच येणार नाही. जिथे तुम्ही आहात तिथून जी साधने तुमच्याकडे आहेत त्यांना घेऊन सुरवात करा आणि तिही आत्ताच. वेळ ही जीवनात कधीच परत येत नाही. कोणतेही कार्य करत असताना ते स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने करा. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल.
-       मंगेश विठ्ठल कोळी, मो. ९०२८७१३८२०

Wednesday, January 10, 2018

युवांची विचारसरणी......


१२ जानेवारी ‘स्वामी विवेकानंद’ यांची जयंतीनिमित्त.....
आज २१ व्या शतकातील युवा देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. त्याचे कारण हि तसेच आहे, आपल्या देशात युवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ज्या देशात मोठ्या प्रमाणावर युवा असतील तो देश कमी कालावधीत मोठे यश प्राप्त करू शकतो, हे सर्वाना माहीत आहे. या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनामध्ये अनेक युवक स्वतःचा आत्मविश्वास आणि बऱ्याच अंशी स्वतःच्या मुक्त विचारसरणीला विसरत चाललेले आहेत. दिखाव्यांच्या किंवा आताच्या घटनेचा भविष्यात कोणता परिणाम होईल या गोष्टींचा विचार न करता धावत असल्याचे दिसून येते. समाजामध्ये संघर्ष निर्माण करू पाहणाऱ्या अपप्रवृत्ती यांच्यावर अंध विश्वास ठेऊन आजचा युवा वर्ग भांबावल्यासारख्या परिस्थितीमध्ये अडकून पडला आहे. अशावेळी योग्य ज्ञान, सकारात्मक दृष्टीकोन आणि जीवनाची योग्य वाट पकडण्यासाठी प्रत्येकाला स्वामी विवेकानंद आणि त्यांचे उत्तम विचारदेखील आठवत असतील. तरुणाचे स्फूर्तीस्थान म्हणून स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहिले जाते.
जगातील अनेक विचारवंतांनी स्वामीजींना "Positive Man" असे संबोधले आहे. नोबेल पारितोषिक विजेते आणि विख्यात विचारवंत गुरुदेव रविंद्रनाथ टागोर म्हणतात की, 'स्वामींकडे सर्वच सकारात्मक गोष्टी आहेत', सकारात्मक गोष्टींमध्ये प्रचंड स्फूर्ती आणि आत्मविश्वास असतो, परंतु स्वामी विवेकानंद म्हणतात, “ज्या व्यक्तीकडे सकारात्मक विचारांचा भक्कम पाया नाही त्या व्यक्तींच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही आणि यदा कदाचित समजा ती उभी राहिलीच तर भक्कम असेल असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही.” त्यामुळेच सकारात्मक विचार असून चालत नाही तर प्रत्येकाला आपल्या ध्येयाची निश्चिती सुद्धा करता आली पाहिजे. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिक घट्ट होतो, तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. स्वामी म्हणतात, एखादे ध्येय पूर्ण करण्यासाठी दहा चुका होत असतील तरी चालेल, पण एक चूक दहा वेळा होऊ नये” याकडे आपले लक्ष असले पाहिजे. यातून आपल्याला एवढे सांगता येईल की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. परंतु ध्येयाची निवड देखील तेवढीच महत्त्वाची असते. आपण कोणत्या समाजात राहतो कोणत्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो, त्याच्या आपल्या समाजामध्ये असणाऱ्या बालकांवर कोणता परिणाम होईल याची पूर्ण जाणीव असायला हवी.
आजच्या युवापिढीने स्वतःच्या जीवनामध्ये केवळ इच्छा बाळगणे योग्य नाही तर निश्चित ध्येय ठरवून ते पूर्ण करण्याकडे पाऊले टाकायला हवीत. “अडचणी असताना पळून जाणे म्हणजे, अजून अडचणी ओढावून घेणे होय.” जगण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळण्यासाठी तर अडचणी असतात. कोणतीही अडचण ही एकटी येत नाही त्याच्या पाठीमागे एक सुवर्ण संधी देखील असते फक्त त्या संधीचा फायदा कसा घेतो यावर आपले यश अवलंबून असते. “अडथळे नसलेली वाट कशाचेही नेतृत्व करु शकत नाही.” सर्व गोष्टीना पुरुन उरणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्टच. ‘अडचणीवर मात करताना मार्ग नाहीत असे कधीच होत नाही, मार्ग शोधताना अपयश येते हे खरे.’ 
“कोणतेही काम फक्त संपवण्यासाठी करु नका, तर ते काम स्वतःच्या आणि समाजाबरोबर राज्याच्या व देशाच्या विकासासाठी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला एखाद्या गोष्टीचे वेड लागल्याशिवाय त्याची निर्मिती होत नाही. “सर्वात प्रथम स्वत:सारखे होण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच तुम्हाला जग जिंकता येईल.” प्रत्येक दिवसाची सुरुवात आनंदाने, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून करायला हवी. प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक वेळेला महत्व द्यायला हवे. कारण एकदा गेलेली वेळ परत कधीच मिळत नाही. वेळ ही वाहत्या पाण्यासारखी असते एकदा स्पर्श केलेले पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा स्वत: बरोबरच समाजावर आणि येणाऱ्या नवीन पिढीवर कोणता परिणाम होईल याचा विचार करून योग्य निर्णय घ्या तुम्ही जरूर यशस्वी व्हाल. 
युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....
-       मंगेश विठ्ठल कोळी. मो. ९०२८७१३८२०

Wednesday, January 3, 2018

विचारांना हवी नवी दिशा.......

सर्वप्रथम सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाचे सर्वांनी आपापल्या परीने स्वागत केले. काही व्यक्तींनी या वर्षाचे फक्त कॅलेंडर बदलून स्वागत केले तर काही व्यक्तींनी एकमेकांना शुभेच्छा. देऊन स्वागत केले असेल. नवीन वर्षात आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींची काही चांगले गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करणारे नवीन संकल्प करीत किंवा काही व्यक्तींनी स्वत: समाजातील घडणाऱ्या बदलाचे विविध स्वरूप लक्षात घेऊन स्वत:मध्ये नेमके कोणते बदल घडवायला हवेत याची चाचपणी करून अनेक गोष्टींची यादी तयार केली असेल आणि भविष्यात या यादीमधील एक एक उत्तमोत्तम गुण अंगीकारण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल असाही संकल्प केला असेल. यामुळे कदाचित विचारांना नवी दिशा मिळून संपूर्ण आयुष्य बदलून जाईल.
काही दिवसांपूर्वी आपल्या राज्यात जे काही जातीपातीचे वातावरण निर्माण झाले होते अशामुळे आपल्याकडे असणाऱ्या तरुण पिढीवर आणि एकूणच त्यांच्या विचारसरणीवर  कोणता परिणाम होतो आहे याकडे कोणीही लक्ष देत नाही. मुठभर राजकारणी लोक स्वत:च्या स्वार्थासाठी आजच्या तरुण पिढीच्या मनात जातीपातीचे विचार रुजवून त्याचा निवडणुकीसाठी वापर करत आहेत. परंतु या नवीन वर्षाच्या सुरुवातीला अशा घटनांमध्ये तरुण पिढीने कितपत सहभागी व्हावयाचे हे ज्याचे त्याने ठरवावे. तरुण पिढीला जातीयवादी तत्वांचे विचार मनात पेरून त्यांना भडकावण्याचे काम केले जात आहे. आपण सर्वांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाहिले असेल की, या सर्व प्रकरणामध्ये शालेय स्तरातील मुले आणि कॉलेज मधील तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात आणि सक्रीय सहभाग होता. 
आज आपला देश हा तरुणाचा देश म्हणून ओळखला जातो. देशाची एक अव्दितीय शक्ती म्हणून तरुण पिढीकडे पाहिले जाते. अशा काही घटनांच्यामुळे तरुण पिढीच्या विचारावर आणि एकंदरीतच त्याच्या व्यावहारिक, मानसिक, सामाजिक विचार क्षमता यावर होणारा परिणाम हा देशाच्या भविष्यासाठी घातकच आहे. या तरुण पिढीच्या विचारांना कोणती दिशा द्यायला हवी? कोणती दिशा द्यायला नको? त्याच बरोबर तरुण पिढीच्या भविष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असेल? यावर विचारवंतानी तसेच प्रत्येक पालकांनी जरूर विचार करायला हवा. कोणत्याही घटनेचा परिपूर्ण अभ्यास करून अशा वाईट घटना, कृत्य करणाऱ्या आणि भविष्यात करू पाहणाऱ्या विचारांना वेळीच ठेचून काढले पाहिजे. तरुण पिढीच्या मनातील विचारांना चांगली दिशा, उत्तमोतम विचार मनात त्यांच्या विचारांना नवी दिशा देण्याची हीच खरी वेळ आहे.
-      मंगेश विठ्ठल कोळी, मो. ९०२८७१३८२०