Sunday, December 30, 2018

नवे वर्ष, नवा ध्यास...


नवे वर्ष, नवा ध्यास...
पाहता पाहता 2023 वर्ष संपले. सर्वांचे लक्ष नवीन वर्षाच्या स्वागताकडे लागले होते. परंतु अनेकांचे आयुष्य 2023 या वर्षातील चांगले-वाईट प्रसंग, घटना किंवा अविस्मरणीय क्षण कायमचे लक्षात राहतील अशाही गोष्टीनी भरलेले आहे. सोशल मिडीयावर तर गेली कित्येक दिवस नवीन वर्षाच्या शुभेछ्या देणारे मेसेज फिरत आहेत. सोशल मिडीयामध्ये यंदाच्या वर्षी व्हॉटस अॅपने वेगळीच उंची गाठली आहे. आपण एखादा सुंदर मेसेज तयार करावा आणि त्याच्या खाली स्वत:चे नाव टाईप करून तो सर्वाना पाठवावा. थोड्या वेळातच आपले नाव बाजूला करून त्या खाली भलत्याच व्यक्तीचे नाव टाईप करून तोच मेसेज पुन्हा आपल्यालाच परत पाठवला जातो. असे अनेक किस्से सर्वत्र पहावयास मिळत आहेत.
आपल्यापैकी अनेक व्यक्तींनी नवीन वर्षामध्ये कोणता नवा संकल्प करायचा याची चाचपणी करून देखील झाली आहे. काही मंडळी घरातील नवीन दिनदर्शिका खरेदी करीत असतील तर काही मंडळी नवीन वर्षातील नवीन लेखाजोखा लिहून ठेवण्यासाठी नवी कोरी डायरी घेण्यात व्यस्त असतील. याच काळात आपल्या लक्षात येते की, बरेच नवे संकल्प करण्यास सुरुवात होते. परंतु त्या संकल्पांचे पुढच्या वर्षामध्ये कितपत यशस्वीपणे पार पाडले जातात. अशी उदाहरणे मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतपत समाजात पहावयास मिळतात.
नवीन वर्ष आले की, सरत्या वर्षाला निरोप देण्याची धावपळ सुरु होते. नवीन वर्षाचे स्वागत कशा पद्धतीने करायचे त्याच बरोबर या वर्षात काही गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत का? याची जणू एक उजळणीच सुरु असते. त्याच बरोबर हे वर्ष किती लवकर संपले कळलेच नाही? असे प्रश्नार्थक वाक्य बऱ्याच व्यक्तीच्या तोंडून बाहेर पडताना दिसते.
2023 सालीसुद्धा ३६५ दिवस आणि प्रत्येक दिवसामध्ये सुद्धा २४ तास होते. प्रत्येक तासामध्ये ६० मिनिटे होती आणि प्रत्येक मिनिटामध्ये ६० सेकंद होते, हे कोणी लक्षात ठेवत नाही. समोर उभा असलेल्या नवीन वर्षातसुद्धा आपणाला तेवढाच वेळ, दिवस, तास, मिनिटे आणि सेकंद मिळणार आहेत. परंतु नवीन वर्ष म्हटले की, उस्तुकता कशामुळे निर्माण होते. त्याची नक्की काय कारणे वेगवेगळी असतील? याची नोंद केली, तर लक्षात येईल की, हार ने का डर और जितने की उम्मीद यामधील जी तणावाची वेळ ही मानवाच्या आयुष्याला कलाटणी देणारी असते. तसाच काही काळ हा येणाऱ्या नवीन वर्षात आणि सरत्या वर्षात राहिलेल्या काही तासामध्ये असतो. जो व्यक्ती स्वत:च्या मनाचा विचार करून निर्णय घेतो, तोच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतो.
2024 सालामध्ये सर्वांनी एक संकल्प जरूर करावा आणि त्यासाठी वाटेल ती मेहनत घेण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. रात्री झोपताना नेहमी उद्याच्या दिवसाचे नियोजन करा. कारण दररोज केलेली थोडीथोडी प्रगती ही माणसाला यशाच्या अति उच्च शिखरावर घेऊन जाणारी असते. एखादे शिखर गाठायचे असेल तर काही पावले उचलावी लागतील. एखादे दूरचे अंतर पार करायचे असेल तर आतापासूनच चालणे सुरु करायला हवे. प्रत्येक दिवस हा आपल्याला एक चांगला आणि एक वाईट अनुभव देत असतो. “चांगल्या अनुभवातून ऊर्जा घेऊन, वाईट अनुभवाची सोबतीने प्रत्येक संकटावर मात करायची असते.” अशी दुर्गम इच्छा शक्ती उराशी बाळगून येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत केले पाहिजे. हे नवीन वर्ष आपणास सुख, समृद्धी, आनंदायी, आरोग्यसंपन्न व भरभराटीचे जावो. तसेच आपणास जे जे हवे ते ते सर्वकाही मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. हे नवीन वर्ष आपल्यातील सर्व सुप्त गुण आणि कौशल्य आजमावण्यासाठी आहे हे नेहमी लक्षात ठेवा. आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछ्या....

-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०

Tuesday, December 25, 2018

पश्चातापपासून दूर राहण्यासाठी....

चिमणीचे सगळे काम आटोपले, ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.
'गेला असेल कुठेतरी... येईल परत'
…. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली.
मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता.
चिमणीचं मन आज कशातच रमेना बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही
कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची ……
तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं...
अनेक दिवस उलटले ...
चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना.
मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली.
एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला...
तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला.
तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय!
कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता.
कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला,
'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?'
कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
- 'तुला राग नाही आला माझा?'
- का यावा?
- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?
- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.
- मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.
- चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'
चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -
- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल क्षणाचाही विलंब न करता.
चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे...
पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....
आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय.
- म्हणजे ?
- म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या गावीच नसतं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात... त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही.
…. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो.
…'थांब मला जर करिअर करुदे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.
त्यांची सहन शक्ती संपते ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते गावीही नसतं आणि जेव्हा भान येतं तेव्हा ….
आपण फार एकटे झालेले असतो.... !!
- आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?
- वेळीच 'टकटक ' ऐकायला शिका.
आज अनेकांची स्थिती हि चिमणी सारखी झाली आहे, माझ्या शिवाय दुसरे कोणी काही करू शकत नाही असा अहम प्रत्येकाचा जागा झाला आहे. आणि शेवटी हा अहम त्याला या गोष्टीतल्या चिमणी सारखे एकटे जीवन जगण्यास भाग पडेल. आपल्या जवळ येणारे कावळे त्यांच्या रूपावरून नव्हे तर त्यांच्या बुद्धीमत्तेवरून आपण त्यांचा आदर केला पाहिजे. तरच भविष्यात आपल्याला गोष्टीतील चिमणीसारखे पश्चाताप करून घेण्याची वेळ येणार नाही.
-      मंगेश विठ्ठल कोळी, मो.-९०२८७१३८२०