Tuesday, December 26, 2017

नवे वर्ष, नवी उमेद...

वर्ष २०१७ संपत आले. सर्वांचे लक्ष नवीन वर्षाच्या स्वागताकडे लागले आहे. परंतु अनेकांचे आयुष्य २०१७ या वर्षातील चांगले-वाईट प्रसंग, घटना किंवा अविस्मरणीय क्षण कायमचे लक्षात राहतील अशाही गोष्टीनी भरलेले आहे. सोशल मिडीयावर तर गेली कित्येक दिवस नवीन वर्षाच्या शुभेछ्या देणारे मेसेज फिरत आहेत. सोशल मिडीयामध्ये यंदाच्या वर्षी व्हॉटस अॅपने वेगळीच उंची गाठली आहे. आपण एखादा सुंदर मेसेज तयार करावा आणि त्याच्या खाली स्वत:चे नाव टाईप करून तो सर्वाना पाठवावा. थोड्या वेळातच आपले नाव बाजूला करून त्या खाली भलत्याच व्यक्तीचे नाव टाईप करून तोच मेसेज पुन्हा आपल्यालाच परत पाठवला जातो. असे अनेक किस्से सर्वत्र पहावयास मिळत आहेत.
आपल्यापैकी अनेक व्यक्ती येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कोणता नवा संकल्प करायचा याची चाचपणी करण्यास एव्हाना सुरुवात देखील झाली असेल. काही मंडळी घरातील नवीन दिनदर्शिका खरेदी करीत असतील तर काही मंडळी नवीन वर्षातील नवीन लेखाजोखा लिहून ठेवण्यासाठी नवी कोरी डायरी घेण्यात व्यस्त असतील. याच काळात आपल्या लक्षात येते की, बरेच नवे संकल्प करण्यास सुरुवात होते. परंतु त्या संकल्पनाचे पुढच्या वर्षामध्ये कितपत यशस्वीपणे पार पाडले जातात. अशी उदाहरणे मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतपत समाजात पाहतो. नवीन वर्ष जवळ आले की, सरत्या वर्षाला निरोप देण्याची धावपळ सुरु होते, नवीन वर्षाचे स्वागत कशा पद्धतीने करायचे त्याच बरोबर या वर्षात काही गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत का याची जणू एक उजळणीच या दिवसात सुरु असते. त्याच बरोबर हे वर्ष किती लवकर संपले कळलेच नाही? असे प्रश्नार्थक वाक्य बऱ्याच व्यक्तीच्या तोंडून बाहेर पडताना दिसते.
२०१७ सालीसुद्धा ३६५ दिवस होते, प्रत्येक दिवसामध्ये सुद्धा २४ तास होते, प्रत्येक तासामध्ये ६० मिनिटे होती आणि प्रत्येक मिनिटामध्ये ६० सेकंद होते हे कोणी लक्षात ठेवत नाही. समोर उभा असलेल्या नवीन वर्षातसुद्धा आपणाला तेवढाच वेळ, दिवस, तास, मिनिटे आणि सेकंद मिळणार आहेत. परंतु नवीन वर्ष म्हटले की, उस्तुकता कशामुळे निर्माण होते. त्याची नक्की काय कारणे वेगवेगळी असतील? याची नोंद केली, तर लक्षात येईल की, “हार ने का डर और जितने की उम्मीद” यामधील जी तणावाची वेळ ही मानवाच्या आयुष्याला कलाटणी देणारी असते. तसाच काही काळ हा येणाऱ्या नवीन वर्षात आणि सरत्या वर्षात राहिलेल्या काही दिवसामध्ये असतो. जो व्यक्ती स्वत:च्या मनाचा विचार करून निर्णय घेतो, तोच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतो.
२०१८ सालामध्ये सर्वांनी एक संकल्प जरूर करावा आणि त्यासाठी वाटेल ती मेहनत घेण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. रात्री झोपताना नेहमी उद्याच्या दिवसाचे नियोजन करा. कारण दररोज केलेली थोडीथोडी प्रगती ही माणसाला यशाच्या अति उच्च शिखरावर घेऊन जाणारी असते. एखादे शिखर गाठायचे असेल तर काही पावले उचलावी लागतील. एखादे दूरचे अंतर पार करायचे असेल तर आतापासूनच चालणे सुरु करायला हवे. प्रत्येक दिवस हा आपल्याला एक चांगला आणि एक वाईट अनुभव देत असतो. चांगल्या अनुभवातून ऊर्जा घेऊन, वाईट अनुभवाची सोबतीने प्रत्येक संकटावर मात करायची असते. अशी दुर्गम इच्छा शक्ती उराशी बाळगून येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत केले पाहिजे. हे नवीन वर्ष आपल्यातील सर्व सुप्त गुण आणि कौशल्य आजमावण्यासाठी आहे हे नेहमी लक्षात ठेवा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछ्या......
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०

Friday, December 8, 2017

दिनांक ०९ डिसेंबर २०१७ ‘व्यक्तिमत्व विकास’ सविस्तर वाचण्यासाठी......





हम दो.. हमारे दो..


“हम दो, हमारे दो” हे शब्द कानावर पडताच अनेकांना कुटुंब नियोजनाची आठवण येते. काही वर्षापूर्वी देशाची वाढती लोकसंख्या पाहता शासनाने कुटुंब नियोजनाचे महत्व पटवून देत, ‘हम दो, हमारे दो’ या ब्रीद वाक्य तयार करून जनतेमध्ये कुटुंब नियोजन बाबत जागरूकता निर्माण केली. त्यानंतर देशामध्ये पोलिओ रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने याच दोनचा पुन्हा वापर केला. त्यावेळी “दो बुंद जिंदगी के” हे ब्रीद वाक्य जनतेच्या मनावर रुजवत पोलिओ रोगाबद्दलची जनजागृती केली. याच वाक्यांचा जनतेच्या मनावर आणि एकंदरीत समाज परिवर्तनात उत्तम परिणाम दिसून आला.
अनेक प्रकारच्या जाहिरातींच्या बाबतीत ‘दो’ किंवा ‘दोन’ या शब्दला अनन्य साधारण महत्व आहे. याची अनेक उदाहरणे पहायला, ऐकायला मिळतात. ‘दोन वस्तू घेतले तर एक वस्तू फ्री’, किंवा एखाद्या ‘महागड्या वस्तूवर दोन छोट्या वस्तू फ्री’, ‘दोन साबणावर पेन फ्री’ वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या जाहिरांतीचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. छोट्या-छोट्या सवलतीतील सूट मिळवण्यासाठी अनेक वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच बरोबर आता ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. अशा ऑनलाईन खरेदीसाठी महिन्यातील किंवा आठवड्यातील दोन-चार दिवस विशेष सूट दिली जाते.
आज समाजात ‘दोन’ या अंकाला चांगले दिवस आले आहेत. समाजातील प्रत्येक घराघरापर्यंत ‘दोन’चे महत्व वाढले आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला सुद्धा आता याची जणू सवई जडत चालल्या आहेत. अनेक घरात पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, घरातील वस्तूपासून ते गाडीपर्यंत ‘दोन’ ही संख्या वाढत आहे. कुटुंब नियोजनासाठी वापरले जाणारे ‘हम दो, हमारे दो’ हे वाक्य आता कुटुंबातील प्रत्येकाचे व्यसन होत आहे. पूर्वी कोठे तरी एक फोन असायचा मात्र सर्व माणसे एकमेकांशी जोडलेली असायची. परंतु आता घरातील प्रत्येकाकडे मोबाईल फोन उपलब्ध झाले आहेत.
घरातील एका व्यक्तीकडे ‘दोन’ मोबाईल आहेत असे चित्र आहे. परंतु प्रत्येक जण आता ‘दोन’ सीमकार्ड असणाऱ्या मोबाईल फोन असल्याशिवाय मोबाईल विकत घेत नाही. परंतु त्याची स्वत:ला असणारी गरज ओळखली पाहिजे. आज नवरा आणि बायको, आई-वडील आणि पाल्य यांच्यामधील सुसंवाद कमी झाल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते. आज माणसापेक्षा मोबाईलवर जास्त अवलंबून राहण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. प्रत्येकाचा मोबाईल वेगवेगळ्या कंपनीचा आहेत. त्याचे चार्जर वेगळे आहेत. हे ठीक आहे, परंतु मोबाईल चार्ज करण्यासाठी असणाऱ्या जागासुद्धा प्रत्येकाने फिक्स केल्या आहेत. जेवताना मोबाईल जवळ असावा, घरात सर्वांशी बोलताना मोबाईल जवळ असावा, एवढेच काय रात्री झोपताना नवरा बायकोच्यामध्ये मोबाईल ठेवलेले असतात.
मोबाईल ही काळाची गरज नक्कीच आहे, परंतु आज त्याचे व्यसन झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. याचा एकंदरीत मानवाच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे. याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. झोप पूर्ण न होणे, नैराश्य येणे, त्याच बरोबर अनेक आजारांना जवळ करण्यासाठी मोबाईल कारणीभूत ठरत आहे. हे सर्वाना कळत आहे, परंतु “कळत पण वळत नाही” या म्हणी प्रमाणे सर्वांचे वर्तन चालले आहे. याचा नक्कीच येणाऱ्या नवीन पिढीवर विपरीत परिणाम होईल. हा परिणाम टाळण्यासाठी मोबाईल ही फक्त गरज म्हणून वापरा त्याचे व्यसन होऊ देऊ नका.
आज मुलांच्या शाळेतील शिक्षणसुद्धा ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे लहान वयातच त्यांच्या हातात मोबाईल दिले जात आहेत. या मोबाईलवर मिळणाऱ्या शिक्षणाचा उपयोग वास्तववादी आयुष्यात कितपत होईल? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळ ठरवेल. ऑनलाईन शिक्षण पद्धतीला माझा विरोध नाही परंतु त्यापासून भविष्यातील उद्भवणाऱ्या असंख्य, असपष्ठ, विकारातून त्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम याविषयी मनात खूपच भीतीदायक वातावरण निर्माण झालेले अनेक पालक मला समुपदेशन करताना भेटत आहेत. अनेक पालकांचा शिक्षण व्यवस्थे वरील विश्वास उडत चालला आहे. अनेक ठिकाणी या ऑनलाईन हम दो हमारे दो चा परिणाम खूपच वाईट होताना दिसतो आहे. यासर्व गोष्टींवर लवकरात लवकर उपाय निघून सर्वांचे मानसिक, शारीरिक, वैचारिक आयुष्य सुखकर होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या लेखणीला थोडी विश्रांती देतो...
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०